‘ठाकरे + ठाकरे’ हा अग्रलेख वाचला. मनसेची जी धूळधाण उडाली त्यास राज ठाकरे यांचा एककल्ली आणि हुकूमशाही स्वभाव मुख्यत्वेकरून कारणीभूत आहे. त्यांच्या पक्षाची धोरणे कधीच स्पष्ट झाली नाहीत. टोलनाके, परप्रांतीय याविरुद्ध आंदोलने करून मनसेने लोकप्रियता मिळवली पण नंतर ती आंदोलने ज्या पद्धतीने गुंडाळली, त्यावरून मतदारांच्या मनात शंकाच जास्त निर्माण झाल्या. राज ठाकरे यांचे वक्तृत्व वादातीत आहे. आधी त्यांनी भाजप, मोदी आणि शहा यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती, पण या निवडणुकीत मात्र त्यांनी भाजपला मागितला नसताना पाठिंबा दिला. यातून जनतेने नेमका अर्थ काढून त्यांना जागा दाखवून दिली.

आता राज ठाकरे यांनी स्वत: दोन पावले मागे येऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जुळवून घेणे ही काळाची गरज आहे. या विधानसभा निवडणुकीच्या आधी जरी हा प्रयोग झाला असता तर निकाल वेगळाच लागला असता. उद्धव ठाकरे हे मोठे बंधू आहेत हे लक्षात घेऊन त्यांना मोठेपणाचा मान देऊन राज ठाकरे यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला तर तो दोघांच्याही फायद्याचा ठरेल यात शंका नाही. अजूनही किती तरी शिवसैनिक असे आहेत की, त्यांना हे दोन भाऊ एकत्र आलेले पाहणे आवडेल.- अशोक साळवेमालाड (मुंबई)

वर्चस्वाचा वाद बाजूला सारू शकतील?

ठाकरे + ठाकरे’ हा अग्रलेख (२७ नोव्हेंबर) वाचला. एका ठाकरेंकडे शैली आहे तर दुसऱ्या ठाकरेंकडे वारसा आहे; परंतु राजकीय दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीचा अभाव दोन्ही बंधूंकडे जाणवतो. दोन्ही बंधू एकत्र आले तरीही वरचढ कोण हा संघर्ष बाजूला सारून, कधी थोडे नमते घेऊन महाराष्ट्रहितासाठी एकत्र कार्य करतील, याची शाश्वती वाटत नाही. शिवाय पुढील पिढीचा नेता कोण होणार, हा प्रश्न आहेच. त्यामुळे दोन्ही ठाकरेंनी या प्रश्नावर खरोखरच शहाणपणाने विचार करण्याची गरज आहे.- शिरीष गोळे (ठाणे)

खेकडा प्रवृत्ती त्यागावी लागेल

मराठी माणसांत परस्परांचे पाय खेचण्याची वृत्ती आहे, हे मान्य करावेच लागेल. त्याचाच फायदा घेत राज्यात किती तरी अमराठी उमेदवार प्रतिनिधित्व करीत आहेत. याउलट इतर राज्यांतील राजकीय पटलावर मराठी नावे दिसत नाहीत. राज्यातच मराठी माणसाचा पक्ष मूळ धरू शकला नाही. इतर राज्यांत प्रादेशिक पक्षांनी दखलपात्र यश मिळवले.

पश्चिम बंगाल असो वा दाक्षिणात्य राज्ये, याची अनेक उदाहरणे दिसतात. याला त्या पक्षांतील नेत्यांची संघर्ष करण्याची वृत्ती कारणीभूत आहे. लोकसंपर्क आणि जनआंदोलनांतील प्रत्यक्ष सहभाग यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. ठाकरे बंधूंना तसे श्रम करावे लागले नाहीत. त्यांना बरेच काही तयार मिळाले, पण टिकवून ठेवायला लागणारे बिनीचे शिलेदार कायमच दुरावत गेले. याला कारणीभूत होता वैयक्तिक स्वार्थ. शिवाय परिणामांना सामोरे जाताना असावी लागणारी धमक ते दाखवू शकले नाहीत. मराठी माणसांच्या पक्षांची आज जी वाताहत झाली आहे, ती उणीव दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर भरून निघू शकते. वर्तमानात उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे दलित वर्गात सहानुभूती आढळते.

नामांतर आणि रिडल्स कालखंडातील जखमा विसरून हा समुदाय त्यांच्या मागे उभा राहिला, हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आले. असेच आणखीही काही समाजघटक त्यांच्या मदतीला येऊ शकतात. गरज आहे ती राज्यात मराठी माणसाचे प्रश्न घेऊन संघर्षरत होण्याची. श्रमांची, संघर्षाची आणि परिणामाला सामोरे जाण्याची तयारी आहे की नाही यावरच राज्यस्तरीय मराठी प्रादेशिक पक्षांचे आणि ठाकरे बंधूंचे भवितव्य निर्भर आहे.-अनिरुद्ध कांबळेराजर्षीनगर (नागपूर)

केंद्राशी मैत्री ठेवण्यास हरकत काय?

ठाकरे + ठाकरे’ हा अग्रलेख (२७ नोव्हेंबर) वाचला. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे अनेक मराठीजनांना वाटते, मात्र त्याआधी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे. ते मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या दबावामुळे त्यांना अनेक वेळा गप्प बसावे लागले होते. मग तो सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा असो वा मुन्नावर फारुकीचा किंवा हिंदू सणांचा. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील जनतेला न्याय मिळण्यासारखा विषय एखादा स्थानिक पक्षाच लावून धरू शकतो. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यांच्यावर सतत टीका करण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासून महाराष्ट्रहित मराठी माणूस व मराठी संस्कृतीचा उद्धार कसा करता येईल, हे पाहावे.- डॉ. संदीप देसाईकारवार

मनसे यावर विचार करणार की नाही?

ठाकरे + ठाकरे’ हा अग्रलेख (२७ नोव्हेंबर) वाचला. विधानसभा निवडणुकीत मनसेने सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला होता, अशा स्थितीत सत्ताधाऱ्यांनी काही जागांवर राज ठाकरे यांना मदत केली असती तर त्या पक्षाचे अस्तित्व आणि चिन्ह अबाधित राहिले असते. शिवाय युतीच्या पारड्यात १० जागांची भर पडली असती. मात्र माहीम, वणी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलीना, वांद्रे पूर्व, वरळी आणि गुहागर या मतदारसंघात दोघांचा वाद आणि तिसऱ्याचे भले झाले. युतीतील पक्षांनी तडजोड का केली नाही? मनसे यावर विचार करणार की नाही?- अमोल करकरेखेड (रत्नागिरी)

समंजस बेरीज समयोचित

ठाकरे + ठाकरे’ हा अग्रलेख (२७ नोव्हेंबर) वाचला. विधानसभेतील अभूतपूर्व यशानंतर आता मुंबईवर एकहाती कब्जा करण्यासाठी भाजपचे बाहू बळकट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी समंजसपणे बेरीज करणेच समयोचित आहे.

एके काळी मातोश्रीचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रमोद महाजन आणि अडवाणींना बाळासाहेबांनी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असेल, हे मान्य करण्यास भाग पाडले होते. मात्र गेल्या काही वर्षांत भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत गळचेपी केली आहे. खरेतर प्रबोधनकारांच्या मांडीवर खेळलेली दोन नातवंडे एकमेकांच्या विरोधात उभी राहणे हे महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचे दुर्दैव आहे. भाजपचे जीवघेणे हिंदुत्व ना ठाकरे घराण्याला कधी मान्य होते ना महाराष्ट्राला. नव्या विधानसभेत परप्रांतीयांचे संख्याबळ वाढले आहे. सर्वांनाच गिळंकृत करण्यापासून भाजप एक-दोन पावलेही दूर नाही. अशा वेळी महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी कोण पुढे येणार, हा कळीचा प्रश्न उरतो.- वसंत देशमानेपरखंदी (सातारा)

अभूतपूर्व महाबहुमताविषयी कुतूहल

विजयश्री खेचून आणली!’ ही भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची एकतर्फी ‘पहिली बाजू’ (लोकसत्ता २६ नोव्हेंबर) वाचली. खरेतर हे विधान तीन वर्षांपूर्वी सयुक्तिक ठरले असते. या निवडणुकीत महायुतीला मतदारांनी अधिकृत पणे विजय मिळवून दिला, हा फरक आहे. आणि तो महायुतीच्या ‘संघ’भावनेचा आहे. मोदी-शहा यांच्याशी शिंदे-पवार यांनी योग्य संपर्क ठेवला आणि दोन भक्कम कुबड्यांचा आधार भाजपला दिला. लोकसभा निवडणुकीत जी पडझड झाली, त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत जे अभूतपूर्व महाबहुमत मिळाले ते कसे, याचे कुतूहल आहेच. त्याचे विरोधी पक्षाप्रमाणेच भाजपनेही आत्मपरीक्षण करावे.- श्रीनिवास डोंगरेदादर (मुंबई)

मित्रपक्षांनी वास्तव स्वीकारणे गरजेचे

मुख्यमंत्रीपदावरून पेच’ हे वृत्त (लोकसत्ता २६ नोव्हेंबर) वाचले. लाडकी बहीण हा या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला. ही योजना मूळची मध्य प्रदेशच्या भाजप सरकारची. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांचे नाव दिले गेले. एकनाथ शिंदे हेच महायुतीचा प्रमुख चेहरा होते, तर त्यांच्या पक्षाला लढवलेल्या ८२ पैकी ७० जागा तरी मिळणे गरजेचे होते. भाजपला १५२ पैकी १३२ जागा मिळाल्या हे वास्तव मित्रपक्षांनी स्वीकारणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद पण भाजपनेच दिले होते, हे शिंदेंनी विसरता कामा नये.- शशिकांत मुजुमदारनवी पेठ (पुणे)