मराठीतले ज्येष्ठ समीक्षक वा. ल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर मांडे यांनी वयाच्या चौतिसाव्या वर्षी (१९६७) पीएच.डी. मिळवली, तेव्हा मराठी विभागातून लोकसाहित्यावर पीएच.डी. होण्याची ती मराठवाडा विद्यापीठातील आणि वा. ल. यांच्यासाठीही- पहिलीच वेळ होती! मांडे हे केवळ भाषा आणि साहित्याचे नव्हे तर समाजाचे
अभ्यासक आहेत, हे त्यांच्या पीएच.डी.ने सिद्ध केलेच. पण पुढेही अनेक पुस्तकांच्या लेखनातून त्यांनी संशोधन आणि सिद्धान्तन यांची कास सोडली नाही. यापैकी सैद्धान्तिक भूमिका (थिओरेटिकल पोझिशन) बदलत गेल्या, तरी त्यांचे संशोधन मात्र बावनकशी राहिले.
त्यांच्या सैद्धान्तिक भूमिकेतील मोठा बदल दलित साहित्याबाबत दिसतो. माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि ‘स्वकीयांमध्ये क्रांतिज्योत प्रज्वलित करणे’ हा प्रयत्न ज्या साहित्यात दिसतो, ते दलित साहित्य, असे १९७५ च्या ‘अस्मितादर्श’मधील लेखात ते म्हणतात. पण त्यानंतरच्या काळात त्यांची ही भूमिका पालटून समन्वयवादी झालेली दिसते. तर ‘गावगाडयाबाहेर’, ‘वाल्मीकी समाज : उत्पत्ती, स्थिती आणि परिवर्तन’, ‘लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी’, ‘लोकरंगभूमी’, ‘जातगावची पंचायत’, ‘मिथकांचे भावविश्व’, ‘सांकेतिक आणि गुप्त भाषा’ अशा अनेक पुस्तकांतील संशोधन मूलगामी असल्याने ते कालौघात संस्कृतीचा अभिलेख म्हणूनही टिकणारे आहे.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : उत्तम पाचारणे
अशा संशोधनाची प्रेरणा प्रभाकर मांडे यांच्यात जागवणारे मिलिंद महाविद्यालयातील त्यांचे अध्यापक म. भि. चिटणीस, मार्गदर्शक वा. ल. कुलकर्णी, सहकारी गंगाधर पानतावणे असे एकेक जण जग सोडून गेल्यानंतर, नव्वदी गाठलेल्या मांडे यांचे निधन हे अनपेक्षित नसले तरी, एका समृद्ध कालखंडाची अखेर झाल्याची हुरहुर लावणारे आहे. मांडे यांनी ‘मंगल-प्रभा’ या स्वत:च्या निवासस्थानीच, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली होती, त्या अर्थाने ते एक संस्था- एक गुरुकुल होते. महाराष्ट्रभर पसरलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना समाधान इतकेच की, उत्तरायुष्यात त्यांचा यथोचित सन्मान ‘संगीत नाटक अकादमी- अमृत महोत्सव पुरस्कार’ (२०२२) आणि २०२३ मधील ‘पद्मश्री’ने झाला. लोकसंस्कृतीच्या आधुनिक अभ्यासकांना समाजातील उणेपण जाणवते, पण म्हणून हे अभ्यासक त्यावर मात करण्याचा राजकीय-सामाजिक कार्यक्रम देऊ शकतातच असे नाही. पण दिला तरी, कोणत्याही राजकीय व सामाजिक कृतिकार्यक्रमाला दाद न देणारे समाजगटच लोकसंस्कृती जपू शकतात. हा विरोधाभास एक अभ्यासक म्हणून प्रभाकर मांडे यांच्या लक्षात आला असावा. परंतु ‘स्वकीयांमध्ये क्रांतिज्योत प्रज्वलित करण्या’च्या अपेक्षेपेक्षा निराळी, समरसतेची अपेक्षा ते गेल्या दोन दशकांत सातत्याने मांडत राहिले होते.