मॉस्कोजवळ शुक्रवारी एका सांगीतिक कार्यक्रमादरम्यान प्रेक्षागृहात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याइतकाच गंभीर ठरतो, रशियन सरकारने या हल्ल्याच्या हस्तकांविषयी काढलेला निष्कर्ष. अत्यंत सुनियोजित आणि सुसज्ज हल्ल्यानंतर चारेक हल्लेखोर सुखरूप बाहेर निसटणे, त्यांना नेमके ‘युक्रेनकडे निघालेले असताना’च अटक होणे आणि हे हल्लेखोर युक्रेनमधीलच काहींच्या संपर्कात होते असे रशियन सरकारच्या प्रसिद्धिमाध्यमांवरून सांगितले जाणे, हे सारेच संशयास्पद ठरते. या संशयात भर पडते कारण हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट अर्थात आयसिसच्या अफगाणिस्तानातील शाखेने (आयएस-खोरासान) उचलली आहे. त्याविषयी आयसिसच्याही आधी अमेरिकी गुप्तचर विभागाने वाच्यता केली. पण आयसिसचा धागा सोडून रशियाच्या सरकारने युक्रेनकडे संशयाची सुई वळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालवलेला दिसतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीच त्यांच्या अधिकृत प्रतिक्रियेत, युक्रेनमध्ये या दहशतवाद्यांना कशा प्रकारे आश्रय मिळणार होता वगैरे उल्लेख आहे. रशियन परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्या बाईंनी तर समाजमाध्यमांवरून युक्रेनवर थेट आरोप करताना शिवीगाळही केली. तर तेथील पार्लमेंटच्या एका सदस्याने ‘योग्य प्रत्युत्तर’ देण्याची भाषा केली. युक्रेनने अर्थातच या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पण राजधानी मॉस्कोच्या समीप घडलेल्या या हल्ल्याची नामुष्की आणि संभाव्य जनक्षोभ टाळण्यासाठीच युक्रेनच्या सहभागाचे कथानक उभे केले जात असल्याचे स्पष्ट आहे.
दोन वर्षांपूर्वी रशियाने फुटकळ कारणांसाठी युक्रेनवर हल्ला केला. हे युद्ध आजही अनिर्णितावस्थेत आणि चिघळलेले आहे. युक्रेनचा २० टक्के भूभाग आज रशियाच्या ताब्यात आहे आणि पाश्चिमात्य राष्ट्रांकडून तातडीची मदत मिळाली नाही तर आणखी काही भूभाग रशियाच्या ताब्यात जाईल. अशा परिस्थितीत मॉस्कोवर फार तर काही ड्रोन पाठवण्यापलीकडे लष्करी हल्ले करण्याची युक्रेनची क्षमता आणि इच्छा नाही. दहशतवादी हल्ले ही युक्रेनची प्रवृत्ती नाही. शिवाय स्वत:च्याच देशात परिस्थिती गंभीर असताना, मानगुटीवर बसलेल्या आक्रमक देशामध्ये अशा प्रकारे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याइतके युक्रेनचे नेतृत्व बिनडोक नाही. त्यामुळे मॉस्को हल्ला आणि युक्रेनचा हात हे समीकरण जुळवणे अवघड आहे.
तसे ते करावे लागते, कारण रशियाच्या ध्यानीमनी नसताना हा हल्ला झाला आहे. गेल्या २० वर्षांतला रशियातला तो सर्वात भीषण ठरला. या हल्ल्याने सर्वाधिक धक्का पुतिन यांच्या पोलादी प्रतिमेला बसला. ते नुकतेच ‘प्रचंड बहुमता’ने अध्यक्षपदी विराजमान झाले. रशियाला पुन्हा एकदा सामथ्र्यशाली करायचा विडा उचलल्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच हा हल्ला झाला. शनिवार सायंकाळपर्यंत त्यात जवळपास दीडशे नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रसृत झाली होती. हा आकडा थोडा नाही. पण रशियाला विध्वंसक शस्त्रास्त्रे बनवण्याची आणि शेजारील राष्ट्रांमध्ये सैन्य घुसवण्याची खुमखुमी असली, तरी आपल्या भूमीवरील आस्थापनांचे रक्षण करण्याच्या जबाबदारीमध्ये हा देश आणि विशेषत: गेल्या अनेक वर्षांमध्ये पुतिन प्रशासन वारंवार अपयशी ठरताना दिसून आले. शाळा, नाटय़गृहे, विमानतळे, मेट्रोस्थानके अशा ठिकाणी या देशात विशेषत: गेल्या दोन दशकांमध्ये जितके भीषण हल्ले झाले, तितके ते रशियासारख्या इतर मोठय़ा वा प्रगत देशात झालेले नाहीत. यांतील बहुतेक सर्व हल्ल्यांमध्ये चेचेन दहशतवाद्यांचा हात होता असे सांगितले गेले आणि या कारणास्तव रशियाने चेचेन्यावर एकापेक्षा अधिक आक्रमणे केलेली आहेत. रशियाकडे इतक्या वर्षांनंतरही सुसज्ज आणि सुप्रशिक्षित दहशतवादविरोधी यंत्रणा उपलब्ध नाही. मॉस्कोतील हल्ला होण्याविषयीची खबर अमेरिकी गुप्तहेरांनी रशियापर्यंत पोहोचवली होती. तिच्याकडे लक्ष देण्यास बहुधा कुणाला वेळ नसावा.
आयसिस ही संघटना गेल्या पाच वर्षांमध्ये बऱ्यापैकी नेस्तनाबूत झालेली आहे. अफगाणिस्तान आणि काही प्रमाणात लिबिया व सीरियाचा भाग वगळता तिचे फारसे अस्तित्व नाही. तालिबानच्या दुसऱ्या राजवटीपूर्वी अफगाणिस्तानातील हल्ल्यांमध्ये आयसिस-खोरासानचा हात होता. पण मॉस्कोसारख्या ठिकाणी इतक्या सुसूत्रपणे हल्ले
घडवून आणण्याची या संघटनेची क्षमता आहे का, याविषयी संदिग्धता आहे. रशियाचा तर आयसिसच्या दाव्यावरच विश्वास नसावा! त्यामुळेच, या हल्ल्याच्या निमित्ताने आणखी काही दु:साहस करण्याची त्यांची खुमखुमी असावी, या शंकेस जागा उरते.