चुकीच्या धोरणांमध्येच लाभाचा मार्ग दिसून आला, की सारासार विचार न करता त्या मार्गाने जात राहायचे, ही प्रवृत्ती अलीकडे प्रगत म्हणवणाऱ्या लोकशाही देशांमध्येही दिसून येते. ज्या मूल्यांसाठी त्या देशांना आणि म्हणून तेथील नेत्यांना ‘प्रगत’ मानले जाते, त्या मूल्यांनाच तिलांजली देण्यात हल्ली हेच बहुतेक नेते आघाडीवर असतात. ब्रिटनमध्ये बेकायदा निर्वासित किंवा शरणार्थी किंवा आश्रयार्थीना आफ्रिकेत रवांडा देशात पाठवण्याविषयी सध्या जे काही सुरू आहे, त्यावरून लोकशाहीची जन्मभूमी म्हणवणाऱ्या या देशालाही ऱ्हासपर्वाने कवेत घेतल्याची जाणीव प्रबळ होते. त्या देशात प्रदीर्घ काळ हुजूर पक्षाची सत्ता आहे. युरोपशी काडीमोड घेण्याच्या मुद्दय़ावर या पक्षाला गेल्या खेपेस मतदारांनी भरभरून मतदान केले आणि पुन्हा सत्तेत बसवले. तरीही गेल्या दोन कार्यकाळांमध्ये डेव्हिड कॅमेरून, थेरेसा मे, बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस असे चार पंतप्रधान हुजूर पक्षाने पाहिले. पाचवे ऋषी सुनक सध्या त्या काटेरी सिंहासनावर विराजमान आहेत. द्रष्टेपणाचा पूर्ण अभाव हा या १३ वर्षांच्या पंतप्रधान मालिकेतील पहिल्या दोघांचा स्थायीभाव. तर सर्वच गुणांचा पूर्ण अभाव हे नंतरच्या दोघांचे (अव)गुणवैशिष्टय़! यांच्या तुलनेत ऋषी सुनक हे खूपच अधिक विचारी आणि नेमस्त. त्यामुळे त्यांच्याकडून अधिक विचारी धोरणांची अपेक्षा होती. रवांडा शरणार्थी धोरणाच्या निमित्ताने ती फोल ठरली असेच म्हणावे लागेल. आधी युरोपीय न्यायालय आणि नंतर ब्रिटनचेच सर्वोच्च न्यायालय यांनी या धोरणाबाबत मानवतावादी दृष्टिकोनातून नोंदवलेले तीव्र आक्षेप झुगारून ते कायदेमंडळाच्या माध्यमातून बहुमताच्या जोरावर रेटण्याचे काम सुनक नेटाने करत आहेत. सुनक यांच्या हुजूर पक्षातील कित्येकांना हे धोरण महत्त्वाचे वाटते. ब्रिटनमध्ये बेकायदा शिरू इच्छिणाऱ्या ‘आश्रयार्थीच्या नौका रोखा’ (स्टॉप द बोट्स) या आश्वासनावरच तर सुनक यांची त्यांच्या पक्षाने पंतप्रधानपदी निवड केली होती. दरम्यानच्या काळात दोन-तीन मंत्र्यांनी राजीनामे देऊन झाले, तरी कोणत्याही परिस्थितीत रवांडा आश्रयार्थी धोरण राबवण्याचा सुनक यांनी चंग बांधला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा