‘विनोदी भूमिका करणे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. पण आपल्याकडे अशा नटांना हलक्यात घ्यायची मानसिकता आहे. जिथे चार्ली चॅप्लिनसारख्या नटाची अभिनेता म्हणून ऑस्करने कधी दाद घेतली नाही, तिथे आमच्यासारख्याची काय कथा?’ अशी खंत उराशी बाळगणारे चतुरस्रा अभिनेते अतुल परचुरे हे अकाली काळाच्या पडद्याआड गेले. स्वच्छ वाणी, उत्तम वाचन, चिंतन, मनन, शब्दांच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची आस, विनोदाची सूक्ष्म जाण अशी सगळी आयुधे रंगकर्मी म्हणून जवळ बाळगणारे अभ्यासू अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. पण गंमत अशी की शब्दांवर हुकमत असणाऱ्या या नटाची अत्यंत गाजलेली भूमिका जयवंत दळवी लिखित ‘नातीगोती’ नाटकातील मतिमंद बच्चूची होती; ज्यात त्यांना एकही संवाद नव्हता. शालेय वयात ‘बजरबट्टू’ नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. त्याआधीच टीव्ही आणि चित्रपटाचा श्रीगणेशा करून झाला होता. ‘टिळक आणि आगरकर’ नाटकातून त्यांचे व्यावसायिक नाटकांत पदार्पण झाले. मग, ‘वासूची सासू’, ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘अफलातून’, ‘बे दुणे पाच’, ‘ए भाऊ, डोकं नको खाऊ’, ‘वाह गुरू’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी वैविध्यपूर्ण भूमिकांची रांगच लागली. त्यांची विशेष गाजली, ‘अजरामर’ ठरली, ती ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पु. लं.ची भूमिका. प्रत्यक्ष भाईंनीही तिला दाद दिली होती. दिलीप प्रभावळकर, मधुकर तोरडमल, मोहन जोशी, प्रशांत दामले, राजा गोसावी यांसारख्या तगड्या नटांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या प्रत्येकाकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळाले ही त्यांची भावना होती. प्रत्येक दिग्दर्शकाच्या शैलीशी जुळवून घेत आपली सर्जनशीलता त्यांनी विस्तारली. पुढे मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, जाहिरातपट, हिंग्लिश नाटके असा चौफेर प्रवास त्यांनी केला. आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप त्यांनी सोडली.

सहकलाकारांबरोबरचे ट्युनिंग त्यांना महत्त्वाचे वाटे. ‘आंतरनाट्य’सारख्या संस्थेतून सक्रिय राहिल्याने नाटक ही गंभीरपणेच करायची गोष्ट आहे हे त्यांच्या मनावर कायमचे ठसले होते. ‘ठरवून काही कधी केले नाही, प्रयोगागणिक ते सापडत गेले, ते कधी जपले, कधी नकळतेपणी ते विसरले गेले,’ असे ते मागे वळून पाहताना म्हणत. ‘अतुल परचुरे म्हणजे पु. ल.’ हे जे समीकरण रसिकांच्या मनात तयार झाले होते त्याचा त्यांना रास्त अभिमान होता. मात्र, चार-पाच लक्षणीय भूमिका वगळता रसिकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील अशी भूमिका आपल्याला मिळाली नाही, पण ती मिळेल असा आशावाद ते शेवटपर्यंत बाळगून होते. जुन्या जाणत्या दिग्दर्शकांबरोबरच संतोष पवार यांच्यासारख्या हुशार दिग्दर्शकासमवेत आपल्याला काम करायला मिळाले याचाही आवर्जून उल्लेख ते करत. वरकरणी मी कितीही ‘हॅपी गो लकी’ दिसत असलो तरीही चांगल्या भूमिकेसाठी मी कायम अस्वस्थ असतो असे एका मुलाखतीत ते म्हणाले होते. त्यांची ही इच्छा अधुरी राहिली, हे दुर्दैव. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सबंध आयुष्य गेल्याने लहानपणापासून क्रिकेेटचे वेड त्यांना होते. पण त्यात करिअर करण्याची आपली पात्रता नाही हे वेळीच जाणवून पुढे एक जाणकार क्रिकेटवेडे म्हणून जगभर ते मॅचेस पाहायला जात.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

आज एक अभ्यासू, साहित्यावर नितांत प्रेम करणारा आणि तितकाच जीवनावर प्रेम करणारा माणूस आपण त्यांच्या रूपात गमावला आहे. कर्करोगावर मात करण्याची जिद्द त्यांनी बाळगली होती: पण उपचारांनी साथ दिली नाही. सुधीर जोशी, विजय चव्हाण, विजय कदम हे ‘विनोदी नट’ असा शिक्का बसलेले पण मराठी रंगभूमीवर खऱ्या अर्थाने रमलेले अभिनेतेही चुटपुट लावूनच गेले, त्यांच्याइतकेही आयुष्य अतुल परचुरे यांना लाभले नाही. त्यांचा मृत्यू हा १९८० च्या दशकातील सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, मोहन गोखले अशा अभिनेत्यांच्या जाण्याइतपत अकाली ठरला. रंगभूमी कुणासाठी थांबत नसते हे खरे; तरीही अशा अभिनेत्यांनी पुढे काहीतरी आणखी महत्त्वाचे केले असते, याची रुखरुख कायम राहील.