हैदराबादमध्ये चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी तेलुगू चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेता अल्लू अर्जुन याला झालेल्या अटकेवरून राजकीय, चित्रपट क्षेत्राप्रमाणेच सामान्यामध्ये उमटलेल्या प्रतिक्रियेवरून समाजमनाचा अंदाज येतो. अल्लू अर्जुनच्या अटकेवरून भाजप आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी गळा काढला. चित्रपट क्षेत्रावर जणू काही आभाळ कोसळले अशीच प्रतिक्रिया उमटली. तेलंगणातील काँग्रेस सरकार ‘टॉलीवूड’ म्हणजेच तेलुगू चित्रपटसृष्टी संपविण्यास निघाल्याचा काही जणांना भास होऊ लागला. मुंबई बॉम्बस्फोटसारख्या देशाला हादरा देणाऱ्या गुन्ह्यात संजय दत्तच्या अटकेनंतर रिकामटेकड्या नटनट्यांनी ठाणे कारागृहाबाहेर येऊन धुडगूस घातला होता. पुढे याच संजय दत्तला शिक्षा झाली; पण एरवी अनेकदा सरकारी यंत्रणा वा पोलीस चित्रपटांतील ‘ताऱ्यां’पुढे लोटांगण घालतात. या पार्श्वभूमीवर ‘अल्लू अर्जुन असो वा अन्य कोणीही, कायदा सर्वांसाठी समान आहे’ ही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची भूमिका स्वागतार्हच मानावी लागेल.
‘पुष्पा – २’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन हा हैदराबादमधील ‘संध्या’ चित्रपटगृहात आला होता. आजच्या घडीला तेलुगू चित्रपटसृष्टीतील तो आघाडीचा नायक असल्याने त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला अपयश आले. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ वर्षीय महिला मृत्युमुखी पडली तरी तिचा ९ वर्षांचा मुलगा अजूनही बेशुद्धावस्थेत आहे. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने अल्लू अर्जुन वा अन्य अभिनेत्यांच्या उपस्थितीविषयी पोलिसांना पूर्वकल्पना दिली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने त्याच्या खासगी सुरक्षारक्षकांनी प्रेक्षकांना ढकलले व त्यातून चेंगराचेंगरी झाल्याचा जबाब प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिला. अलीकडे राजकारणी, नटनट्या, बिल्डर्स यांच्या खासगी सुरक्षारक्षकांची फौज ही सामान्यांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. सफारी घालून फिरणाऱ्या या सुरक्षारक्षकांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण नसते. केवळ सामान्यांना दरडावणे हेच त्यांचे काम असते. मागे मुंबईत एका बिल्डरच्या खासगी सुरक्षारक्षकांनी तर मंत्र्याची गाडी अडविल्याची चर्चा मंत्रालयात रंगली होती. या दुर्घटनेनंतर मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरूनच हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनसह १० जणांवर गुन्हा दाखल केला. यातूनच अभिनेत्याला अटक झाली. स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर उच्च न्यायालयाने सायंकाळी त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. तरीही जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. अल्लू अर्जुनच्या अटकेवरून राजकारण सुरू झाले. या प्रकरणाशी अल्लू अर्जुनचा संबंध काय, असाही सवाल उपस्थित केला गेला. अटकेवरून मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांना लक्ष्य करण्यात आले. ‘कायदा सर्वांसाठी समान आहे’ हे मुख्यमंत्री रेड्डी यांनी ठणकावले ते बरेच झाले. ‘एवढी गंभीर दुर्घटना घडूनही अल्लू अर्जुनवर कारवाई झाली नसती तरी सामान्य लोकांनी चित्रपट तारकांसाठी वेगळा न्याय का, अशी विचारणा केली असती. अल्लू अर्जुन काही पाकिस्तान सीमेवरून युद्धातून परतले नव्हते… पैसे कमाविण्यासाठीच त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली,’ अशी भूमिका रेड्डी यांनी मांडली. कायद्यापुढे सर्व समान आहेत हा संदेश यानिमित्ताने दिल्याबद्दल मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे खरे तर अभिनंदनच करायला हवे. अल्लू अर्जुनची पत्नी आपली दूरची नातेवाईक तर सासरे हे काँग्रेस पक्षात आहेत हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यही महत्त्वाचे ठरते.
अल्लू अर्जुनला अटक झाल्यावर राजकारणी, चित्रपटसृष्टी आणि त्याचे चाहते सरकारवर तुटून पडले. जे चाहते नाहीत आणि या अटकेचे राजकारणही करायचे नाही, अशांना काही तासांत जामीन मिळतो याचा अचंबा वाटला. पण अटकेमुळे ही चर्चा निव्वळ अल्लू अर्जुन या एका अभिनेत्याभोवती फिरत राहिली. चाहत्यांच्या वा प्रेक्षकांच्या गर्दीतली एक महिला जिवानिशी गेली, तिच्या नऊ वर्षाच्या मुलाला मृत्यूशी झगडावे लागते आहे, याची कोणाला फिकीर ना खंत. आता तर या महिलेच्या पतीने तक्रार मागे घेण्याची तयारी दाखवली. पत्नीचा जीव गेला, मुलाची जीवन मरणाची झुंज सुरू असताना कुटुंबाचा कर्ता पुरुष एक तर दबाव किंवा पैशांच्या आमिषाशिवाय तक्रार मागे घेणे शक्यच नाही. याच अल्लू अर्जुनच्या विरोधात लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कायद्यापुढे सारे समान आहेत हा मुख्यमंत्री रेड्डी यांनी अल्लू अर्जुूनच्या अटकेवरून दिलेला संदेश गर्दीच्या व्यवस्थापनातूनही यापुढे तरी दिसावा.