चष्मा घातलेले आणि गंभीरपणे वावरणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या क्रिकेटपटूपेक्षा पदव्युत्तर पदवी घेऊन प्रयोगशाळेत रुजू झालेल्या नवसंशोधकास अधिक साजेसे होते. सत्तरच्या दशकात हमखास दिसून येणारे लांब कल्ले आणि मिशा, सरळसोट बांधा, त्यात पुन्हा तो चष्मा अशी ही व्यक्ती वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर सुनील गावस्करांच्या बरोबरीने कशी काय उभी राहील, अशी रास्त शंका वाटणारे त्या काळात कमी नसतील. पण अंशुमान गायकवाड उभे राहिले… खंबीरपणे, गंभीरपणे, सारे काही सोसत, सारे काही झेलत. त्यांचे असे उभे राहणे जितके गावस्करांसाठी आश्वासक होते, तितकेच ते भारतीय संघासाठीही लाभदायी ठरायचे. गावस्करांचे सलामीवीर सहकारी या वर्णनास खऱ्या अर्थाने न्याय देणारे तीनच फलंदाज आढळतात. चेतन चौहान, कृष्णम्माचारी श्रीकांत आणि अंशुमान गायकवाड. यांत गायकवाड सुरुवातीस मधल्या फळीत आणि तेही सहाव्या क्रमांकावर खेळायचे. पण तंत्रशुद्ध फलंदाजी आणि एकाग्रता या गुणांच्या जोरावर त्यांना सलामीवीर म्हणून बढती मिळाली. या बढतीचा आनंद वाटावा अशी परिस्थिती त्या काळी तरी नव्हती. सत्तरच्या दशकातील कसोटी क्रिकेट म्हणजे फलंदाजांसाठी खेळपट्टीवर विकेटच नव्हे, तर प्रसंगी जीवही वाचवणे आव्हानात्मक ठरायचे. त्यांची सलामीवीर म्हणून पहिली कसोटी वेस्ट इंडिजमधील जमैकात होती. त्या कसोटीत जवळपास ४५० मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडून गायकवाड यांनी ८१ धावा जमवल्या. पण आधीच्या कसोटीमध्ये हार पत्करावी लागल्यामुळे असेल किंवा आणखी कोणत्या कारणामुळे असेल, वेस्ट इंडिजचे गोलंदाज यष्टींऐवजी भारतीय फलंदाजांना लक्ष्य करत होते. मायकेल होल्डिंग, व्हेन डॅनियल, बर्नार्ड ज्युलियन आणि व्हॅनबर्न होल्डर या गोलंदाजांचा तोफखाना आग ओकत होता. होल्डिंग यांचा एक चेंडू गायकवाड यांच्या कानावर आदळला. त्या आघातामुळे त्यांच्या कानाचा पडदा फाटला आणि शस्त्रक्रिया करावी लागली. त्या काळी फलंदाजांकडे आजच्यासारखी हेल्मेट्स नसत, शिवाय उसळणाऱ्या चेंडूंबाबत कोणताही नियम नव्हता.
गायकवाड भारतासाठी १२ वर्षांमध्ये ४० कसोटी सामने खेळले. यात दोन शतकांसह ३० ची सरासरी ही कामगिरी फार महान म्हणता येणार नाही. पण आकडेवारी सर्वच काही सांगू शकत नाही. गायकवाडांची दोन्ही शतके वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध झळकली. यांतील दुसरे शतक – खरे तर द्विशतक – त्यांनी ११ तासांमध्ये जालंधर येथे झळकवले म्हणण्यापेक्षा जमवले. कसोटी क्रिकेटमध्ये त्या काळात खेळपट्टीवर नांगर टाकून उभे राहण्यास अनन्यसाधारण महत्त्व होते. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याकडे त्या काळात उत्तमोत्तम गोलंदाज होते. त्यांच्यासमोर हाणामारी करण्याची फारशी संधी मिळायची नाही. गायकवाड गावस्कर यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नव्हते किंवा श्रीकांत यांच्यासारखे आक्रमकही नव्हते. पण कितीही वेगवान गोलंदाजी असली, तरी उभे राहणे आणि त्यासाठी आवश्यक हिंमत आणि एकाग्रता त्यांच्या ठायी होती.
अंशुमान हे बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यातले. त्यांचे वडील दत्ताजीराव हेही भारताकडून खेळले. मात्र अंशुमान गायकवाड यांच्या वृत्तीत ‘महाराजा’ नव्हता. शिस्तप्रिय आणि तरीही मनमिळावू स्वभाव याबद्दल त्यांच्याविषयीचा आदर सार्वत्रिक होता. श्रीकांतसारख्या आक्रमक सलामीवीराला त्यांच्याऐवजी पसंती मिळाली, तेव्हा गायकवाड त्याबद्दल कटुता न बाळगता निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही वेगवेगळ्या भूमिकांतून ते भारतीय क्रिकेटची सेवा करत राहिले. प्रथम निवड समिती सदस्य, पुढे प्रशिक्षक-व्यवस्थापक म्हणून त्यांनी योगदान दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी कसोटी मालिका विजय, शारजातील तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय, अनिल कुंबळेने १० बळी घेतले ती पाकिस्तानविरुद्धची मालिका त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडली. सामनेनिश्चितीच्या काळ्या छायेतून भारतीय क्रिकेटला बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती, ती त्यांनी व्यवस्थित निभावली.
‘गट्स ओव्हर ग्लोरी’ हे त्यांचे आत्मचरित्र गेल्या वर्षी प्रकाशित झाले. चमकदार कामगिरीपेक्षा आपण हिंमत दाखवणे योग्य हे वास्तव त्यांनी स्वीकारले. त्याप्रमाणेच अंशुमान गायकवाड शेवटपर्यंत जगले. ज्या हिमतीने वेस्ट इंडिजच्या तोफखान्यास सामोरे जायचे, त्याच निग्रहाने कर्करोगाशी मुकाबला केला. अखेर ही लढाई ते हरले, तरी त्यांची ताठ कण्याची छबी चटकन विस्मृतीत जाण्यासारखी नाही.