अमेरिकेत गेल्या आठवडय़ात अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा एक दरवाजा १६ हजार फूट उंचीवर निखळल्यामुळे या विमानाला तातडीने जवळच्याच विमानतळावर उतरावे लागले. इतक्या उंचीवरून विमान उडत असताना असा एखादा भाग तुटून पडणे म्हणजे विलक्षण आणीबाणीचा प्रसंग. हवेचा शक्तिशाली झोत विमानाबाहेर फेकला गेल्यामुळे आतील वस्तू इतस्तत: भिरकावल्या गेल्या. संबंधित दरवाजाजवळील आसनांवर कुणीही बसलेले नव्हते. परंतु काही रांगा सोडून बसलेल्या एका तरुणाचा शर्ट त्याचे शरीर सोडून विमानाबाहेर फेकला गेला. हा तरुण स्वत:ही फेकला गेला असता, परंतु खुर्चीपट्टय़ामुळे बचावला. पोर्टलँड येथून कॅनडातील ओंटॅरियो येथे निघालेले हे विमान परत तातडीने पोर्टलँडला उतरवण्यात आले. वैमानिक व सेवक वर्गाने प्रसंगावधान राखून पुढील हालचाली केल्यामुळे आणखी नुकसान न होता विमान सुखरूप उतरू शकले. हा झाला या प्रसंगातील सुदैवाचा आणि कौतुकाचा भाग. परंतु चिंताजनक भाग म्हणजे हे बोईंग कंपनीचे नवे करकरीत विमान होते. ‘बोईंग-७३७ मॅक्स ९’ प्रकारातील हे विमान हल्लीच सेवेत दाखल झाले. प्राथमिक तपासात, संबंधित दरवाजाच्या सांधेखिटय़ा (बोल्ट) पुरेशा घट्ट नसल्यामुळे हा प्रसंग ओढवल्याचे आढळून आले. विमानात अधिक संख्येने प्रवासी असते, किंवा ते अधिक उंचीवरून उडत असते तर अशा प्रकारचे छिद्र पडल्यानंतर विमानातील हवेचा दाब झपाटय़ाने कमी होऊन अनवस्था प्रसंग उद्भवला असता. पण मनुष्यहानी टळली, म्हणून बोईंगची वा या कंपनीस संरचनात्मक सांगाडा (फ्युसलाज) पुरवणाऱ्या स्पिरिट एअरोसिस्टिमची जबाबदारी संपत नाही. उलट ती कित्येक पटींनी वाढते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण त्यानंतर तीनच दिवसांना युनायटेड एअरलाइन्स या आणखी एका विमान कंपनीने त्यांच्या ताफ्यातील ‘बोईंग-७३७ मॅक्स ९’ प्रकारातील विमानांची तपासणी केली असता, तशाच प्रकारच्या दरवाजाच्या सांधेखिटय़ा ढिल्या असल्याचे आढळून आले. बनावटीमधील हा दोष गंभीर स्वरूपाचा असल्याचे ठरवून फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) या अमेरिकेतील हवाई वाहतूक नियामक संस्थेने अशा प्रकारची विमाने वापरण्यास बेमुदत काळासाठी मनाईहुकूम काढला. आता या विमानांचे सुरक्षा-परीक्षण केले जाईल. त्यास कितीही वेळ लागो, प्रवाशांची सुरक्षितता आणि जीवित आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे ‘एफएए’ने जाहीर केले आहे. म्हणजे ही विमाने पुन्हा केव्हा झेपावतील याविषयी कोणतीही शाश्वती नाही. बोईंग कंपनीचे मुख्याधिकारी डेव्ह कॅलहाउन यांनी चूक कबूल केली आहे. अशा नामुष्कीची बोईंगची अलीकडच्या काळातील ही पहिली वेळ नव्हे. २०१८ आणि २०१९मध्ये ‘बोईंग-७३७ मॅक्स ८’ या प्रकारातील दोन विमाने इंडोनेशिया आणि इथियोपिया येथे दुर्घटनाग्रस्त झाली. त्या वेळी ती विमानेही नवीन होती. सदोष उड्डाण प्रणालीमुळे हे अपघात झाल्याचे तपासाअंती निदर्शनास आले. दुसऱ्या घटनेनंतर जवळपास २० महिने ती विमानेदेखील जमिनीवर उभी करण्यात आली होती. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना एकूण भरपाईपोटी बोईंग कंपनीला जवळपास अडीच अब्ज डॉलर चुकते करावे लागले होते. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, या दोषाविषयी कंपनीमधील काहींना पूर्वकल्पना होती. तरीही एअरबस या कंपनीशी तीव्र स्पर्धा असल्यामुळे इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ही विमाने बाजारपेठेत आणली गेली. अमेरिकी काँग्रेसच्या अहवालात बोईंगमधील ‘लपवेगिरीच्या संस्कृती’वर बोट ठेवण्यात आले होते.  

इतक्या गंभीर दुर्घटना अलीकडेच घडलेल्या असताना, पुन्हा एकदा विमानांच्या सदोष बनावटीबद्दल बोईंग चर्चेत आली. या बेफिकिरीचे एक कारण तीव्र स्पर्धा आणि विमाननिर्मितीमधील द्विमक्तेदारी हेही आहे. कोविडच्या अघोषित संचारबंदीनंतर जगप्रवास पुन्हा एकदा रुंदावू लागला आहे. अशा वेळी अधिकाधिक विमाने बाजारात आणणे हे क्रमप्राप्त बनले आहे. बाजारातील विमानांची संख्या आणि भांडवली बाजारातील मूल्य या दोन्ही आघाडय़ांवर अमेरिकेच्या बोईंगला युरोपच्या एअरबसने मागे सोडले आहे. त्यामुळे नियमांना बगल देऊन, काही वेळा सुरक्षाविषयक अक्षम्य तडजोडी करून विमाने बाजारात आणण्याचा नवाच प्रकार बोईंगने सुरू केल्याचे दिसून येत आहे. ही प्रतिमा जितकी मलिन होईल, तितके बोईंगसाठी भविष्यात सावरणे अवघड होऊन बसेल.  

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth boeing 737 max 9 type aircraft of boeing company entered into service amy
Show comments