शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या वादविवाद स्पर्धेत एखाद्या विषयाच्या परस्परविरोधी भूमिका मांडण्याची पद्धत असते. त्या वयात तो एक वैचारिक संस्कार असतो. गेल्या काही वर्षांत या संस्काराला हरताळ फासत फक्त एकच बाजू सांगायला, दाखवायला आणि ऐकवायला हवी, असा हट्ट सुरू झाल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या नाटय़शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या नाटय़ सादरीकरणावेळी गोंधळ झाला आणि त्यातून धक्काबुक्की, अटकसत्र, माफी, दिलगिरी, निलंबन असे पडसाद उमटत राहिले. रामायणातील पात्रांवर आधारित असे हे नाटक होते, असे सांगितले जाते. ते या विभागाच्या परीक्षेचा एक भाग होते. ते सुरू असतानाच, अभाविप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी ते बंद पाडून निषेध व्यक्त केला. निषेधाचा हा प्रकार गेल्या काही काळात वाढत चालला असल्याचे दिसून येते. त्यामुळे समोरच्याचे म्हणणे ऐकून, त्यावर प्रतिवाद करण्याची परंपराच ठप्प होते. नाटकाचे लेखन आणि त्याचे सादरीकरण ही अभिव्यक्ती असते. त्यामध्ये विचार, भावना, नाटय़ यांचे मिश्रण असते, असावे लागते. विद्यार्थ्यांनी नाटक म्हणून जे काही सादर केले, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात काहीच गैर नाही. हा विषय पोलिसांत तक्रार करूनही पुढे नेता आला असता. परंतु तसे करण्याची रीत आता कालबाह्य झालेली असावी. कारण थेट गुंडागर्दी करून, आरडाओरडा करून, प्रसंगी हाणामारी करून अभिव्यक्त होण्यासच विरोध म्हणण्याची पद्धत अधिक रूढ होत चालली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

   ‘घाशीराम कोतवाल’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकाला विरोध झाला, ‘सखाराम बाईंडर’सारख्या नाटकावरही अश्लील, भडकपणाचा आरोप करत विरोधाची राळ उडवली गेली, हे जसे चुकीचे, तसेच ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला कडाडून विरोध करत त्याचे प्रयोग बंद पाडण्याचा प्रकारही चुकीचाच. आपला विचार मांडण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य घटनेने सगळय़ांना दिले आहे. त्यामुळे त्या अभिव्यक्तीला विरोध लोकशाही मार्गानेच केला गेला पाहिजे. कारण कोणताही समाज एकच एक विचार घेऊन पुढे जात नसतो. लोकशाहीमध्ये साधकबाधक चर्चेला अधिक महत्त्व असते. ललित कला केंद्राच्या परीक्षार्थी नाटकाबाबत असे काही घडले नाही. गेल्या पाच दशकांत समाजाच्या वैचारिकतेमध्ये कोणत्याही पातळीवर जराही बदल घडून आला नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? तसे असेल म्हणजे इतक्या वर्षांत समाजात काहीच बदल झाला नसेल तर मांडणाऱ्यांनीही आपले म्हणणे आणखी सूचक, आणखी प्रतीकात्मक मार्गानी मांडायला हवे का, या मुद्दय़ाचाही विचार व्हायला हवा. घटना घडल्यानंतर पोलिसात रीतसर तक्रार झाली. लगेच विभागप्रमुखांसह सहा जणांना अटक झाली. विद्यापीठाने दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतरही ललित कला केंद्राच्या परिसरात तोडफोड, काळे फासणे आणि मोर्चा काढण्याचे प्रकार होतच राहिले, यावरून त्यास विरोध करणाऱ्यांना वैचारिक भूमिकेपेक्षा गोंधळ घालण्यातच अधिक रस होता की काय, असा संशय येतो. नाटक, चित्रपट यांसारख्या माध्यमांवर प्रेक्षकांचा अधिकार जरूर असावा पण त्यांची दहशत असता कामा नये. ललित कला केंद्रात परीक्षेचा भाग म्हणून जे नाटक सादर झाले, ते व्यावसायिक नाटक नव्हतेच. अशा स्थितीत त्याबाबत किती गोंधळ घालायचा, याला मर्यादा असायला हवी. तशी ती नाही आणि वातावरणात ती असावी, यासाठी काही प्रयत्न होतानाही दिसत नाहीत.

विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे. मात्र कलेच्या माध्यमातून सादर होताना, आपले म्हणणे किती ठाशीवपणे आणि कसे सादर करायचे, याबद्दल काही निकषांचा आधार घ्यायला हवा. कोणत्याही कलाकृतीचे एक अंतर्गत तर्कशास्त्र असते. त्यातील सारी पात्रे, त्या तर्कानेच व्यवहार करतात. त्यामुळे त्याला वैचारिक अधिष्ठान असेल, स्थलकालाचे सापेक्ष भान असेल, तर ते तशाच रीतीने व्यक्त व्हायला हवे. या नाटकाला झालेल्या विरोधाच्या विरोधात विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तसेच नाटय़कलेतील जाणत्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या पाठीशी उभे राहण्याची जी भूमिका घेतली, ती स्वागतार्ह म्हटली पाहिजे. विचारांचा सामना विचारांनीच करायला हवा, हे सूत्र आता पुस्तकांतील पानांतच अडकून राहील आणि हळूहळू अस्तंगतच होईल, असे मानले जाण्याच्या काळात नाटय़कर्मी आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची. समाजात सर्व प्रकारच्या विचारांचा आदर करण्याची लोकशाही परंपराच जर धाकदपटशाने नष्ट होणार असेल, तर त्याला सर्वानी सातत्याने विरोधच करायला हवा.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth confusion during the drama performance of the students of the drama department of the lalit arts center of savitribai phule pune university amy