विधानसभेतील गोंधळ हा नवा प्रकार नव्हे. जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनात, कामकाजाच्या पहिल्याच दिवशी झालेला गोंधळ मात्र विशेष होता. ‘जय श्री राम’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ यांसारख्या घोषणा देत आणि ठरावाचे कागद फाडून तुकडे इतस्तत: फेकत, भाजपचे सदस्य विरोध करत होते. तो ठरावही विशेषच. ‘जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळावा’ अशी मागणी करणारा! गोंधळातही हा ठराव आवाजी मतदानाने संमत झालाच. त्यामुळे आता, केंद्र सरकारकडे विशेष दर्जाच्या फेरस्थापनेबाबत चर्चेची मागणी करण्याचा वैध आणि नैतिक अधिकार जम्मू-काश्मीरच्या सरकारने मिळवला आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० ने हा विशेष दर्जा जम्मू-काश्मीरला दिला होता, तो ५ ऑगस्ट २०१९ रोजी निष्प्रभ करणे ही आपली मर्दुमकी असल्याचा प्रचार भाजपने- खुद्द जम्मू-काश्मीर वगळून- अन्य प्रत्येक निवडणुकीत आजतागायत केलेला आहे. नेमके त्यावर विधानसभेच्या लोकनियुक्त सदस्यांनी बोट ठेवणे भाजपला कसे रुचेल? अन्य राज्यांमधील प्रचारात, ३७० हटवणे म्हणजेच देशप्रेम असाही समज भाजपने पसरवलेला असल्याने आता काश्मिरी लोकप्रतिनिधींनाच देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्नही होईल. तसे करण्यात भाजपचा हातखंडा आहे, हे महाराष्ट्रातही ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवू पाहणाऱ्या प्रचारामधून दिसतेच आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा