आपल्या संविधानाचे सार सांगणाऱ्या प्रास्ताविकेची सुरुवात ‘आम्ही, भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा …(निर्धार करतो)’ अशी आहे. यापैकी केवळ ‘आणीबाणीच्या कालखंडात घुसडले गेलेले शब्द’ म्हणून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दांचा दुस्वास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषत: प्रास्ताविकेच्या अखेरीस भारताच्या लोकांनी हे संविधान अंगीकृत, अधिनियमित आणि स्वत:ला अर्पण करण्याची तारीख – २६ नोव्हेंबर १९४९ – स्पष्टपणे नमूद असल्याने त्यानंतरचा बदल अवैधच ठरवायला हवा, असे काहीजणांचे म्हणणे असते. साक्षात नानी पालखीवालांसारख्या विधिज्ञांच्या युक्तिवादानंतरही हे शब्द कायम राहिल्याची खदखदही अनेकांमध्ये असते. या दुस्वासाला, खदखदीला आणि त्यामागच्या आक्षेपांना वाट देणाऱ्या तीन याचिका २०२० पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होत्या, त्या न्यायालयाने फेटाळल्या. म्हणजे हे शब्द यापुढेही कायमच राहतील, असे न्यायालयाने बजावले आहे. बहुतेक राज्यांच्या विधानसभा बरखास्त असताना (आणीबाणीमध्ये) संसदेत ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे हे शब्द प्रास्ताविकेत समाविष्ट झाले, हे खरे. पण त्यानंतरच्या ‘जनता पक्ष’ सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीला निष्प्रभ करण्यासाठी जी ‘४५ वी घटनादुरुस्ती’ मांडली, तिच्यावरील चर्चेअंती हे शब्द कायम ठेवण्याचा निर्णय जनता सरकारनेही घेतला, हा इतिहास सर्वोच्च न्यायालयाने सांगितला, हे बरे झाले. ‘भारतीय संदर्भात समाजवादाचा अर्थ ‘कल्याणकारी राज्य’ इतकाच आहे’ आणि ‘धर्मनिरपेक्षता हा संविधानाच्या पायाभूत चौकटीचा भाग असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती (१९७३), एस. आर. बोम्मई (१९९४) या प्रकरणांच्या निकालांत, तसेच त्यानंतरही वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. भारतीय संदर्भात धर्मनिरपेक्षता या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे- राज्ययंत्रणा कोणत्याही एका धर्माची नाही, पण सर्व नागरिकांना आपापला धर्म आचरण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचेही स्वातंत्र्य आहे’ — हेसुद्धा न्यायालयाने स्पष्ट केले. इतक्या साधार विवेचनानंतर यापुढे तरी कुणी प्रास्ताविकेत ‘धर्मनिरपेक्षता घुसवल्या’ची तणतण करणार नाही, ही अपेक्षा प्रशस्त झाली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांनी २५ नोव्हेंबरला- म्हणजे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला प्रास्ताविकेचे मूल्य-भान विशद केले, हे योग्यच झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा