जी-सेव्हन समूहाच्या राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद नुकतीच इटलीत झाली, तीस पंतप्रधान नरेंद्र मोदी निमंत्रित म्हणून गेले होते. त्या परिषदेस जी-सेव्हन गटातील एक देश कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हेही होते. मोदी आणि ट्रुडो यांची भेट झाली, चर्चाही झाली. या भेटीनंतर काही दिवसांनीच म्हणजे १८ जून रोजी कॅनडाच्या पार्लमेंटमध्ये हरदीप निज्जर या खलिस्तानवादी अतिरेक्याच्या पहिल्या ‘स्मृतिदिना’निमित्त काही क्षण शांतता पाळण्यात आली. या आदरांजली प्रस्तावाचे प्रणेते अर्थातच ट्रुडो होते. म्हणजे इटलीतील भेटीतून फार काही हाती लागले नाही, हे स्पष्ट आहे. ज्या ‘महान’ व्यक्तीस कॅनडासारख्या अत्यंत प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या लोकशाही देशाच्या कायदेमंडळात नि:शब्द आदरांजली वाहण्यात आली, तिची महती समजून घेणे आवश्यक ठरते.
हरदीपसिंग निज्जर हा भारतातून बनावट पारपत्राच्या आधारे कॅनडात गेला. तेथे पहिल्या प्रयत्नात त्याला कॅनडाचे नागरिकत्व नाकारण्यात आले. तत्पूर्वी १९९५ मध्ये त्याला पंजाबमध्ये विभाजनवादी उद्याोग केल्याबद्दल अटक झाली होती. कॅनडात गेल्यावर त्याने शपथपत्रावर, पंजाब पोलिसांनी आपला कसा छळ केला हे सांगितले. त्यासाठी सादर केलेले वैद्याकीय प्रमाणपत्र बनावट असल्याचे कॅनडाच्या पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने एका महिलेशी विवाह केला आणि नागरिकत्वासाठी पुन्हा अर्ज केला. पण हा विवाह ‘सोयीस्कर’ असल्याचे सांगत अर्ज फेटाळण्यात आला. अखेरीस काही वर्षांनी त्यास नागरिकत्व बहाल करण्यात आले.
‘खलिस्तान टायगर फोर्स’, ‘जस्टिस फॉर सिख’ अशा अनेक संघटनांसाठी निज्जर कॅनडात राहून काम करत होता. भारताविरोधात कारवायांना खतपाणी घालत होता. या असल्या व्यक्तीला पोलीस बुकांशिवाय इतरत्र स्थान मिळण्याचे काही प्रयोजन नाही. पण ट्रुडो यांना भारताला खिजवण्यासाठी आणि विभाजनवादी शिखांकडून राजकीय पाठबळ मिळावे यासाठी निज्जरसारख्यांप्रति सहवेदना प्रकट करावीशी वाटते, यात त्यांच्यातील परिपक्वतेचा सपशेल अभावच दिसून येतो. पुन्हा कॅनडा म्हणजे दहशतवादास राजाश्रय देणारा पाकिस्तानसारखा देश नव्हे, असे जग मानून चालते. बाकीच्या देशांनी आपापली पातळी सांभाळली पाहिजे. आम्ही मात्र आम्हाला वाटेल तेव्हा पातळी सोडू, हेच कॅनडाला सांगायचे असेल तर कठीण आहे.
या कृत्याचा मुत्सद्दी पातळीवरून निषेध करतानाच व्हँकुवरमधील भारतीय दूतावास शाखेने येत्या २३ जून रोजी एअर इंडिया विमान बॉम्बस्फोटा घटनेच्या ३९व्या स्मृतिदिनी प्रार्थनासभा आयोजित केली आहे. निज्जर आदरांजलीच्या वेडगळ प्रकारास प्रत्युत्तर म्हणून व निज्जरसारख्यांनी खलिस्तानच्या नावाखाली कॅनेडियन भारतीयांना कशी हानी पोहोचवली, याविषयी संवेदना जागवण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. एअर इंडियाचे ‘कनिष्क’ विमान २३ जून १९८५ रोजी अटलांटिक महासागरावर बॉम्बस्फोटाने उडवण्यात आले. हा बॉम्ब खलिस्तानवादी अतिरेक्यांनी पेरला होता. त्या दुर्घटनेत ३२९ जण प्राणास मुकले. यात २६८ कॅनेडियन नागरिक, २७ ब्रिटिश नागरिक व २४ भारतीय नागरिकांचा समावेश होता. प्रवासी विमानास लक्ष्य करणारा ९/११ पूर्वीचा तो सर्वाधिक भीषण हल्ला होता. कॅनडाच्या गुप्तचर संस्थांनी भारत आणि इतर देशांकडून मिळालेल्या माहितीवरून तत्पर हालचाली केल्या असत्या तर हा हल्ला घडलाच नसता. यानंतरही कॅनडाच्या तपास संस्थांचा अजागळपणा वेळोवेळी दिसून आला. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच रिपुदमन सिंग हा त्या कटाचा सूत्रधार निर्दोष सुटला. पुढे त्याचा खून झाला, त्या कृत्यात निज्जरचाच हात होता असा दाट संशय आहे.
भारतीय नागरिक, दूतावास कर्मचारी यांना त्रास देणारे आणि खलिस्तानची मागणी रेटणारे कॅनडातील अनेक विभाजनवादी स्वत: मात्र एकजूट दाखवत नाहीत आणि परस्परांचा काटा काढण्यातच मश्गूल असतात. दहशतवादाची झळ सर्वाधिक बसलेल्या देशांमध्ये भारताचे नाव आघाडीवर आहे. अशा देशाला त्रास देणाऱ्यांचा सन्मान केल्याने कॅनडाच्या लोकशाहीचेच हसे होते. भारतानेही या विभाजनवाद्यांच्या विरोधात कनिष्क दुर्घटनाग्रस्तांसाठी प्रार्थनासभेसारख्या विधायक मार्गांनीच लढा सुरू ठेवावा आणि आपण कॅनडापेक्षा काही पट परिपक्व असल्याचे दाखवून द्यावे. त्याचबरोबर कडवट कुरापतींचा मोह आवर्जून टाळावा.