सलग दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला, तोही सलग दुसऱ्यांदा तीन कसोटी गमावून. न्यूझीलंडविरुद्ध ०-३ अशी हार नामुष्कीजनक होतीच; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-३ अशी हार अधिक झोंबणारी ठरली. कारण त्या मालिकेची सुरुवात भारताने अनपेक्षित सनसनाटी विजयाने केली होती. चौथ्या कसोटीत शेवटच्या दिवशी शेवटचे सत्र खेळून काढले असते, तर एक पराभव टाळता आला असता. शेवटच्या कसोटीतही काही काळ भारताचे वर्चस्व होतेच. अर्थात ब्रिस्बेनच्या कसोटीत पाहुण्यांना पावसाने हात दिला, हे दुर्लक्षिता येत नाही. संपूर्ण मालिकेत पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता एकही दिवस असा गेला नाही, ज्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली किंवा रविचंद्रन अश्विन यांच्या संघातील स्थानाविषयी चर्चा झाली नसेल. या चर्चासत्रांनी संबंधितांची वा इतरांचीही एकाग्रता मैदानावर टिकण्याची शक्यता मावळते. शिवाय या चर्चांमुळे व्यापक त्रुटींकडे दुर्लक्ष होते किंवा त्या सुधारण्याची संधी मिळत नाही. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या कामगिरीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासूनच कमालीची घसरण सुरू आहे. त्याच्या जरा आधी भारताने टी-ट्वेण्टी विश्वचषक जिंकला आणि या दोघांनी निवृत्ती जाहीर केली. त्या उत्साही आणि उत्सवी साजरेकरणामध्ये आगामी आव्हानांचे भान पुरेसे राहिले नाही असेच म्हणावे लागेल. बॉर्डर-गावस्कर करंडकाला कसोटी क्रिकेट विश्वात अॅशेसपेक्षाही अधिक महत्त्व आल्याचे अनेक ऑस्ट्रेलियन आजी-माजी क्रिकेटपटूही मान्य करतात. या मालिकेवरच भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान अवलंबून होते. गेली दहा वर्षे हा मानाचा करंडक भारताने स्वत:कडे राखला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून तो जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार हेही निश्चित होते. इतक्या महत्त्वाच्या मालिकेसाठी भारतीय संघाची सिद्धता पुरेशी होती का, याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल.

संपूर्ण मालिकेत विविध आघाड्यांवर सातत्य या घटकाचा विलक्षण अभाव दिसून आला. पहिल्या आणि शेवटच्या कसोटीसाठी कर्णधार वेगळा, प्रत्येक कसोटी सामन्यात फलंदाज आणि फलंदाजी क्रम निराळे, प्रत्येक कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराचा अपवाद वगळता गोलंदाजही वेगळे. अश्विनने मालिकेच्या मध्यावर निवृत्ती जाहीर केली, कारण प्रत्येक सामन्यात आपल्याला खेळायला मिळेल की नाही याबाबत त्यालाच अंदाज बांधता येत नव्हता. दोन यष्टिरक्षक हाताशी असूनही आपण कायम ऋषभ पंतवर विसंबून राहिलो आणि त्याने पाचपैकी एकदाच भरवशाची फलंदाजी केली, बाकीच्या डावांमध्ये निराशा केली. कदाचित काहीच अपेक्षा नसताना पहिली कसोटी जिंकल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती गाफील राहिली.

Loksatta editorial on Rivalry in many districts for the post of Guardian Minister Cabinet
अग्रलेख: मारक पालक नकोत!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta vyaktivedh Actress Demi Moore autobiography Inside Out
व्यक्तिवेध: डेमी मूर
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, भारतीय क्रिकेटला दशकानुदशके लागून राहिलेली व्यक्तिकेंद्री मानसिकतेची कीड ऑस्ट्रेलियात अधिक ठसठशीतपणे उपटली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना प्रशिक्षक गौतम गंभीरने खडे बोल सुनावायला हवे होते. त्याच्या शाब्दिक फैरी ते दोघे सोडून इतरेजनांवरच चालल्या. ऋषभ पंतची खेळपट्टीवरील मनमानी एका चांगल्या मालिका विजयाच्या पुण्याईवर आणखी किती दिवस चालणार, असे गंभीरनेच त्याला विचारायला हवे होते. गेल्या कसोटी मालिकेत वलयांकित चेहरे नव्हते. अजिंक्य रहाणे या निर्विष, अबोल परंतु तरीही अत्यंत धीरोदात्त आणि कल्पक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने असामान्य विजय मिळवून दाखवला. त्याला आणि त्याच्या संघाला ते जमले कारण सारे लक्ष खेळ आणि खेळपट्टीकडे लागले होते. अजिंक्यच्या प्रभावामुळे असेल, पण रवी शास्त्रींसारखे अतिव्यक्त व्यवस्थापकही मार्गदर्शन आणि दिशादर्शनापुरतेच सक्रिय राहिले. याच्या पूर्णतया विपरीत यंदाच्या मालिकेतील सर्कस ठरली. रोहित शर्माने अखेर स्वत:हून संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला. तसा तो विराट कोहलीला घेता येत नव्हता काय? स्वत:ची कामगिरी (पहिल्या कसोटीचा अपवाद वगळता) सुमार असूनही विराटच्या मर्कटलीला मैदानावर सुरूच राहिल्या. बुमराने जीव तोडून गोलंदाजी केली आणि अखेरीस त्याची पाठ मोडली. ती नजीकच्या भविष्यात स्थिरस्थावर होण्याची चिन्हे नाहीत. गंभीरने सर्व अपेशींना स्थानिक क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. अर्धा हंगाम तर उलटून गेला, आता स्थानिक क्रिकेट म्हणून जे काही शिल्लक आहे त्याचा बराचसा भाग आयपीएलव्याप्तच असेल! तेव्हा तो सल्ला देणारा गंभीर आणि रोहित-विराट कसोटी क्रिकेटविषयी खरोखरच किती ‘गंभीर’ आहेत हे या मालिकेने दाखवून दिले.

Story img Loader