सलग दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला, तोही सलग दुसऱ्यांदा तीन कसोटी गमावून. न्यूझीलंडविरुद्ध ०-३ अशी हार नामुष्कीजनक होतीच; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-३ अशी हार अधिक झोंबणारी ठरली. कारण त्या मालिकेची सुरुवात भारताने अनपेक्षित सनसनाटी विजयाने केली होती. चौथ्या कसोटीत शेवटच्या दिवशी शेवटचे सत्र खेळून काढले असते, तर एक पराभव टाळता आला असता. शेवटच्या कसोटीतही काही काळ भारताचे वर्चस्व होतेच. अर्थात ब्रिस्बेनच्या कसोटीत पाहुण्यांना पावसाने हात दिला, हे दुर्लक्षिता येत नाही. संपूर्ण मालिकेत पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता एकही दिवस असा गेला नाही, ज्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली किंवा रविचंद्रन अश्विन यांच्या संघातील स्थानाविषयी चर्चा झाली नसेल. या चर्चासत्रांनी संबंधितांची वा इतरांचीही एकाग्रता मैदानावर टिकण्याची शक्यता मावळते. शिवाय या चर्चांमुळे व्यापक त्रुटींकडे दुर्लक्ष होते किंवा त्या सुधारण्याची संधी मिळत नाही. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या कामगिरीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासूनच कमालीची घसरण सुरू आहे. त्याच्या जरा आधी भारताने टी-ट्वेण्टी विश्वचषक जिंकला आणि या दोघांनी निवृत्ती जाहीर केली. त्या उत्साही आणि उत्सवी साजरेकरणामध्ये आगामी आव्हानांचे भान पुरेसे राहिले नाही असेच म्हणावे लागेल. बॉर्डर-गावस्कर करंडकाला कसोटी क्रिकेट विश्वात अॅशेसपेक्षाही अधिक महत्त्व आल्याचे अनेक ऑस्ट्रेलियन आजी-माजी क्रिकेटपटूही मान्य करतात. या मालिकेवरच भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान अवलंबून होते. गेली दहा वर्षे हा मानाचा करंडक भारताने स्वत:कडे राखला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून तो जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार हेही निश्चित होते. इतक्या महत्त्वाच्या मालिकेसाठी भारतीय संघाची सिद्धता पुरेशी होती का, याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा