आषाढातही कोसळणेश्रावणातही कोसळणे, भाद्रपदातही कोसळणे आणि मग कधीही, कोणत्याही काळी, जरा वाऱ्यांनी हवेत आर्द्रता भरण्याचा अवकाश, की पुन्हा फक्त कोसळणेच! पाऊसही आताशा एकसुरी किंबहुना ‘एकसरी’ झालेला आहे. झिमझिमणे, रिमझिमणे, रुणझुणणे बंद होऊन केवळ कोसळणे उरले की असे होते. ‘कमी वेळात खूप जास्त पाऊस’ हे समीकरण गेल्या सुमारे दशकभरापासून रुळू लागले आहे. खरे तर असे होणार, याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पावसाच्या अनेक अभ्यासांतून, शोधनिबंधांतून १५ वर्षांपूर्वीच वर्तवून ठेवले होते. पण यंत्रणेला तसेही शास्त्रीय दृष्टिकोनाचे वावडे असल्याने या अभ्यासांतील इशाऱ्यांनी जागे होऊन, त्याप्रमाणे व्यवस्थांमध्ये सुधारणा कराव्यात, असे कधीही सुचले नाही.

यंदाच्या पावसाळ्यात पुण्या-मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी अत्यंत कमी कालावधीत १०० मिलिमीटरहून अधिक पावसाच्या नोंदी सातत्याने होत आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज गावातील पावसाने तर यंदा चेरापुंजीशी स्पर्धा केली. आधी कोरड्या राहिलेल्या मराठवाड्याचीही पावसाने नंतर पुरती दाणादाण उडवली. विदर्भातही तेच. पुण्यात परवा सप्टेंबरच्या सरासरीच्या ७२ टक्के पाऊस अवघ्या दोन तासांत कोसळला. मुंबईत त्याच दिवशी अनेक ठिकाणी काही तासांच्या पावसाने २०० मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. हिंदमाता, साकीनाका, टिळकनगर, घाटकोपर, भेंडी बाजार, गोरेगाव, कांदिवली आदी अनेक ठिकाणी पाणी तुंबून वाहतुकीचा, लोकलचा खोळंबा झाला. सप्टेंबरमधील या पावसाने शेतीचेही बरेच नुकसान केले. काढणीला आलेल्या उभ्या पिकांना बसलेला फटका शेतकऱ्यांसाठी वेदनादायी आहे. सोयाबीन, कांदा, भुईमूग, बाजरी, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभरातील सुमारे ३२ हजार ९९७ हेक्टर एवढे क्षेत्र गेल्या तीन दिवसांतील पावसाने बाधित झाल्याचा अंदाज आहे. त्यातही सर्वाधिक फटका मराठवाड्याला आणि तेथील सोयाबीनला बसला आहे. याची झळ शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला आणि अंतिमत: ग्राहकालाही बसणार आहेच.

पुन:पुन्हा प्रश्न उपस्थित होतो आहे तो हा, की पाऊस आता लहरीपणानेच वागणार आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसणार, हे माहीत असूनही त्यानुरूप बदल करण्याची पावले उचलली कधी जाणार आहेत? पावसाचा अंदाज हा त्यातील अग्रक्रमाचा मुद्दा. उपग्रह, रडार या उपकरणांची आधुनिक रूपे नक्की काय माहिती पुरवतात आणि त्याद्वारे अचूक अंदाज सर्वदूर पोहोचतो का, हा प्रश्न सर्वसामान्यांना कायमच पडतो. कारण पावसाचा ‘लाल इशारा’ दिला, की ऊन पडते आणि इशारा नसताना पाऊस झोडपतो. संपर्काची अत्याधुनिक साधने उपलब्ध असतानाही नदीकाठच्या रहिवाशांना धरणांतून पाणी सोडल्याचे कळते केव्हा, तर घरात पाणी शिरल्यावर. या अवस्थेमुळे किंबहुना अनास्थेमुळे विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतो आहे, हे या सगळ्या यंत्रणा समजून घेणार आहेत की नाहीत? पाऊस नसल्याने आणि फार जास्त पडल्याने, अशा दोन्ही स्थितींत शेती आणि शेतकऱ्याचे केवळ नुकसानच होते. केवळ ढोबळ अंदाज देऊन ते टळणार नाही. त्यासाठी पीकपद्धतीत व्यापक बदल करावे लागणार आहेत. ते करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीवरील अभ्यासकांकडून या मुद्द्यावरही व्यापक अभ्यास, प्रयोग आणि सातत्यपूर्ण संशोधनाची अपेक्षा आहे.

पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच काय ठोस उपाययोजना करता येतील, याचा पडताळा शेतीप्रमाणेच शहरांच्या व्यवस्थापनातही घ्यायला हवा आहे. दोन तासांत शंभर मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर नोकरदारांना शहराच्या एका टोकाकडून दुसरीकडे पोचेपर्यंत तीन तासांहून अधिक वेळ लागणार असेल, तर ‘काम-वैयक्तिक आयुष्य समतोल’ या केवळ आदर्श गप्पाच राहतात. पावसाच्या माऱ्यात शहरातील अनेकांचे उत्पादक तास वाया जात असतील, तर तेही मोठेच आर्थिक नुकसान आहे. ते टाळण्यासाठी खासगी कंपन्यांची धोरणे ठरवतानाही लहरी हवामानाचा मुद्दा प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवा आहे. अत्याधुनिक संपर्क साधने उपलब्ध असतानाच्या काळात ते फारसे कठीण नाही. बाकी ‘येरे येरे पावसा… पैसा झाला खोटा. या बालगीतापासून पाऊस कवितेत राहिला आहे, तो राहीलच, त्याचा लहरीपणा यंत्रणांच्या जाणिवेत रुजावा, म्हणजे सामान्य माणसाचे जीवन सुकर होण्यासाठी त्याचा काही तरी उपयोग होईल.