पश्चिम आशियात सध्या उडालेल्या भीषण संघर्षांतून एकच सकारात्मक घडामोड पाहायला मिळत होती. इस्रायलच्या अस्तित्वाला मान्यता देण्यासाठी कधी नव्हे इतक्या संख्येने आणि अभूतपूर्व इच्छाशक्तीने अरब राष्ट्रे राजी झाली आहेत. यांत प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल सौदी अरेबियाचे. इस्रायल-हमास संघर्ष थांबावा आणि हजारो गाझावासीयांचे नि काही इस्रायली ओलिसांचे नष्टचर्य संपावे यासाठी अनेक पातळय़ांवर प्रयत्न सुरू झाले आहेत. इजिप्त, जॉर्डन यांनी यापूर्वीच इस्रायलला मान्यता दिलेली आहे. सध्याच्या संघर्षांला पूर्णविराम किंवा स्वल्पविराम मिळावा यासाठी कधी इजिप्त-कतार, कधी अमेरिका-सौदी अरेबिया अशा बैठका सुरू आहेत. इजिप्त आणि कतार प्राधान्याने हमासशी संपर्क ठेवून आहेत. सौदी अरेबिया अमेरिकेशी संपर्कात असून, अमेरिका सातत्याने इस्रायलशी म्हणजे अर्थात त्या देशाचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा करत आहे. गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायली हद्दीत केलेल्या नृशंस हल्ल्यानंतर संघर्षांला तोंड फुटले. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन या भागात पाच वेळा आले आणि त्यांनी वाटाघाटींच्या माध्यमातून नेतान्याहू यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. या शिष्टाईला अजिबात यश आलेले नाही. इस्रायलची गाझा मोहीम थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट बुधवारच्या दोन घटनांचा वेध घेतल्यास राजकीय स्वार्थासाठी तो चिघळवत ठेवणे हेच नेतान्याहूंचे उद्दिष्ट दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा