‘मी तुम्हाला विनंती करतो, की स्टेडियममध्ये या आणि भारताचा फुटबॉल सामना पाहा. तुमचा वेळ वाया जाणार नाही, ही खात्री आम्ही देतो. भारतीय फुटबॉलवरील तुमचा विश्वास कमी झाला आहे, मला ठाऊक आहे; पण केवळ समाजमाध्यमांवरून टीका करण्यात काय मजा! स्टेडियममध्ये या, आम्हाला प्रोत्साहन द्या, आम्ही नाही चांगले खेळलो, तर आमच्यावर जरूर ओरडा. कोणी सांगावे, आम्ही तुम्हाला बदलू शकू आणि आमच्यावर टीका करणारे तुम्ही, आम्हाला डोक्यावर घेणारे झालेले आम्ही पाहू शकू..’ सन २०१८ मध्ये इंटरकॉन्टिनेन्टल करंडक स्पर्धेच्या वेळी भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने  केलेले हे आवाहन फुटबॉल प्रेक्षकांनी ऐकले, भारताच्या पुढच्या सामन्यांना प्रेक्षकांनी जोमाने हजेरी लावली. ही स्पर्धा भारत सुनील छेत्रीच्याच नेतृत्वाखाली जिंकला. छेत्री निवृत्त होत असताना या प्रसंगाची उजळणी अशासाठी महत्त्वाची की, भारतीय फुटबॉल प्रवासात गेल्या दोन दशकांत जे काही चमकते क्षण आले, त्याचे निर्माणिबदू सुनील छेत्री या व्यक्तिमत्त्वात आहेत. इतकेच नाही, तर १९९५ पासून बायचुंग भुतियाने भारतीय फुटबॉलमध्ये आणलेली जी जान होती, तिचा दमसास टिकविण्यातही छेत्रीची कळीची भूमिका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीयांना कोणत्याही खेळात एखादा तारा लागतो. क्रिकेटने अनेक दिले. हॉकीत काही काळापूर्वीपर्यंत होते. फुटबॉलमधील शोधण्यासाठी खूप मागे जावे लागते. मुळात पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ईशान्य भारत सोडला, तर फुटबॉल भारतात तितकासा लोकप्रिय नव्हता. तरी पन्नासच्या दशकात पी. के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी, बगाराम आदींमुळे जगात भारतीय फुटबॉलचा डंका वाजत होता. १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये आपण उपान्त्य फेरीपर्यंतही पोचलो होतो. अर्थात, असा जिंकणारा संघ घडविण्यात मार्गदर्शक सइद अब्दुल रहीम यांचाही मोठा वाटा होता. तरीही ‘भारतीय संघाने अनवाणी खेळण्याची मागणी केली म्हणून १९५० च्या फुटबॉल विश्वकरंडकात आपल्याला स्थान मिळाले नाही,’ वगैरे दंतकथांमध्येच आपला फुटबॉल इतिहास झाकोळला आहे. आपण १९४८ च्या ऑलिम्पिक स्पर्धात अनवाणी खेळलोही; पण विश्वकरंडकात न जाण्याचे कारण ते नव्हते. १९५० च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी ब्राझीलने आपल्याला निमंत्रण धाडले, संघाचा खर्चही करायची तयारी दर्शवली होती; पण अ. भा. फुटबॉल महासंघाला जहाजाने अर्धी जगप्रदक्षिणा करून अशा ‘छोटय़ा स्पर्धे’त संघ पाठवणे महत्त्वाचे वाटले नाही. या स्पर्धेपेक्षा ऑलिम्पिक महत्त्वाचे आहे, या कारणाखाली संघ गेला नाही! एखाद्या खेळाचे बहरणे कसे खुडले जाऊ शकते, त्याचे हे उत्तम उदाहरण.

त्यामुळेच साठच्या दशकाच्या उत्तरार्धापासून साधारण नव्वदचे दशक उजाडेपर्यंत भारतीय फुटबॉलबद्दल फार चर्चाही झाली नाही. मोजके क्लब, संघ आपापल्या परीने प्रयत्न करत होते आणि सामने होत होते इतकेच. दूरदर्शनने १९८६ च्या विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना प्रक्षेपित केल्यावर, हळूहळू चित्र बदलू लागले. जागतिकीकरणानंतर केबल टीव्हीने युरोपात खेळल्या जाणाऱ्या साखळी स्पर्धा भारतीयांत लोकप्रिय केल्या आणि मग पुन्हा आपण या सगळय़ात कुठे आहोत, या चर्चा अवतरल्या. बायचुंग भुतियाचा उदय याच काळातला आणि तो पूर्ण बहरात असताना २००५ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली पदार्पणाचा सामना खेळताना हॅटट्रिक करून भुतियाचा वारसदार म्हणून संघात आलेला सुनील छेत्री त्याच्या पुढचा. भारतीय फुटबॉलही अत्यंत गुणवान खेळाडू निर्माण करू शकतो, हे भुतियाने जगाला दाखवून दिले; तर गुणवान खेळाडू कर्णधारपदी पोचल्यावर संघालाही जिंकवू शकतो, हा विश्वास छेत्रीने दिला. त्याच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या जेतेपदांची संख्या मोठी आहेच; पण त्याने ज्या पद्धतीने चाहत्यांची मने जिंकली आणि त्यांना भारतीय फुटबॉलमध्ये रुची निर्माण केली, त्याचे मोल किती तरी अधिक आहे.

फुटबॉलप्रेमी कुटुंबात जन्मलेल्या छेत्रीचे वडील फुटबॉलपटू होते. छेत्रीनेही एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मिळालेल्या पासवर गोल करण्याची आणि त्यासाठी संधी निर्माण करण्याची त्याची क्षमता केवळ लाजवाब. सर्वाधिक वैयक्तिक आंतरराष्ट्रीय गोल मारणाऱ्या जगातील सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत तो तिसऱ्या स्थानावर आहे, तो उगाच नाही. अत्यंत तंदुरुस्त असूनही त्याने ३९व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. कोणत्याही विक्रमी आकडय़ासाठी न रखडता त्याने हे केले. येत्या ६ जूनला कुवेतविरुद्धचा विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रतेसाठीचा सामना त्याचा अखेरचा ठरेल. छेत्रीने निवृत्ती जाहीर केल्याच्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत त्याच्या मोबाइल फोनवर ६८८ ‘मिस्ड कॉल्स’ होते. साहजिकच आता भारतीय फुटबॉलपुढेही प्रश्न आहे, ‘छेत्रीनंतर पुढे कोण?’