मणिपूरमध्ये गेले १६ महिने सुरू असलेला वांशिक संघर्ष अधिकच गंभीर वळण घेऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांत तिथे ड्रोनमधून दोन बॉम्बहल्ले करण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. नागरी वस्त्यांवर ड्रोनमधून बॉम्बहल्ले झाल्याने सुरक्षा यंत्रणाही अधिक सावध झाल्या आहेत. हे हल्ले वाढण्याची शक्यता लक्षात घेता मणिपूर पोलिसांनी ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता एनएसजी या दहशतवादविरोधी यंत्रणेकडे मदत मागितली आहे. कुकी-झो या आदिवासी प्राबल्य असलेल्या भागातून मैतेईंच्या वस्तीवर ड्रोनचा हल्ला करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या वांशिक संघर्षात प्रथमच ड्रोनमधून बॉम्बहल्ला करण्यात आला. मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. मैतेई आणि कुकी-झो या दोन जमातींमधील संघर्ष कमालीचा विकोपाला गेला आहे. या वांशिक संघर्षात आतापर्यंत २२५ पेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले तर हजारो लोक विस्थापित झाले. मैतेईंचे प्राबल्य असलेल्या राजधानी इंफाळ किंवा अन्य परिसरात कुकी प्रवेश करू शकत नाहीत वा कुकींचे प्राबल्य असलेल्या डोंगराळ भागात मैतेईना बंदी आहे. या दोन जमातींमध्ये केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना सुरक्षेची भिंत तयार करावी लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा