अभ्यास व त्याच्या तपशीलवार मांडणीच्या बळावर विचारांचा दबदबा निर्माण करणे एक वेळ समजून घेता यईल. मग इतरांना तो विचार भले जहाल व कडवा का वाटेना. मात्र अशाच विचारांचा प्रचार करण्यासाठी धमकी, मारहाण आदी हिंसक कृत्यांचा आधार घेणे हा दहशत निर्माण करण्याचाच प्रकार. अलीकडे अनेक विद्यापीठांना त्याची वेगाने लागण होत असल्याचे दिसते, हे शैक्षणिक वर्तुळासाठी धोक्याचे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अन्य धर्मीय विद्यार्थिनीशी मैत्री करण्यावरून एका मुस्लीम विद्यार्थ्यांला झालेली मारहाण याच धोक्याची जाणीव करून देणारी ठरते. वेगवेगळे विचारप्रवाह अंतर्भूत असलेल्या विद्यांचा प्रसार करणारी ही पीठे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची केंद्रे म्हणूनच ओळखली जातात. अलीकडच्या काही वर्षांत या परिसरांना पडलेला कडवेपणाचा विळखा ही ओळखच पुसून टाकतो की काय अशी शंका आता येऊ लागली. दिल्लीतील जेएनयूपासून सुरू झालेल्या या वाईट प्रवासाचे लोण हळूहळू राज्यातील विद्यापीठांत पसरणे हे चिंताजनक. वास्तविक दोन सज्ञान व्यक्तींनी मैत्री, प्रेम कुणाशी करावे अथवा करू नये हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. त्यात तिसऱ्याला लुडबुड करण्याचा अधिकार नाही. तरीही त्यात कुणी सत्तेच्या जोरावर हस्तक्षेप करत असेल व कारवाईपासून त्याला संरक्षण मिळत असेल तर हा दहशतीचा वणवा वेगाने पसरायला वेळ लागणार नाही. याआधीही याच विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात एका नाटकाचा खेळ बंद पाडला गेला. कलावंत विद्यार्थ्यांना मारहाण झाली. अशीच झुंडशाही इतर विद्यापीठातसुद्धा आता डोके वर काढू लागलेली. अलीकडे जाणीवपूर्वक वादाचा विषय ठरवल्या गेलेल्या सावरकरांवर नाटय़प्रयोग का केला म्हणून त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार नागपूरच्या तुकडोजी महाराज विद्यापीठात घडला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही जाळलेली जागा गोमूत्राने स्वच्छ करण्याचा प्रयत्नही झाला. हे सारे प्रकार वैचारिक वादविवादाची परंपरा लयाला जाऊन ठोकशाहीच तेवढी उरली हे दर्शवणारे. त्यात उजवे, डावे व मध्यममार्गी असे सारेच सामील. मग ज्या हेतूने या विद्यापीठांची उभारणी झाली त्या शैक्षणिक सुधारणा, विकास व विद्यार्थ्यांच्या कल्याणाचे काय? तो मागे पडत चालला याची चिंता कुणालाच कशी वाटत नाही?
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
अभ्यास व त्याच्या तपशीलवार मांडणीच्या बळावर विचारांचा दबदबा निर्माण करणे एक वेळ समजून घेता यईल. मग इतरांना तो विचार भले जहाल व कडवा का वाटेना.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-04-2024 at 00:04 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth muslim students beaten up in savitribai phule university pune amy