दुसऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नैतिकतेतून मिळत असतो. ती करण्याआधी आपण स्वत: किती स्वच्छ हे तपासून बघण्याची सवय अंगी बाणावी लागते. ही आत्मपरीक्षणाची सवय आता राजकारणातून जवळपास हद्दपार झालेली आहे. व्यवहारवादाला आदर्श मानणाऱ्या राजकारण्यांनी ती पार विकून खाल्लेली दिसते. अशांच्या या क्षेत्रात आता नीलम गोऱ्हे शिरोमणी होऊ पाहतात की काय? दिल्लीत पार पडलेल्या साहित्य संमेलनातील त्यांचे ताजे वक्तव्य या शंकेला बळ देते. कुणा एकेकाळी स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेत रामदास आठवले, प्रकाश आंबेडकरांच्या साथीने समाजकारण व राजकारण करणाऱ्या गोऱ्हेंना नंतर हिंदुत्ववादी असल्याचा साक्षात्कार झाला व त्या शिवसेनेत गेल्या. तिथे दीर्घकाळ सत्ता भोगल्यावर ती टिकवण्यासाठी त्या शिंदेंच्या म्हणजे ‘अधिकृत’ सेनेत प्रवेश करत्या झाल्या. इतक्या वैचारिक कोलांटउड्यांनंतर निदान शांत बसावे व वाट्याला आलेल्या पदाचा सुखेनैव उपभोग घ्यावा तर तसेही नाही. आता त्यांना आणखी प्रखर हिंदुत्ववादी होण्याचे वेध लागलेले दिसतात. संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेले राजकीय वक्तव्य हेच दर्शवते. ठाकरेंच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडिज द्याव्या लागतात असे म्हणणाऱ्या गोऱ्हेंनी प्रत्येक वेळी विधान परिषद मिळवण्यासाठी आजवर किती गाड्या दिल्या, असा प्रतिप्रश्न कुणी करू शकेल याचेही भान राहिले नाही.

याच गोऱ्हेंनी खूप वर्षांआधी पुरोगामीपणाशी घटस्फोट घेत सेनेचा गंडादोरा बांधताना ५१ हजारांची देणगी दिली होती म्हणे! तेव्हा एवढ्या किमतीत मर्सिडिजचे टायरही मिळायचे नाहीत हे त्यांना कोण सांगणार? मुळात साहित्याच्या मंचावरून अशी राजकीय मळमळ ओकायची काहीच गरज नव्हती. तरीही त्या बोलल्या याचे कारण, आहे ते पद टिकवण्यात म्हणजे सत्तालोलुपतेत दडलेले. फार वर्षांपूर्वी काम करून निष्ठा सिद्ध केली जात असे. आता विरोधकांवर टीका करून ती केली जाते. वैचारिक व्यभिचाराला सरावलेल्या राजकारण्यांचे गुण गोऱ्हेंनी फारच जलदगतीने आत्मसात केले असे खेदाने का होईना पण म्हणावे लागते. सभागृहातील आहे त्यापेक्षा वरिष्ठ पदाने ऐनवेळी हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या हिरमोडातून अजून त्या बाहेर आलेल्या दिसत नाहीत. त्यासाठी आणखी काय काय करावे लागेल या विचाराच्या नादात त्यांनी ही आगळीक केली असावी. ती त्यांच्या अंगलट येण्याचीच शक्यता जास्त. कारण आता ठाकरेंच्या सेनेचे अनेक लोक गोऱ्हेंनी काय काय मागितले हे उघडपणे बोलू लागले आहेत. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने स्वत:वरच अशी चिखल उडवून घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी याला राज्याची अधोगती नाही तर आणखी काय म्हणायचे?

या गोऱ्हेंना दिल्लीत बोलावलेच कसे हाही तसा संशोधनाचा विषय. त्यांनी (की प्रकाशकांनी) काढलेले एकमेव पुस्तक त्यांच्या नावावर. तरीही व्यासपीठ मिळावे म्हणून नेहमी जिवाचे रान करणाऱ्या गोऱ्हेंनी हा योग जुळवून आणला. त्याचा फायदा त्यांना स्त्री-पुरुष समानता, महिलांवरील अत्याचार यासंदर्भातली नेहमीची टाळीबाज वाक्ये फेकून करून घेता आला असता. पण इथे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आड आलेली दिसली. यापायी चळवळीतून राजकारणात आलेल्या अनेकांची माती झाली. आता त्यात गोऱ्हेंच्या नावाचा समावेश करावा लागेल. प्रसिद्धीचा हव्यास दुधारी तलवारीसारखा असतो. या हव्यासाने झपाटले की स्वत:चीच मान कापली जाण्याची भीती वाढते. गोऱ्हेंच्या बाबतीत नेमके तेच होण्याचा धोका जास्त. राजकारणातील अर्थकारण त्यात सक्रिय असलेल्या कुणासाठीही नवे नाही व याला कोणताच पक्ष अपवादसुद्धा नाही. पाठीशी बोटांवर मोजण्याइतकेही कार्यकर्त्यांचे बळ नसलेल्या तरीही इतकी वर्षे पदे भोगणाऱ्या गोऱ्हेंना हेही कळू नये म्हणजे जरा अतिच झाले म्हणायचे. चळवळीतून राजकारणात आलेल्यांनी कितीही राजकीय तडजोडी केल्या तरी त्यांचा वैचारिक पाया मजबूत असतो असा सर्वसाधारण समज. त्याला छेद देण्याचे काम गोऱ्हेंनी अलीकडच्या काळात सातत्याने केले व दिल्लीत त्यावर कळस चढवला इतकेच.

आपल्या बोलण्याला वजन असावे याची दक्षता राजकारणातील पन्नाशी-साठीचे नेते आजही घेत असतात. इतके हलके वक्तव्य करून गोऱ्हेंनी तीही संधी हातची घालवली आहे. जेव्हा स्वत:चा पाय चिखलात असतो तेव्हा इतरांवर तो उडणार नाही याची काळजी घेणे हा स्वभावधर्म. राजकारणात याला राजकीय शहाणपण म्हणतात. त्याचा लवलेशही या माजी चळवळकर्तीमध्ये नसल्याचे रविवारी दिसले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना त्यांचे दीर्घकालीन उद्दिष्ट चूपचाप साध्य करून घेण्यासाठी राजकीय बाजारात अशा लुटुपुटूच्या लढाया गरजेच्या असतात. गोऱ्हेंच्या विधानावरून आता तेच सुरू झाले आहे. दु:ख याचे त्यांना या लढाईतील कळसूत्री बाहुली व्हावे लागले. लाभार्थी ते पोटार्थी या प्रवासातून त्यांची ‘ऐसपैस’ अधोगती तेवढी दिसते… ती उबग आणणारी आणि त्यांचे बुद्धिजीवित्व किती पोकळ आहे, दाखवून देणारी आहे.

Story img Loader