न्यू हॅम्पशायर या अमेरिकेतील सर्वाधिक गौरवर्णीय आणि सर्वाधिक वयस्कर मतदार असलेल्या राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना निकी हॅले कडवी लढत देतील अशी अपेक्षा होती. काहींना त्या जिंकतील आणि ट्रम्पविरोधी आव्हानातील धुगधुगी कायम ठेवतील, असेही वाटत होते. प्रत्यक्ष निकाल हाती आले त्या वेळी रिपब्लिकन पक्षातील ट्रम्प-लाटेमध्ये इतर सर्व विरोधकांप्रमाणेच त्यांची उमेदवारीही पालापाचोळय़ागत उडून गेलेली दिसून आली. निकी हॅले यांच्यात अनेक दोष असले, तरी कॉलेजवयीन, तसेच मध्यममार्गी रिपब्लिकन मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. आयोवाइतकी एकतर्फी झाली नाही, तरी न्यू हॅम्पशायर प्रायमरीमध्ये ट्रम्प यांना मोठे मताधिक्य मिळाले. अशा रीतीने गेल्या दोन आठवडय़ांच्या अवधीमध्ये ट्रम्प यांचे तीन प्रमुख विरोधक- विवेक रामस्वामी, रॉन डेसान्टिस आणि निकी हॅले- नेस्तनाबूत झाले आहेत. यांतील डेसान्टिस आणि रामस्वामी यांनी आता अध्यक्षीय उमेदवारपदाच्या लढतीतूनच सपशेल माघार घेऊन ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ट्रम्प यांचा आक्रस्ताळा राष्ट्रवाद आणि आत्ममग्न अमेरिकावाद याची चटक पारंपरिक आणि रूढीवादी रिपब्लिकन मतदारांना लागली आहे. ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये निवडून आणायचेच या एकाच उद्देशाने ट्रम्प यांचे मतदार एकवटले असून त्यांचा प्रचार अधिक सुसूत्र आणि परिणामकारक दिसून येतो. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या दोन्ही शक्तिप्रदर्शनात- आयोवा मेळावा (कॉकस) आणि न्यू हॅम्पशायर पक्षांतर्गत निवडणूक (प्रायमरी)- ट्रम्प यांच्या चमूने फारसा पैसाही ओतलेला नाही. याउलट त्यांच्या प्रतिस्पध्र्याना निव्वळ अस्तित्व दाखवून देण्यासाठी डॉलरच्या राशी ओताव्या लागत आहेत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावा लागत आहे. अध्यक्ष नसताना ट्रम्प हे आयोवा आणि न्यू हॅम्पशायर असे पहिले दोन अडथळे यशस्वीरीत्या पार करणारे पहिलेच रिपब्लिकन उमेदवार ठरले.

प्रायमरीजचा हा उत्सव आता साऊथ कॅरोलिना राज्याकडे वळणार आहे. निकी हॅले या साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर. पण ट्रम्प यांच्याविरोधात अध्यक्षीय उमेदवारीसाठी पक्षांतर्गत दावा सांगण्यासाठी त्या राज्यात हॅले यांना काही तरी भरीव करून दाखवावे लागेल. ते जमले नाही, तर माघार तरी घ्यावी लागेल. ‘माझ्याविरोधात कोणीच ताकदीचा उमेदवार नसताना, त्यासाठीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पैसा वाया चालला आहे. तो डेमोक्रॅटिक पक्षाविरुद्ध मुख्य निवडणुकीत वापरता येईल,’ असा सूर आळवायला ट्रम्प यांनी सुरुवात केली आहे. निकी हॅले यांनी ट्रम्पपूर्व रिपब्लिकन मतदारांनाही साद घालून पाहिली. पण या मंडळींचे आता पक्षातच फार वजन राहिलेले नाही. ट्रम्प यांना वरकरणी पाठिंबा देणारे, पण त्यांची गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये आणि विशेषत: ६ जानेवारी २०२१ रोजीचा उठाव मान्य नसलेले मतदार आजही आहेत. त्यांना आवाहन करून आपल्याकडे वळवण्याचे जवळपास अशक्यप्राय लक्ष्य गाठण्याचा हॅले यांचा प्रयत्न राहील. हाच मतदार बहुधा अध्यक्षीय निवडणुकीतही डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळू शकतो. मात्र ट्रम्प यांच्या योजनांपेक्षा अधिक व्यवहार्य, समावेशक कार्यक्रम मांडण्याची हॅले यांची स्वत:चीही क्षमता दिसत नाही. त्यामुळे अमेरिकी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन उमेदवारीकडे ट्रम्प यांची वाटचाल निश्चित सुरू आहे. यातून भविष्यातील प्रायमरीज म्हणजे ‘ट्रम्प एके ट्रम्पङ्घ ट्रम्प दुणे ट्रम्प’ अशीच स्थिती दिसते.

न्यू हॅम्पशायरमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचीही प्रायमरी होती. तेथे ‘नको नको’ म्हणत असताना जो बायडेन यांची सरशी झाली. डेमोक्रॅटिक पक्षाने यंदा उमेदवार निवडीचा कार्यक्रम न्यू हॅम्पशायरऐवजी साऊथ कॅरोलिनातून सुरू करायचे ठरवले. पण न्यू हॅम्पशायर राज्याच्या कायद्यानुसार प्रायमरीजची सुरुवात त्याच राज्यातून व्हावी लागते. या गोंधळात तरीही बायडेन यांना त्यांच्या पक्षात इतरांकडून फार मोठे आव्हान मिळाले नाही. रिपब्लिकन पक्षाप्रमाणेच त्या पक्षातही बायडेन या एकमेव उमेदवारासमोर सक्षम पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अमेरिकी न्यायव्यवस्थेने प्रतिबंधित केले नाही तर ट्रम्प विरुद्ध वयाने साथ दिली तर बायडेन अशीच लढत अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये रंगेल.