संसद किंवा विधिमंडळांमध्ये मतदान वा भाषणासाठी लाच घेणाऱ्या खासदार व आमदारांना विशेषाधिकाराचे संरक्षण मिळणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने दिल्यामुळे यापुढे, लाच घेणाऱ्या खासदार वा आमदारांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल करता येणार आहे. खासदार-आमदारांना विशेषाधिकाराचे संरक्षण असावे का, हा गेली अनेक वर्षे चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरला आहे. संसदेत, विधिमंडळांत सदस्यांना आपले विचार मुक्तपणे मांडता यावेत म्हणून त्यांना राज्यघटनेने विशेषाधिकाराचे कवच दिले. यामुळेच खासदार वा आमदारांनी सभागृहांमध्ये केलेले आरोप वा कुठल्याही वक्तव्याबद्दल त्यांच्याविरोधात खटला गुदरता येत नाही. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सभागृहातील कामकाजाबद्दल काही टीकाटिप्पणी केल्यास हक्कभंगाचे आयुध सदस्यांना उपलब्ध असते. कोणत्याही अधिकारांचा दुरुपयोग होऊ शकतो, तसाच प्रकार खासदारांच्या मतदानाच्या विशेषाधिकाराबाबत झाला होता. १९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास ठरावावर शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सहा खासदारांनी पैशांच्या बदल्यात नरसिंह राव सरकारला मदत केल्याचा आरोप झाला होता. सीबीआय चौकशीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांनी लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. हे प्रकरण न्यायालयात गेले. पण संसदेतील मतदान किंवा त्या संदर्भातील कृतीसाठी खासदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असा निर्वाळा देताना न्यायालयाने या विशेषाधिकारांवर बोट ठेवले होते. तो निकाल सर्वोच्च न्यायालयातील पाच जणांच्या घटनापीठाने १९९८ मध्ये तीन विरुद्ध दोन अशा बहुमताने दिला होता. तब्बल २६ वर्षांनंतर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सातसदस्यीय खंडपीठाने आधीच्या निकालात दुरुस्ती करून खासदार व आमदारांना दणका दिला आहे. ‘पैसे घेऊन लाच देणाऱ्याच्या बाजूने मतदान वा भाषण केले नाही तरी अशा खासदार व आमदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. कारण पैसे स्वीकारणे किंवा मदतीच्या बदल्यात पैसे स्वीकारणे (क्विड प्रो को) हा भ्रष्टाचाराचाच भाग ठरतो’ असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदविले. निकाल स्वागतार्हच असला तरी त्यातून काही प्रश्न उपस्थित होणार आहेत.
अन्वयार्थ : विशेषाधिकार रद्द;पण लाचखोरी?
खासदार-आमदारांना विशेषाधिकाराचे संरक्षण असावे का, हा गेली अनेक वर्षे चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरला आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-03-2024 at 04:16 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth parliament legislatures mp and mla who take bribes for voting speeches are not protected by privilege amy