कॅथलिक पंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस गेले काही आठवडे फुप्फुस विकाराने ग्रस्त होते. अगदी अलीकडेपर्यंत रुग्णालयातही दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला, पण तो झुगारून पोप फ्रान्सिस व्यग्र राहिले. ईस्टर सण्डेनिमित्त २२ एप्रिल रोजी त्यांनी व्हॅटिकनमध्ये मार्गदर्शनही केले. त्यानंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. पोप फ्रान्सिस ८८ वर्षांचे होते आणि त्यांच्या वाणीवर व हालचालीवर मर्यादा आल्या होत्या. तरीदेखील त्यांच्या देहावसानाची बातमी अनपेक्षित आणि म्हणून धक्कादायक ठरली. त्यांच्या निधनवार्तेमुळे उमटलेली खंत आणि हुरहूर धर्म आणि राष्ट्रांच्या सीमा ओलांडून प्रकट झाली हेही उल्लेखनीय. जवळपास १२ वर्षांच्या पोप पदाच्या कारकीर्दीत पोप फ्रान्सिस यांनी काही महत्त्वाचे बदल केले आणि इतर काही बदलांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तरीदेखील त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता पोप करू शकले नाहीत असे मानणाराही वर्ग आहे. बायबलमध्ये समाविष्ट काही मूळ आदेशवजा धारणांचे उच्चाटन होण्याची अपेक्षा पोपसारख्या व्यक्तीकडून बाळगणे हे अव्यवहार्य आणि अवास्तव ठरते. धार्मिक धारणांना कालसुसंगत बनवण्याचे प्रयत्न विविध धर्मांतील धर्मगुरूंकडून कमी-अधिक प्रमाणात होतच असतात. पोप फ्रान्सिस यांनी या आघाडीवर अधिक भरीव काही तरी करून दाखवले. कोणताही धर्मगुरू धर्माचरणास दैनंदिन आयुष्याशी संलग्न करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची लोकप्रियता वाढते हा इतिहास आहे. पोप फ्रान्सिस लोकांमध्ये गेले. व्हॅटिकन चर्च अधिक लोकाभिमुख बनले पाहिजे, दयाबुद्धी आचरणात दिसली पाहिजे, असे ते सांगत. त्या विचारास सुसंगत असा त्यांचा आचार असे.
पोप फ्रान्सिस हे दक्षिण गोलार्धातील आणि लॅटिन अमेरिकेतील या पदावर पोहोचलेले पहिलेच. १३ मार्च २०१३ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट १६ वे यांनी पदत्याग केला होता. त्या काळात व्हॅटिकन चर्चविषयी काही वाद निर्माण झाले होते. कालविसंगत रुढीवाद आणि बंदिस्तपणातून पोप बेनेडिक्ट यांनी चर्चला बाहेर काढले नाही, असेही म्हटले जात होते. काही आक्षेप अधिक गंभीर होते. फ्रान्सिस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर व्हॅटिकनमध्ये उपस्थित जनसमुदायासमोर भाषणाची सुरुवातच ‘तुमचे आशीर्वाद हवेत’ अशी काहीशा अनपेक्षित प्रकारे केली. त्यांच्या नेतृत्वाची दिशा काय असेल, याची चुणूक तेव्हा आणि सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच मिळू लागली. पोप बनण्याआधी ते अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथील आर्च बिशप होते. त्यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांना त्या शहरातील बकाल वस्त्यांमध्ये घेऊन जात. त्यामुळे ते ‘स्लम बिशप’ म्हणून ओळखले जात. स्वत:चे जेवण बनवणे आणि बसने प्रवास करणे अशा साधेपणाबद्दलही ते ज्ञात होते. तो साधेपणा त्यांनी व्हॅटिकनमध्ये आणला. पोपसाठी राखीव भर्जरी वस्त्रालंकारांचा त्याग करून केवळ पांढरा शुभ्र झगा आणि काळे बूट या पेहरावाला त्यांनी पसंती दिली. व्हॅटिकनमध्ये पोपसाठी राखीव १२ खोल्यांचे निवासस्थान त्यांनी स्वीकारले नाही. त्याऐवजी एका होस्टेलमध्ये दोन खोल्यांच्या छोटेखानी निवासात बस्तान हलवले. तेथेच ते सर्वांसमवेत भोजनही करत. साधेपणा, काटकसर धर्ममार्तंडांनी कृतीतून दाखवला पाहिजे, याविषयी ते आग्रही असत. बुलेटप्रूफ ‘पोपमोबिल’ या अधिकृत वाहनाचा त्यांनी त्याग केला. कारण त्यांना लोकांमध्ये मिसळायचे होते. त्यांच्याबरोबर सेल्फी काढायच्या होत्या. लहान मुलांबरोबर थट्टामस्करी करायची होती. सुहास्य चेहरा, अर्जेंटिनातील असल्यामुळे सुपरिचित फुटबॉलप्रेम आदी बाबींमुळे सामान्यांना ते आपल्यातीलच वाटायचे.
पोप फ्रान्सिस यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर नि:संदिग्ध भूमिका घेतल्या. निर्वासितांविषयी जाहीर कणव आणि पाठिंबा व्यक्त केला. कॅथलिक धर्मगुरूंवर काही वेळा लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले, त्यावेळी त्यांना कठोर शासन होईल याविषयी दक्षता घेतली. समलिंगी विवाहित, घटस्फोटितांप्रति तुलनेने अधिक उदारमतवादी भूमिका घेतली. वातावरणबदलावर चिंता व्यक्त करताना, वेळोवेळी चंगळवादावर ताशेरेही ओढले. चिनी सरकार, मुस्लीम धर्मगुरू, सीरिया-सुदान-पॅलेस्टिनी युद्धग्रस्तांना भरभरून मदत केली आणि त्यांच्या पाठिंब्याबाबत राजकीय वक्तव्येही केली. बिशप आणि धर्मगुरूंच्या नियुक्तीमध्ये त्यांनी सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले. १२ वर्षांमध्ये एखादी व्यक्ती किती क्रांतिकारी बदल घडवून आणू शकते यास मर्यादा आहेतच. पण पोप फ्रान्सिस यांनी क्रांतिकारकाचा अभिनिवेश न आणताही, मानवतावादी दृष्टिकोनातून अनेक बदल घडवून आणले. त्यांना नमन!