आर्थिक अनिवार्यता असली, की राष्ट्रवादाच्या बेटकुळ्या फुगवणे कधीतरी थांबवावे लागतेच. ज्या देशाशी आपण संघर्षाच्या आणि सडेतोड प्रत्युत्तराच्या भाषेत बोलतो, त्या चीनबरोबर आपली व्यापारी तूट दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणजे चीनकडून होणारी आयात कमी होत नाही आणि आपण त्या देशाला त्या प्रमाणात निर्यात करू शकत नाही. ही आयात सरसकट थांबवणे शक्य नाही आणि निर्यात वाढवण्याची आपली सध्या क्षमता नाही. तेव्हा व्यापार थांबवणे वगैरे बातच नको. फुटकळ उपयोजनांवर दर सहा महिन्यांनी बंदी घालून आपण राष्ट्रवादाची हौस तेवढी जिरवून घेतो. याचे कारण, चिनी मालाला सशक्त पर्याय शोधणे आपल्याला जमत नाही आणि या मालावाचून आपली औद्याोगिक आणि पायाभूत दौड मंदावते हे वास्तव त्यामुळे स्वीकारावे लागते. असेच काहीसे सध्या भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांबाबत होत आहे. त्या देशाचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी गतवर्षी निवडून आल्यानंतर भारतास डिवचण्यास सुरुवात केली. त्यांना चीनची फूस होती हे तर उघडच आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी त्याहीपुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही चिखलफेक केली. कारण काय, तर पंतप्रधानांनी लक्षद्वीपमधील पर्यटनास प्रोत्साहनपर भेट दिली. मुईझ्झूंच्या मंत्र्यांच्या वेडगळपणाला खरे तर अध्यक्षांनीच आवर घालायला हवा होता. तो घातला तोवर उशीर झाला होता. याचा एक परिणाम म्हणजे मालदीवमधील पर्यटनावर बंदी घालण्याची मोहीम इथल्यांनी सुरू केली. अशा प्रकारच्या भावनिक मोहिमांचे समर्थन होऊ शकत नाही. पण भारतीय पर्यटकांची संख्या घटली तर काय हाहाकार उडू शकतो याची जाणीव मुईझ्झूंना पर्यटन हंगाम संपल्यावर झाली असावी. जून महिन्यात मुईझ्झू अध्यक्ष या नात्याने पहिल्यांदाच भारतात आले. पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी ते विशेष निमंत्रित होते. त्यानंतर आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर त्या देशाच्या दौऱ्यावरून नुकतेच परतले. दोन्ही देशांतील संबंध त्यामुळे पुन्हा सुरळीत होत आहेत का, याचा धांडोळा या निमित्ताने घ्यावा लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा