‘औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यकच’ या संघाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत ‘ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल’ अशा स्पष्ट शब्दांत परिवारातील लोकांनाच सुनावणाऱ्या भय्याजी जोशींचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह असलेल्या जोशींनी पुन्हा एकदा कान टोचल्यावर या मुद्द्यावर अकारण आक्रमक भाषा करत राज्यातले वातावरण कलंकित करणारे सत्ताधारी व विहिंपचे पदाधिकारी आता तरी शांत बसतील का हा यातला कळीचा प्रश्न. त्याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल, पण जे सगळे घडायला नको होते याची पुसटशीही जाणीव हा वाद पेटवणाऱ्यांच्या वर्तनातून अजूनही दिसत नाही त्याचे काय?
राज्यात या वादाला सुरुवात झाली ती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्याने. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी केलेली औरंगजेबाची स्तुती ‘प्रायोजित’ होती अशी शंका आजही घेतली जाते. त्या स्तुतीला प्रत्युत्तर देण्याच्या नादात उतावळ्या सत्ताधाऱ्यांनी ‘कबर हटाव’चा नारा दिला व त्यात अनपेक्षितपणे विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली. वास्तविक विहिंप ही संघ परिवारातील महत्त्वाची संघटना. अगदी ठरवून, सर्वांशी सल्लामसलत करून एखादा मुद्दा हाती घेणे हे या संघटनेचे वैशिष्ट्य. त्याला छेद देत या संघटनेने सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर कसा काय मिसळला याचे उत्तर अजूनही अनेकांना सापडलेले नाही. संघाने बंगळूरुतून खडे बोल सुनावल्यानंतर परिषदेने आंदोलन थांबवले असले तरी सत्ता वर्तुळातील काही जण अजूनही बेलगामच आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी आता थेट भय्याजी जोशींनाच पुढे यावे लागले. पण त्यातून परिवारातील विसंवादाचे जे दर्शन घडले त्याचे काय? समाजात द्वेष पसरवण्यासाठी उपयुक्त ठरणारे धार्मिक मुद्दे उकरून काढण्याची सवय लागली की ती वरिष्ठांनी दरडावल्यावरही कशी सुटत नाही याचे हे दुसरे उत्तम उदाहरण. त्याआधी अयोध्येचा मुद्दा मार्गी लागल्यावर इतर मशिदींच्या खाली मंदिरे शोधण्याची काहीही गरज नाही असे स्पष्ट विधान खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी ठाण्यात केले होते. त्यानंतर काही काळ वादग्रस्त मुद्दे तापवण्याला आळा बसला. पण नंतर हे वाद पेटवणे कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. यामुळे सर्वात आधी आपल्याच परिवाराचे प्रबोधन करण्याची वेळ आता संघावर आली आहे असे म्हणावे लागते.
आम्ही प्रत्येकाच्या उपासना पद्धतीचा आदर करतो असे संघ नेहमी म्हणत असला तरीही असे वाद का उकरून काढले जातात याचे उत्तर राजकीय लाभात दडले आहे. त्याचा मोह परिवाराशी नाते सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून सुटत नाही. याचा अर्थ संघाची शिकवणी कमी पडते असा काढायचा काय? जोशींनी हे विधान करताना औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तेव्हा त्याची कबर इथेच असणार, तसेच शिवाजी महाराजांनी अफजलखानाची कबर बांधून देत आपल्या औदार्याचे दर्शन घडवले असेही म्हटले. आजचे सत्ताधारी शिवाजी महाराजांना आदर्श मानत असतील तर त्यांच्या औदार्याचे अनुकरण ते का करत नाहीत? मुळात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण कुणीही केले नाही. तरीही ते ‘खपवून घेणार नाही’ ही भाषा कशासाठी? विशेषत: नागपूरच्या दंगलीनंतर संघाला हे नको आहे. तरीही वाद जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर ते मातृसंस्थेलाही जुमानत नाहीत असा अर्थ त्यातून निघतो. यामुळे या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या संघाची जबाबदारी आता वाढली आहे. राज्यात महायुतीला सत्तेत आणण्यात संघाचा मोठा वाटा होता. त्यातून इतके निर्भेळ यश मिळाल्यावर विकास व प्रगतीऐवजी इतिहास उकरण्याचा प्रयत्न संघाला अजिबात आवडलेला नाही हेच या भूमिकेतून दिसते. सत्तेत सहभागी झालेल्या काही ‘उपऱ्यांना’ मात्र नवहिंदुत्त्ववादी होण्याची चटक लागली आहे. त्यातून हा वाद उभा राहिला आहे. त्यामुळे भविष्यात असे ‘पेटवणारे’ मुद्दे हाती घेण्याआधी संघ काय आहे, हे या नवागतांनी आधी समजून घेणे गरजेचे ठरते. सत्तेचा फायदा सामान्य घटकांपर्यंत पोहचवायचा असेल तर काम करावे लागते. असे मुद्दे काढून लोकांच्या भावना भडकावण्यापेक्षा असे काम करणे कठीण. म्हणून या नव्यांनी याचा आधार घेतला व आता संघाच्या कठोर भूमिकेमुळे तोंडावर आपटले. ‘या कबरीला ६० वर्षांपासून म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळापासून संरक्षण आहे’, अशी वक्तव्ये करून विरोधक कसे अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणारे असे भासवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असला तरी त्यात तथ्य नाही. देशात मधल्या काळात भाजपची सरकारेही आली व गेली हे वास्तव कसे विसरता येईल? एकीकडे केंद्रातील सरकार ‘सौगात-ए-मोदी’ची योजना अंमलात आणत असताना दुसरीकडे असे मुद्दे काढून विरोधाभासी चित्र निर्माण करण्याचा राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न विसंगती तेवढी दाखवून देतो. संघाला नेमके हेच नको आहे. त्यामुळे आता जोशींच्या विधानानंतर तरी हा वाद थांबायला हवा. तेच राज्याच्या हिताचे आहे.