जग पूर्वी कधी नव्हते इतके सध्या अण्वस्त्रयुद्धाच्या समीप आल्याचे सांगितले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे, पाच अधिकृत अण्वस्त्रधारी देशांच्या परिघापलीकडे अण्वस्त्रप्रसार झालेला आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांच्या व्यतिरिक्त सध्या भारत,पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया, इराण या देशांकडे ज्ञात अण्वस्त्रे किंवा तशी निर्मितीक्षमता आलेली आहे. यांतील केवळ भारताच्या बाबतीत अमेरिका आणि जगाने ‘सन्माननीय अपवाद’ करावा हे लक्षणीय. याची कारणे दोन. पहिले राजकीय. जगन्मान्यता नसतानाही घेतलेल्या दोन अणुचाचण्या आणि अणुशक्तीचा वापर शांततामय कारणांसाठीच केला जाईल, हे भारताने वेळोवेळी दिलेले आश्वासन बहुतेक देशांनी तत्त्वत: स्वीकारले. अण्वस्त्रक्षम असूनही ‘प्रथम वापर नाही’ असे धोरण जाहीरपणे राबवणारा भारत हा बहुधा एकमेव देश. ही विश्वासार्हता कित्येक दशकांतून कमावलेली. दुसरे तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे, भारताच्या (गेल्या शतकातील) विज्ञान संस्कृतीचा जगाने केलेला स्वीकार. आण्विक तंत्रज्ञान अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे असते. त्यासाठी चिकाटीचे संशोधन, अद्यायावत प्रयोगशाळा, वैज्ञानिकांच्या काही पिढ्या, त्यासाठी भक्कम सरकारी पाठबळ असा सर्व जामानिमा जुळून यावा लागतो. हे ज्यांच्यापाशी नाही, त्या देशांच्या अणुविकास कार्यक्रमाकडे कायम संशयानेच पाहिले जाते. भारताच्या अणुविकास कार्यक्रमात काही प्रमाणात सोव्हिएत सहभाग असावा, अशी चर्चा सुरुवातीस काही काळ झालीही. पण यातून भारताला खलराष्ट्र ठरवण्याची गरज अमेरिकेसह प्रगत, पाश्चिमात्य देशाला वाटली नाही. भारताकडे संशयित नजरेने पाहिले गेले नाही, कारण पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यपश्चात या देशात रुजवलेली विज्ञानाग्रही संस्कृती जगास ज्ञात होती. दहा-वीस नाही, पण तीस वर्षांनी हा देश अणुशक्तीच्या क्षेत्रात लक्षणीय मजल मारेल, असे त्या वेळी बोलले जायचे. ती छबी आजही काळवंडलेली नाही. याच्या उलट पाकिस्तान, इराण, उत्तर कोरिया या देशांच्या बाबतीत काय घडले ते पाहावे. भारताच्या त्या वैज्ञानिकांच्या फौजेतून जी अनेक रत्ने निपजली, त्यांतील एक म्हणजे राजगोपाल तथा आर. चिदम्बरम. त्यांच्या निधनाने त्या संस्कृतीचा एक दुवा निखळला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा