राजकारण या शब्दाभोवती गोळा झालेली सगळी पुटे बाजूला सारून सुसंकृत, संयमी आणि तरीही वेळप्रसंगी कणखर राहण्याचे कसब मनोहर जोशी यांनी आत्मसात केले होते. शिवसेना स्थापनेनंतर ती राज्यभर पसरण्यासाठी ज्या काही शिवसैनिकांनी जिवापाड कष्ट केले, त्यात जोशी सरांचा वाटा मोठा होता. पण म्हणून त्या बदल्यात काही मिळवण्याची धडपड त्यांनी केली नाही. स्वत:ला काही मिळावे यासाठी स्वत:च न मागताही मिळवण्याचे चातुर्य जोशी यांच्या ठायी होते. त्याचा त्यांनी उत्तम उपयोग करून घेतला. त्यांना जे जे मिळाले, ते निष्ठेमुळे आणि कष्टामुळे. त्यामुळे सत्तापदापेक्षाही निष्ठा अधिक महत्त्वाची हे आपल्या जगण्याचे सूत्र सरांनी शेवटपर्यंत विनासायास पाळले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्या स्वभावात, कार्यशैलीतील ढळढळीत फरक कार्यकर्त्यांच्या सहज लक्षात येई. त्याचे आश्चर्यही वाटे. मात्र बाळासाहेबांच्या बरोबर राहताना, जोशी सरांना आपल्या स्वभावाला मुरड घालण्याची गरज कधी वाटली नाही. या दोघांचाही एकमेकावरील विश्वास हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय संवेदनशील उदाहरण. शिवसेनेच्या कार्यशैलीत स्वत:ला ओतून देतानाही ‘पलीकडच्या’ शरद पवार यांनाही कसे सांभाळता येऊ शकते हे जोशी सरांच्या राजकारणातून कळावे. हे असे परस्पर विरोधी बलांना (फोर्सेस) सहजतेने राखणे म्हणजेच राजकारण. ते ज्यांस जमते तो उत्तम राजकारणी. अशा राजकारण्यांस कधी अद्वातद्वा बडबड करावी लागत नाही की ते कधी आदळआपट करत नाहीत. दारिद्रय़ आणि कष्ट पाचवीला पुजलेल्या घरात जन्मलेल्या कुणाच्याही स्वभावात एकारलेपणा येण्याची शक्यता अधिक होती. पण परिस्थितीला तोंड देताना, कर्तृत्व आणि सुसंस्कृतता यांचा विसर पडू न देता जगण्याचे कौशल्य जोशी सरांनी आत्मसात केले होते.नगरसेवकपदापासून ते मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षापर्यंतच्या अनेक पदांवर काम करताना, आपल्या निष्ठांचा विसर पडू नये याची काळजी घेत, प्रसंगी स्वभावाला मुरड घालून निर्णय घेऊन तो रेटण्याची क्षमता त्यांच्यापाशी होती.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा

राजकारणातील सत्तापदांमुळे येणारा ‘अहं’ जोशी सरांना कधी शिवला नाही. कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचणारे मुख्यमंत्री हा त्यांचा लौकिक. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी व्यासपीठावर येण्यापूर्वीच जोशी सर हजर असत. कार्यक्रमात आपल्याच सहकाऱ्याच्या उशिरा येण्याबद्दल डोळे मिचकावत, नर्म शैलीत घेतलेली हजेरी तर महाराराष्ट्राने अनेक वेळा ऐकली. त्यांच्या या ‘समय’सूचकतेइतकीच त्यांची वामकुक्षीही त्यावेळी चर्चेचा विषय होती.

राजकारण्यांनी माध्यमस्नेही असण्यात फारसे काही वावगे नसण्याचा तो काळ होता. जोशी सरांकडे पत्रकारांशी अतिशय चतुराईने संबंध ठेवण्याची हातोटी. मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठीही कशी खटपट करावी लागते, हे सांगतानाही ते स्वभावजन्य नितळ असू शकत. चातुर्य आणि अभ्यास यांची जोड मिळाल्यामुळे त्यांना राजकारणात नेमके काय, कसे आणि कधी करायचे, याचा माग लागायचा. बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ सैनिक हा त्यांचा गुण खरा. पण त्यांच्यासमोर खरे काय ते सांगण्याची हिंमत त्या एकनिष्ठेतूनच आलेली. त्यामुळेच कोणत्याही निर्णयप्रक्रियेतील मनोहर जोशींचे मत महत्त्वाचे ठरत असे. परिणामकारक वक्तृत्व, कार्यक्षमता, दूरदृष्टी, समोरच्याच्या मनातले ओळखून माणसे हाताळण्याची क्षमता अशा वैशिष्टय़ांमुळे जोशी सर कायमच वेगळे राहिले. राजकारणातले छक्केपंजे ओळखले तरी थेट वार न करता, सहजपणे जाताजाता, जणू काहीच मुद्दाम घडलेले नाही, असे दाखवत, आपल्या जन्मजात मिश्किलीत ते सर्व विरघळवून टाकत,  हवे ते घडवून आणणारे मनोहर जोशी अनेकांच्या लक्षात राहणारे आहेत.

आयुष्यातील संघर्षांला कणखरपणे सामोरे जाताना भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जोशी सरांनी जे मिळाले त्याकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती जोपासली. राजकारण, समाजकारण यांची समज अनुभवातूनच येते हे खरे; मात्र त्याचा उपयोग करून घेण्यासाठी जी चतुराई अंगी असावी लागते, ती जन्मसिद्ध असते. मनोहर जोशींचा आपल्या या गुणांवर विश्वास होता आणि त्यामुळेच शिवसेनेच्या जडणघडणीतील त्यांचे महत्त्व अबाधित राहिले. कुणालाही न दुखावता कार्य सिद्धीस नेण्याचे नैपुण्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. राजकारण अधिकाधिक असभ्य, असंस्कृत आणि अतिरेकी होत असताना सभ्य, सुसंस्कृत, विवेकी जोशींचे असणे निश्चितच मनोहर होते. असे सुसंस्कृत राजकारणी तयार करणे हे केवळ शिवसेनेसमोरचेच नाही; तर समस्त राजकारणापुढचेच आव्हान ठरते. जोशींच्या जाण्याने ते अधिक गडद ठरते.

Story img Loader