चीनचे विद्यमान नेतृत्व पूर्वी कधीही नव्हते इतके चिडखोर बनलेले आहे. राग कशाचा येईल याचा काही नेम नाही. शेजारील चिमुकल्या तैवानमध्ये अलीकडे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनच्या नावडत्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे लाय चिंग-दे विजयी झाले. परवा त्यांनी सत्ताग्रहण सोहळय़ात तैवानच्या लोकशाही रक्षणाप्रति वचनबद्धता आणि चीनकडून लष्करी धमकावणीच्या समाप्तीची अपेक्षा व्यक्त केली. तेवढय़ावरून चीनचे पित्त खवळले आणि ‘शिक्षा’ म्हणून तैवानच्या भोवताली चीनने दोन दिवसांच्या सैन्यदल कवायती केल्या. तैवानला जरब बसावी हा त्यामागील मुख्य हेतू आणि आक्रमण सिद्धता जोखणे हा दुसरा हेतू. युक्रेनवर हल्ल्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही आदळआपट सुरू केली होती. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे पुतिन यांच्याइतके बोलत नाहीत. पण काही बाबतींत ते पुतिन यांच्यापेक्षाही उच्च कुटिल मनोवृत्तीचे. पुन्हा युक्रेन नाटो देशांच्या जितका भौगोलिकदृष्टय़ा समीप आहे, तितका तैवान अजिबातच नाही. सबब, रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी जितका विचार केला, तितका विचार करण्याची इच्छा आणि गरज चीनला भासणार नाही. रशियन आक्रमणापूर्वी बहुतेक पाश्चात्त्य नेते आणि विश्लेषक ‘रशिया असला आततायीपणा आधुनिक युगात करणार नाही’ असे बोलत राहिले आणि रशियाने त्यांना गाफील गाठले. त्या अनुभवातून ही मंडळी आता सावध झाली आहेत हे खरे. तरीसुद्धा चीनबाबतही तसाच विचार अलीकडे बळावू लागला होता, त्याला चीनच्या ताज्या कवायतींनी पूर्णविराम मिळावा.
कारण गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास चीनच्या कृतीमध्ये संगती आढळते. याआधी गतवर्षी २०२३मध्ये एप्रिल महिन्यात चीनने अशा प्रकारे जरब कवायती करून दाखवल्या. त्यावेळी तैवानच्या तत्कालीन अध्यक्ष त्साय इंग वेन अमेरिकेत गेल्या होत्या आणि त्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहाचे तत्कालीन सभापती केव्हिन मॅकार्थी यांची भेट घेतली, म्हणून चीनला राग आला होता. त्याच्या आधीच्या वर्षीही म्हणजे ऑगस्ट २०२२मध्ये चीनने आजवरची सर्वात मोठी लष्करी कवायत करून दाखवली होती. त्यावेळी निमित्त होते, अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या तत्कालीन सभापती नॅन्सी पलोसी यांची तैवानभेट! तेव्हा तैवानच्या बाबतीत चीनचा तळतळाट बहुधा तैवानच्या पाण्यातील खळखळाटानेच जिरतो की काय, अशी शंका येते. परंतु.. तैवानच्या भोवतालचे पाणी जसे उथळ नाही, तसाच चीनचा त्रागाही तात्कालिक नाही! तैवानच्या ‘एकात्मीकरणाचा’ चंग जिनपिंग यांनी बांधला असून, चीनच्या व्यापक अशा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या धोरणाचा तो भाग आहे. अनेक विश्लेषकांच्या मते तैवानचा ताबा घेण्याचा प्रयत्न या दशकातच होऊ शकतो. याबाबत रशियाचा आदर्श चीनने घेतला असल्याची शक्यता आहेच. अलीकडे जिनपिंग आणि पुतिन हे वरचेवर भेटतात. पुतिन यांनी गतदशकात क्रिमियाचा घास घेतला, त्यावेळी त्यांचे काही फार बिघडले नव्हते. या दशकात ते अख्खा युक्रेनच गिळायला निघालेत, तरीही त्यांचे फार वाईट चालले आहे असे दिसत नाही. शस्त्र आणि निधीपुरवठय़ावरून अमेरिकादी देश घोळ घालत असताना, तिकडे रशियन अर्थव्यवस्थाही टिकून राहिली आणि आता तर रशियन आक्रमणाचा रेटाही तीव्र झाला. युक्रेनपेक्षाही तैवानला वाचवणे अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांना जड जाणार आहे, हे जिनपिंग यांनी ताडले असेलच.
अमेरिका, नाटो आणि इतर लोकशाहीवादी देशांच्या गटासमोर एक सक्षम, पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे आणि त्यास रशियाची साथ मिळालेली आहे. त्या कंपूत इराणही आहे आणि उत्तर कोरिया, व्हेनेझुएलासारखे पुंड देशही. ही फळी राष्ट्रसंख्येच्या बाबतीत कमी दिसत असला, तरी त्यांची ताकद मोठी आहे आणि उपद्रवमूल्य तर त्याहूनही अधिक. तैवानच्या अध्यक्षांनी काय बोलावे नि बोलू नये यावरदेखील चीनची नजर असणे हे त्या देशाच्या आत्मकेंद्री, युद्धखोर नेतृत्वाच्या स्वभावास अनुरूपच आहे. कवायती दोन दिवसच होत्या; पण त्यांचे पडसाद आणखी अनेक दिवस उमटत राहतील. प्रत्यक्ष युद्ध न छेडताही, अशा प्रकारे तैवानला घेरून त्या देशाची नाविक आणि हवाई नाकेबंदी करणे चीनला सहज शक्य आहे, हे या कवायतींनी दाखवून दिले आहे. त्यांची दखल घेतली नाही तर तैवानचाही ‘युक्रेन’ होऊ शकतो!