टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांची बहुचर्चित भारत वारी सुरू होण्यापूर्वीच रद्द झाली. काही महत्त्वाचे काम निघाल्यामुळे ही भेट बेमुदत काळासाठी तहकूब करण्यात आली अशी चर्चा त्यावेळी झाली. टेस्ला कंपनीच्या तिमाही उत्पन्नात घट झाली होती. कामगारकपातही जाहीर झाली होती. तरीही त्या दिवशी टेस्ला कंपनीच्या समभागांनी तेथील भांडवली बाजारात उसळी घेतली. याचे एक कारण मेक्सिको आणि भारत या संभाव्य ठिकाणी स्वस्तातल्या मोटारी बनवण्याची टेस्लाची योजना पुढे ढकलण्यात आली (रॉयटर्स वृत्त), हे होते. ते काही असले, तरी यामुळे भारतभेट रद्द झाली याविषयी पुरेसा खुलासा होऊ शकत नव्हता. तेव्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची संधी मस्क यांनी दवडली कशी, अशी शंका निर्माण होणे साहजिक आहे. आता आठवडय़ाभरातच म्हणजे परवाच्या रविवारी मस्क यांनी चीनला धावती भेट दिली. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यानंतरचे महत्त्वाचे चिनी नेते ली चियांग यांना ते भेटले. चिनी परराष्ट्र व्यवहार विभागाच्या आणखी एका उच्चपदस्थ नेत्याचीही भेट झाली. चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या टेस्ला मोटारींमध्ये स्वयंचलित चालक प्रणाली उपलब्ध करून देण्याबाबत परवानगी मागण्यासाठी मस्क थेट चीनमध्ये दाखल झाले. ही प्रणाली चीनमध्ये बनणाऱ्या टेस्ला मोटारींमध्ये आणायची, तर त्यासाठी शांघायमध्ये साठवून ठेवलेला चिनी विदा अमेरिकेकडे हस्तांतरित करावा लागेल. त्याला चीनची सध्या परवानगी नाही. इलेक्ट्रिक मोटारी हल्ली जगातील अनेक कंपन्या बनवतात. पण स्वयंचलित चालक प्रणालीमुळे टेस्लाच्या इलेक्ट्रिक मोटारी इतर उत्पादनांपेक्षा वेगळय़ा ठरतात. चीनच्या बाजारपेठेत टेस्लापेक्षा बीवायडी या स्थानिक मोटार कंपनीचा दबदबा वाढू लागला आहे. शिवाय एकुणातच जगभर इलेक्ट्रिक मोटारींच्या मागणीत घट होऊ लागली आहे. त्यामुळे या घसरणीतून सावरण्यासाठी मस्क यांना चीनचा धावा करावा लागतो, हे लक्षात घ्यावे लागेल.
याची कारणे अनेक. अमेरिकेबाहेर चीन ही टेस्लाची सर्वात मोठी बाजारपेठ ठरते. शिवाय टेस्लाच्या सर्वाधिक मोटारी जगात चीनमध्येच उत्पादित होतात. चीनने २०१७मध्येच टेस्लाला त्या देशात उत्पादनासाठी मार्ग मोकळा करून दिला. त्यावेळी आपण येथे धोरणांची आखणी करत होतो . एलॉन मस्क २०१५मध्ये अमेरिकेत मोदींना भेटले होते. तरीदेखील टेस्लासाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची निव्वळ घोषणा आपण अलीकडेच केली. ‘टेस्ला’साठी असे का म्हणावे? कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या आयातीवरील शुल्क केंद्र सरकारने कमी करून ते १५ टक्क्यांवर आणले. अशा प्रकारच्या शुल्क सवलतीची मागणी टेस्लाने केली होती. यापूर्वी संपूर्ण तयार आयात मोटारीवर (सीबीयू) ६० ते १०० टक्के आयातशुल्क आकारले जायचे. मूळ किंमत, विमा आणि वाहतूक खर्च मिळून ज्या मोटारीची किंमत ४० हजार डॉलरपेक्षा (साधारण ३३,१६,०५८ रुपये) अधिक असेल, तिच्यावर १०० टक्के शुल्क, तर कमी किमतीच्या मोटारीवर ६० टक्के शुल्क आकारले जायचे. यावर २०२१मध्ये टेस्ला कंपनीने केंद्र सरकारला पत्र लिहून अशा मोटारींवरील आयात शुल्क १५ ते ४० टक्क्यांवर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता ती विनंती मान्य करून आपण गाजावाजा करत ईव्ही धोरण आणले आणि तरीही तिकडे भारत दौरा टाळून मस्क यांना चीनला जावेसे वाटले! कारण मस्क अडचणीत आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना चीनचाच आधार वाटतो.
ज्या क्षणी स्वयंचलित चालक प्रणाली चिनी मोटारींमध्ये उपलब्ध होईल, त्या क्षणापासून एक अजस्र बाजारपेठ टेस्लाच्या सर्वाधिक महागडय़ा मोटारींसाठी खुली होईल. त्याच वेळी पुढील वर्षी मेक्सिको किंवा भारतात स्वस्त मोटारींसाठी कारखाना उभारला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे मस्क यांची दोन्हीकडून मजा! या असल्या उच्छृंखल व्यक्तीच्या नादी भारताने फार लागू नये. त्याचबरोबर, चीनकडून उच्च तंत्रज्ञानाधारित कंपन्या भारताकडे वळू लागल्यात या भ्रमातही फार राहू नये. आकार, आवाका आणि उद्योगस्नेही परिसंस्था या तिन्ही आघाडय़ांवर हा देश आपल्यापेक्षा कैक योजने पुढे आहे. तत्परतेने जमीन, यंत्रणा, कामगार उपलब्ध करून दिले नाहीत, तर मस्कसारखे अनेक आपली मस्करी करून चीनकडेच वळतील.