पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस महासंचालकांची उचलबांगडी करण्यात आली होती. याच धर्तीवर राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणुकीच्या तोंडावर पदावरून हटवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला; पण त्या चार राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे होती वा आहेत. याउलट महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपचा वरचष्मा असलेल्या महायुतीचे सरकार आहे. पक्षपातीपणाच्या आरोपांमुळेच रश्मी शुक्ला यांची गच्छंती झाली असावी, असा अर्थ काढला जात आहे. रश्मी शुक्ला यांच्या पक्षपातीपणाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने आवाज उठवत होते व त्यांच्या बदलीची मागणी करीत होते. ‘पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी उमेदवारांना रसद पुरवली जाते’ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप गंभीर स्वरूपाचा होता. शिवसेना ठाकरे गटानेही शुक्ला यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विरोधकांचा रेटा तसेच नगरमधील परिस्थिती हाताळण्यावरून पोलीस दलातील वरिष्ठांकडून झालेल्या हलगर्जीबद्दल निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिलेला अहवाल यानंतर शुक्ला यांची गच्छंती झाली. भाजपच्या मागणीवरून झारखंडच्या पोलीस महासंचालकांना तात्काळ हटविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. तेव्हाच शुक्ला यांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती. पण तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्ला यांचे समर्थन करीत त्यांना अभय दिले होते. अवघ्या दोन आठवड्यांतच त्याच राजीव कुमार यांना शुक्ला यांच्या बदलीचा आदेश द्यावा लागला. यावरून शुक्ला या पोलीस दलाच्या प्रमुखपदी कायम राहिल्यास निवडणूक मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पडू शकणे कठीण असल्याचे कदाचित निवडणूक आयोगाचेही मत झाले असावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा