जम्मू-काश्मीरमध्ये एका विद्यापीठातील सात विद्यार्थ्यांविरोधात पाकिस्तान-समर्थक घोषणा दिल्याबद्दल तेथील पोलिसांनी ‘अवैध कृती प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर, १९ नोव्हेंबर रोजी रात्री गंदरबल येथील शेर-ए-काश्मीर विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय विभागातील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. या वेळी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली, अशी तक्रार एका विद्यार्थ्यांने पोलिसांकडे केली. या विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये जवळपास ३०० विद्यार्थी राहतात. यातील जवळपास ३०-४० विद्यार्थी पंजाब, राजस्थान अशा जम्मू-काश्मीरबाहेरच्या राज्यांतील आहेत. त्यांच्यातीलच एका विद्यार्थ्यांने झाल्या प्रकाराची माहिती थेट पोलिसांकडे दिली. वास्तविक त्याने त्यापूर्वी अधिष्ठाता किंवा इतर अधिकाऱ्यास कळवायला हवे होते. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, भारत पराभूत झाल्यानंतरच्या जल्लोषाविषयी संबंधित विद्यार्थ्यांना हटकले असता त्यांनी आपल्याला धमकावले, तसेच पाकिस्तान समर्थनाचे नारे दिले असे म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी ‘यूएपीए’ आणि इतर कलमांखाली सात विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेऊन त्यांना ताब्यात घेतले. विद्यापीठातील विद्यार्थीकल्याण अधिष्ठात्याने या वृत्ताला दुजोरा दिला, तर पशुवैद्यकीय अधिष्ठात्याने असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. हा सगळा प्रकार संशयात भर घालणारा आहे. कारण यूएपीए हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. संबंधित सातही जण ३० नोव्हेंबर म्हणजे गुरुवापर्यंत पोलिसांच्या रिमांडमध्ये ठेवले जाणार होते. अटकेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक, कारण जामिनाऐवजी कोठडीलाच प्राधान्य देण्याचे अलिखित धोरण या कायद्याअंतर्गत अटक केलेल्यांच्या बाबतीत पाहायला मिळते. विशेषत: अस्थिर टापूंमध्ये या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आक्षेप स्वयंसेवी संस्था, न्यायालये, विचारवंत, विश्लेषकांनी वारंवार घेतलेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा