विस्कॉन्सिन या अमेरिकेतील एका राज्याच्या सुप्रीम कोर्टातील (उच्च न्यायालय) एका न्यायाधीशपदासाठीची निवडणूक म्हणजे ‘पाश्चिमात्य संस्कृतीचे भवितव्य’ ठरवणारी असेल, असे उद्याोगरत्न इलॉन मस्क याने या निवडणुकीआधी ‘एक्स’वर जाहीर केले. १ एप्रिल रोजी विस्कॉन्सिनमधील मतदारांनी ‘पाश्चिमात्य संस्कृती’चे म्हणून जे काही भवितव्य सुनिश्चित केले, ते मस्क यास अभिप्रेत असे नव्हते. ही निवडणूक एरवी अमेरिकेच्या परिप्रेक्ष्यात किरकोळ, जगाच्या दृष्टीने त्याहूनही य:कश्चित. पण तरीही इलॉन मस्क आणि त्याचे विद्यामान राजकीय गुरू डोनाल्ड ट्रम्प यांनी ती प्रतिष्ठेची बनवली. मस्क आणि त्याच्या भागीदार कंपन्यांनी स्थापलेल्या ‘पोलिटिकल अॅक्शन कमिटी’ अर्थात पीएसीने या निवडणुकीसाठी प्रचारामध्ये १.८ कोटी डॉलर ओतले. याशिवाय डेमोक्रॅटिक विचारधारेशी जवळच्या न्यायाधीश उमेदवार सुसान क्रॉफर्ड यांच्याविरोधात निवेदनावर केवळ स्वाक्षरी केल्याबद्दल तीन मतदारांना त्यांनी प्रत्येकी दहा लाख डॉलर्स वाटले. म्हणजे या एका निवडणुकीसाठी मस्कने २.१ कोटी डॉलर्स खर्च केले.
विस्कॉन्सिनच्या उच्च न्यायालयातील सातपैकी चार न्यायाधीश उदारमतवादी आणि तीन न्यायाधीश परंपरावादी विचारांचे मानले जातात. अमेरिकेत बहुतेक उच्चस्तरीय न्यायालयांमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन पक्षांपैकी एकाकडे झुकलेले न्यायाधीश सर्रास आढळतात. वरकरणी सर्वच न्यायाधीश तटस्थ मानले जात असले, तरी अमेरिकेत त्यांचा राजकीय कल त्यांच्या नियुक्तीआधीच सर्वज्ञात असू शकतो. विस्कॉन्सिन उच्च न्यायालयातील चारपैकी एक उदारमतवादी न्यायाधीश निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी मतदान झाले.
अमेरिकेच्या इतिहासात एखाद्या न्यायाधीशाच्या जागेसाठी झालेल्या प्रचारात १० कोटी डॉलर खर्च झाल्याचे उदाहरण दुसरे नाही. त्यात एकट्या मस्कने २.१ कोटी डॉलर्स ओतले होते. अध्यक्षीय निवडणुकीनंतरची पहिलीच निवडणूक असल्याने डेमोक्रॅटिक पक्षानेही ती प्रतिष्ठेची केली आणि क्रॉफर्ड यांच्या मागे ताकद उभी केली. पण त्यांनी प्रचाराचा रोख पूर्णपणे मस्क याच्या डॉलर मिजासीकडे ठेवला. क्रॉफर्ड किती योग्य आहेत किंवा रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिलेले ब्रॅड शिमेल किती अयोग्य आहेत यावर त्यांनी फारसा भर दिला नाही. डॉलर्सच्या राशी ओतून निवडणुकीचा कल बदलण्याचा धोकादायक पायंडा मस्कने गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीत पाडला. त्याला रोखण्यासाठी आताच प्रयत्न केले नाहीत, तर पुढील वर्षी होत असलेली मध्यावधी निवडणूक जड जाईल असा रास्त विचार डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाने केला. कसल्याशा जाहीरनाम्यावर सही केल्याबद्दल डॉलर्स वाटण्याची सवय कधी तरी मस्क आणि ट्रम्प यांच्याही अंगाशी येऊ शकते. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी लाच देण्याचाच हा प्रकार. पण केवळ निवडणूक विजयाने पछाडलेल्या मस्क-ट्रम्प दुकलीला तो मार्गही योग्यच वाटणार. मस्क याने विस्कॉन्सिन निवडणुकीत तेच करून पाहिले; परंतु मोठ्या संख्येने या निवडणुकीत सहभागी होऊन, मतदान करून उदारमतवादी मतदारांनी हा डाव हाणून पाडला.
विस्कॉन्सिनमधील विजय आणखीही एका कारणासाठी महत्त्वाचा ठरतो. अमेरिकी निवडणुकांच्या परिभाषेत विस्कॉन्सिन म्हणजे ‘स्विंग स्टेट’. पारंपरिकदृष्ट्या विशिष्ट एका पक्षाच्या बाजूने न राहता, निवडणूक आणि मुद्देबरहुकूम कौल देणारे. तेथे अलीकडच्याच अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी काहीसा अनपेक्षित विजय मिळवला होता. त्या वेळी काँग्रेसच्या काही जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सेनेट आणि प्रतिनिधिगृहातही रिपब्लिकन पक्ष बहुमतात आला. ट्रम्प सत्तेत आल्याआल्या, काही चाव्या मस्कच्या हाती दिल्या. त्याने कार्यक्षमतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू केली. आरोग्य, शिक्षण, संशोधन, नभोवाणी, स्वयंसेवी संस्था अशा अनेक क्षेत्रांसाठी असलेल्या निधीमध्येही प्रचंड कपात केली. एरवी हे गृहस्थ निवडणुकांच्या प्रचारामध्ये डॉलर्सच्या राशी ओतणार नि जनतेला मात्र काटकसरीचे डोस देणार! या लीलांमुळे प्रक्षुब्ध जनमताची नस डेमोक्रॅटिक पक्षाने अचूक ओळखली हे महत्त्वाचे. पैशाने सारे काही विकत घेता येत नाही. मतदार तर नाहीच नाही, हे दाखवून देणारा हा पहिला निवडणूक निकाल ठरला म्हणून त्याचे महत्त्व. एरवीही मस्कच्या टोकाच्या भूमिकेला विरोध दाखवण्यासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये टेस्ला मोटारींची विक्री मंदावू लागली आहे. त्याकडे उद्याोगातील स्वाभाविक चढउतार म्हणून एक वेळ दुर्लक्ष करता येईल, पण त्याची पैशाची मस्ती मतदारांनी उतरवली आणि एप्रिलच्या पहिल्या तारखेसच त्यास मूर्ख ठरवले, हे नक्कीच दखलपात्र.