तंत्रज्ञानाचा परीघ वाढत चाललाय. सगळ्यात वेग आहे तो दळण-वळणाच्या तंत्रज्ञानाचा बदलाचा. माणसं किती किती मार्गांनी एकमेकांच्या संपर्कात असतात आता. अगदी अफ्रिका ते अंटार्टिका… कुठूनही कुठेही कुणाशीही कधीही संपर्क साधता येऊ शकतो आपल्याला. जग जवळ आलंय वगैरे म्हणतात ते हेच. पण कोणी कोणाच्या जवळ आलं म्हणून अंतर कमी होतंच असं नाही…! गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात सामाजिक चळवळीत चांगली ऊठबस असलेले एक कार्यालयात आले होते… आणि हे सत्य भोसकून गेलं!!

हवा-पाण्याच्या, पीक-पाण्याच्या गप्पा झाल्यावर सहज काही तरी विषय निघाला आणि हे म्हणाले… आमच्या गावचे बरेचसे तरुण हल्ली पुण्यातच असतात. आईवडिलांना फार घोर लागून राहिलाय यांचा… फार वाईट परिस्थिती आहे गावाकडे…

History of Geography earth atmosphere Global warming temperature
भूगोलाचा इतिहास: पृथ्वीला जेव्हा ताप येतो…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
Loksatta anvyarth Shanghai Cooperation Council Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto Zardari Foreign Minister S Jaishankar
अन्वयार्थ: जयशंकर ‘शिष्टाई’चे फळ
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!

आता कोणाची तरी मुलं/ मुली पुण्याला असतात त्यात इतकं चिंता करावं असं काय आहे… ते ज्या भावना व्यक्त करतायत त्या अतिरंजित आहेत, असं वाटून गेलं. हल्ली इतक्यांची मुलं/मुली कुठे कुठे जात असतात शिकायला/ नोकरी करायला वगैरे… यात इतकी अशी काळजी करावी असं काय… असे काही विचार मनात येत होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरचं लक्ष उडालं. त्यांनाही ते लक्षात आलं असावं. ते थांबले. आपण लक्ष देत नाहीये हे समोरच्याला कळलंय हे लक्षात आल्यावर मलाच खजील झाल्यासारखं वाटलं. म्हटलं हे बरोबर नाही. ते म्हणतायत त्यात काही तरी तथ्य असणार…

ते होतं… आपल्या सगळ्यांना काळजी वाटायला हवी इतकं त्यांचं म्हणणं महत्त्वाचं होतं.

तर त्यांच्याच भागातली असं नाही, राज्याच्या अनेक भागांतली मुलं/ मुली पुण्यासारख्या शहरात येऊन राहात असतात. पुण्यात ज्यांना जमत नाही ते औरंगाबाद वगैरे शहरांत एकमेकांना धरून राहात असतात. ही अशी विद्यार्थ्यांची गर्दी या शहरांत कशी वाढलीय यावर ‘लोकसत्ता’नं मागे एक मालिकाही केली होती. हे विद्यार्थी या गावांत इतक्या संख्येनं येऊन राहतात याला, जे भेटायला आले होते त्यांचा; आक्षेप नव्हता. त्यांचं म्हणणं इतकंच होतं की ही पोरं परत गावाकडे येत नाहीत. त्या मुला/मुलींच्या आईवडिलांच्या जिवाला लागलेला घोर पोटचं पोर दूर गेलंय म्हणून नाहीये. तर शहरांत राहून ही मुलं करतायत काय… हा प्रश्न होता.

त्याचं उत्तर त्या मुलांच्या पालकांना मिळत नव्हतं. मिळत नाही. म्हणून ते अस्वस्थ आहेत.

पण हे उत्तर त्यांना मिळणार तरी कसं?

ही मुलंदेखील ते देऊ शकत नाहीत. कारण ते काहीच करत नाहीत. फक्त परीक्षा देत असतात. एक झाली की दुसरी. मग तिसरी. चौथी… असं सुरूच. या परीक्षेचा निकाल लागण्याआधी पेपर फुटलेला असतो. नाही तर निकालात गोंधळ होतो. आणि यातलं काहीही झालं नाही आणि परीक्षेत यश मिळालं तरी ज्यासाठी परीक्षा दिली तो उद्देश काही पूर्ण होत नाही.

कारण सरकारकडून भरतीचे आदेशच निघत नाहीत.

ही महाराष्ट्रातल्या लाखो ‘एमपीएससी’ग्रस्त परीक्षार्थींची अवस्था आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग’ या सरकारी भरतीसाठीच्या यंत्रणेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हे तरुण गावातनं पुणे/ औरंगाबादेत वगैरे आलेले असतात. अशा विविध परीक्षांना बसणाऱ्या तरुणांची संख्या २५ लाखांच्या वर तरी असेल. अलीकडे पोलीस भरतीसाठी यावेळी ११ लाख अर्ज़ आले होते आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या फक्त २१६ जागा निघाल्या. हीच संख्या २०११ साली १८६९ इतकी होती. इतक्या जागा आणि इतके सारे परीक्षार्थी कसं होणार…?

त्यात चार वर्षांपूर्वीच्या करोना फेऱ्यानं या विद्यार्थ्यांचं आणखी नुकसान केलं. भरतीच झाली नाही. म्हणजे शहराकडचं सगळं राहणं वायाच. मग सरकारनं काय चलाखी केली? तर नोकऱ्यांचं वय वाढवून दिलं. म्हणजे खुल्या वर्गातल्या तरुण/ तरुणीला या परीक्षांचं दळण वय ३८ होईपर्यंत दळता येतं आणि राखीव जागातल्यांना ते ४३ पर्यंत! नोकऱ्या देणार नाही, असं नाही सांगितलं सरकारनं. मतदार रागावले असते ना! त्यापेक्षा परीक्षा देण्याचं वयच वाढवून दिलं… द्या परीक्षा हव्या तेवढ्या…

काय भयानक वास्तव आहे हे! वयाच्या चाळिशीपर्यंत सरकारी नोकरीच्या परीक्षाच देत बसायचं? इतकं थांबून नोकऱ्या मिळत नाहीत त्या नाहीतच. पण नोकरीला सुरुवात करायचं वयही हातून निघून जातं.

आणि घरी आईवडिलांच्या काळजीचा गुणाकार होत रहातो. चाळिशी आली. लेकराच्या हाताला अजून काम नाही. काय होणार त्यांचं? तिकडे शहरात राहून परीक्षार्थी बनून गेलेल्या, थोराड झालेल्या लेकरांच्या जिवाची घालमेल दुसऱ्याच कारणानं वाढते. त्यांना लाज वाटू लागते… किती दिवस आईवडिलांच्या जिवावर जगायचं? ते गावात मर मर मरतात. त्यांना मिळणाऱ्या चार घासातला एक घास आपल्या शिक्षणासाठी काढून ठेवतात… आणि इकडे आपण नुसत्या परीक्षांवर परीक्षा देतोय… हाताला काही लागत नाहीये… सगळा नुसता नुकसानीचा खेळ…

एमपीएससी परीक्षांसाठी शहरांत येऊन राहिलेले हे लाखो विद्यार्थी मग निराशेच्या गर्तेत जातात. काय करतात ते मग? त्यांचं काय होतं…? याचं उत्तर पुण्यात ‘राष्ट्र सेवा दला’नं केलेल्या पाहणीत आढळतं. ही पाहणी जेमतेम साडेपाचशे विद्यार्थ्यांपुरतीच. पण या शितावरनं एमपीएससीच्या करपलेल्या भाताची पूर्ण परीक्षा होते. फार धक्कादायक आहे हे वास्तव. पुण्यात शिकायला आलेल्यातल्या लाख-दोन लाखांतले जवळपास ८० टक्के हे निम्न किंवा अतिनिम्न स्तरातले असतात. त्यातल्या मोजक्यांचीच ही आरोग्य तपासणी. प्रमोद मुजुमदारांनी ती केली. तीत एकूण सहभागी विद्यार्थी ५८२. त्यात २१८ मुली आणि उरलेले ३६४ मुलगे. शहरात मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय सराईतपणे ‘रूटीन चेकप’ जे करतो तशा यांच्या तपासण्या केल्या गेल्या.

आणि त्यातल्या ४१ टक्के विद्यार्थिनी अॅनिमिक आढळल्या, तर अशा विद्यार्थ्यांचं प्रमाण होतं २१ टक्के. इतकंच नाही. या खोलवर मुरलेल्या अशक्तपणामुळे या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या तक्रारी सुरू झालेल्या. निम्म्या मुला-मुलींत मानसिक ताणतणावाची, नैराश्यग्रस्ततेची लक्षणं दिसू लागलीयेत. आणखीही काही प्रकृतीचे गुंते दिसून आले. हा तपशील वाचल्यावर एक प्रश्न सहज पडेल : मुळात हे इतके सारे तरुण/तरुणी या वयात अॅनिमिक का? या प्रश्नाचं उत्तर अधिक क्लेशदायक आहे.

हे विद्यार्थी अॅनिमिक आहेत कारण ते एकदाच जेवतात. दोनदा जेवणं परवडत नाही. आणि एक जेवणंही अनेकदा, रस्त्यावरच्या गाडीवरचे पोहे. वर शेव घातलेले. यातल्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांचा चरितार्थ शेतीवर आहे आणि अनेकांचे आईवडील तर शेतमजूर आहेत. आईवडिलांच्या जिवावर किती खायचं असा प्रश्न त्यांना पडतोय. घरनं येणाऱ्या पैशात एकच जेवण त्यांना परवडतंय. या सगळ्यांना एकच गोष्ट खुणावत असते… ती म्हणजे तात्यांचा ठोकळा !

एमपीएससी परीक्षांना सामोरे जाणाऱ्यांना उपयोग व्हावा म्हणून एका अधिकाऱ्यानं एक बलदंड असं पुस्तक लिहिलं. त्यांना तात्या म्हणायचे म्हणे. म्हणून या पुस्तकाचं नाव तात्यांचा ठोकळा! सरकारी नोकरी कधी ना कधी मिळेल या एका आशेवर हे परीक्षार्थी विद्यार्थी दिवस-दिवस फक्त हा ‘ठोकळा’ वागवतात… उपाशीपोटी.

आता यावर एक शहरी प्रश्न असेल : ही पोरंपोरी सरकारी नोकरीच्या मागे जातातच का?

तिथेच खरी मेख आहे. त्यातल्या एकानं या प्रश्नाचं उत्तर दिलं :

‘‘आमच्या गावात सरकारी सोडल्या तर नोकऱ्या आहेतच कुठे? ना आहेत उद्याोग, ना कारखानदारी, ना व्यापार, ना उरलीये शेती? करायचं काय आम्ही?’’

निवडणुकीच्या हंगामात या प्रश्नाला भिडण्यात रस आहे कोणाला…? विद्यार्थी असोत वा अन्य… सगळ्यांचा संबंध फक्त ठोकळ्यांशीच…!!

Story img Loader