गिरीश कुबेर

परवा जपानच्या विमानतळावर अपघातग्रस्त झालेलं ते विमान बघता बघता रिकामं झालं. किती वेळ लागला असेल त्यातल्या ३७९ प्रवाशांना विमानातून उतरायला?

Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
PM Modi
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…
Marathi actress alka kubal said about behind story of these photos
अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”

गौरी देशपांडेंच्या एका कादंबरीतला हा प्रसंग आहे. अगदी सुरुवातीचाच. भारतातल्या भारतात प्रवासाला निघताना तो आठवतोच आठवतो. विशेषत: विमानाच्या प्रवासाच्या आधी. त्यांच्या कादंबरीतला ‘तो’ असा प्रवासाला निघत असतो तर ‘ती’ म्हणते. पोहोचलास की कळव. तर तो म्हणतो: हो..नाही पोचलो तर तुलाच आधी कळेल!

ही कादंबरी त्यांनी लिहिली तेव्हा मोबाइल फोन नामक प्रकरण नव्हतं. सुदैवच त्यांचं तसं. आपल्याकडे विमान धावपट्टीवर टेकतंय न टेकतंय तर लगेच विमानात आसपासच्यांच्या फोनमधनं ‘टंग’, ‘टंग’ असा टंगटंगनाद सुरू होतो. विमान पूर्ण थांबायच्या आत अनेकांचे फोन सुरू होतात. आणि सांगतात काय.. हां पोचलो हां! मग तिकडून विचारणा: पोचलास ना? त्यावर हा म्हणणार: हो आत्ताच लँड झालो..! महिलावर्ग कोणी असेल तर त्यातल्या काही सुगृहिणी थेट व्हिडीओ कॉलच सुरू करतात. मग ‘अलेलेले..कछं आहे आमचं बबडं’ वगैरे असं काहीबाही कानावर येतं. (एकदा चुकून अशा शब्दोचारी महिलेच्या मोबाइलवर नजर गेली तर तिथं बाळ कसलं, एक बाब्या होता. असो.)

या अशा मंडळींच्या घरच्यांचंही फार म्हणजे फारच अप्रूप वाटतं नेहमी. प्राण कंठाशी आणून आकाशाकडे पाहात बसलेले असतात की काय कळत नाही. का इतकाही विरह सहन नाही होत कोणास ठाऊक! हे आपलं खास भारतीयपण. मोबाइल करायचा आणि पहिला प्रश्न विचारायचा.. ‘‘काय कुठायस?’’. आणि या बऱ्याचशा विनोदी संभाषणानंतर शेवटचं वाक्य : ‘ठेवू?’ किंवा खास मराठी तुसडा संवाद झाला की हा किंवा ही चिरक्या आवाजात पलीकडच्याला आदेश देणार..‘चल ठेव आता.’ असो. तर मुद्दा विमान प्रवासाचा!

मोबाइलवरनं ‘हां पोचलो’ असं सांगून झालं की हे इसम मग उठतात आणि मग ‘सामान कक्ष’से बॅग काढणार. वास्तविक विमान आताच कुठे थांबलेलं असतं. शिडी लागायची असते. हवाईसेविकांनी नुकतेच पडदे गुंडाळायला घेतलेले असतात. पण हे ‘हां पोचलो’ सांगणारे बॅगा हातात घेऊन, चिंचोळय़ा जागेत उभे. कधीतरी वाटतं विमानाच्या कॅप्टनला सांगावं.. बाबारे उघड तो दरवाजा आणि मग हे सगळे तुंबलेले प्रवासी मग बदाबदा विमानातनं उडय़ाच मारतील बहुधा. हे सगळं विमानाख्यान आता लावायचं प्रयोजन म्हणजे गेल्या आठवडय़ात जपानमधे झालेला भयंकर विमान अपघात. टोकियोच्या हनादा विमानतळावर झालेला हा अपघात ज्यांनी कोणी पाहिला असेल त्यांच्या अंगावर निश्चितच काटा आला असेल. जे काही झालं ते काय भयंकर होतं.

कारण एक नाही तर दोन-दोन विमानं त्यात होती. समोरासमोर आदळली एकमेकांवर आणि दोन्हीही विमानांनी पेट घेतला. एक विमान त्यातलं जपानच्या तटरक्षक दलाचं होतं तर एक प्रवासी. दोन्ही विमानांनी पाहता पाहता पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळा हपापल्यासारख्या पसरू लागल्या. यातलं दुसरं विमान ‘जपान एअरलाइन्स’ या कंपनीचं प्रवासी सेवेतलं होतं. ही विमान कंपनी आपल्या एअर इंडियासारखी. या परवाच्या अपघातानं याच विमान कंपनीच्या एका भयंकर अपघाताची आठवण आली अनेकांना. १२ ऑगस्ट १९८५ या दिवशी या कंपनीचं टोक्योहून ओसाका इथं निघालेलं विमान एकदम कोसळलं. त्या विमानाच्या शेपटाकडे काही तांत्रिक दोष होता असं नंतर लक्षात आलं. खरं तर आदल्याच दिवशी त्याच भागाची दुरुस्ती केली होती तंत्रज्ञांनी. पण ती बरोबर झाली नसणार. हे विमान कोसळलं आणि त्यातले ५२४ पैकी ५२० प्रवासी त्या अपघातात गेले. जपानच्या हवाई इतिहासातला तो एक काळा दिवस!

त्या देशानं खूप भोगलंय महायुद्धांत. त्यामुळे माणसं गमावण्याचं मोल त्या देशाला नव्यानं सांगावं लागत नाही. त्यामुळे या विमान अपघातानं हा देश खडबडून उठला. या प्रवासातल्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन त्यांनी सुरू केलं. अनेक देशी-परदेशी तंत्रज्ञांना मदतीला घेतलं आणि विमान प्रवासात कोणकोणत्या गोष्टी चुकू शकतात याची जंत्री केली. ती प्रत्येक चूक दुरुस्त कशी करता येईल यावर त्यांनी अभ्यास सुरू केला. बऱ्याच गोष्टी त्यामुळे सुधारल्या. पण अशा अपघातांचं वगैरे काय होतं की त्या वेळी धक्का बसतो. नंतर नंतर त्याची तीव्रता निघून जाते आणि मग सर्व काही ये रे माझ्या मागल्या! आपल्याकडे नाही का २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरही बॅगांचे एक्सरे स्कॅनर वगैरे बसवले गेले. नंतर काहीच दिवसांनी प्रवासी त्यांना वळसा घालून जाऊ लागले आणि पुढे तर केवळ त्यांचे सांगाडेच उरले.

पण जपाननं मात्र असं होऊ दिलं नाही. अशा अपघातांच्या वेळी जे कळण्याच्या वयाचे असतात त्यांना या अपघाताचा धक्का बराच काळ पुरतो. पण जी पिढी जन्मालाच आलेली नसते त्यांना काही त्याची तीव्रता त्यांच्या कळायच्या वयात जाणवायची काही शक्यताच नसते. तसं होणं साहजिकच. आणि असं काही नव्या पिढीला सांगायला कोणी गेलं की काय आणि कशी त्यांची प्रतिक्रिया असते त्याचा अनुभव अनेकांना असेलच. जपानमधल्यांनाही तो तसा येत गेला. विशेषत: जपान एअरलाइन्स कंपनीच्या वरिष्ठांना हे जाणवलं. या कंपनीत नव्यानं लागणाऱ्यांना त्या अपघाताचं काहीही गांभीर्य नव्हतं. अनेकांना तर तो माहीतही नव्हता. विशेषत: २००५ सालानंतर- म्हणजे या अपघातानंतर २० वर्षांनी- या कंपनीत कामाला लागणारे हे असे होते. हा अपघात झाला तेव्हा, म्हणजे १९८५ साली, हे जन्मालाही आलेले नव्हते आणि जे जन्मलेले होते ते अगदी तान्हे होते. त्यांना या अपघाताविषयी इतकी संवेदनशीलता कशी असणार! आणि ही अशी संवेदनशीलता हे तर जपानी संस्कृतीचं मर्म! जागरूक संवेदना माणसांना जमिनीवर ठेवतात, असं ते मानतात. तेव्हा या आपल्या इतिहासातल्या त्या भीषण अपघाताची संवेदना जागरूक ठेवण्यासाठी या विमान कंपनीनं काय केलं?

तर नव्यानं लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे कक्ष असतात तिथल्या भिंतींवर या अपघाताची भीषणता दाखवणारी छायाचित्रं भल्या मोठय़ा आकारात लावली गेली. विमानाचे चुरगाळलेले, चोळामोळा झालेले अवशेष तिथं टांगून ठेवले. त्या अपघातात दगावलेल्यांच्या निकटवर्तीयांच्या हृदयद्रावक पत्रांची छायाचित्रं तिथं लावली. या सगळय़ाविषयी कोणी काहीही नव्यानं रुजू होणाऱ्या कामगारांना सांगायचं नाही. सांगतही नाहीत. म्हणजे हे सर्व अजून तसंच ठेवलं गेलेलं आहे. विमान कंपनीच्या व्यवस्थापकांनी केलंय ते इतकंच की आपल्या कर्मचाऱ्यांना या अपघाताचं विस्मरण होणार नाही, इतकी काळजी मात्र त्यांनी घेतलीय. कोणत्याही व्यवसायात अनुभव, प्रशिक्षण वगैरेंतून एक ‘एसओपी’ तयार झालेली असते. ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पाळली की कामं सुकर होतात. अपघात होत नाहीत. झाले तरी त्यांची तीव्रता कमी असते. विमान प्रवासातली ही एसओपी आपल्या कर्मचाऱ्यांना जपानी कंपनीनं इतरांसारखी शिकवली. पण तिचा विसर कधी पडणार नाही, याची खबरदारी तितकी त्यांनी सतत घेतली. परिणाम काय झाला?

तो परवाच्या अपघातात दिसला. यातल्या जपान एअरलाइन्सच्या विमानात ३७९ इतके प्रवासी होते. त्यातला एकही या भीषण अपघातात दगावला नाही. दगावणं राहिलं दूर एकालाही साधा ओरखडासुद्धा आला नाही. विमानाला अपघात होतोय हे दिसल्याबरोबर पायलट आणि विमानातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ‘एसओपी’चे इतकं तंतोतंत पालन केलं.. आपोआप.. की हे अपघातग्रस्त विमान बघता बघता रिकामं झालं. किती वेळ लागला इतक्या ३७९ प्रवाशांना विमानातून उतरायला?

फक्त ९० सेकंद. अवघ्या दीड मिनिटांत अख्खं विमान रिकामं केलं गेलं. हे कसं जमलं त्याच्या तपशीलवार कहाण्या आता चर्चिल्या जातायत. पण त्यातला एक मुद्दा फार म्हणजे फारच महत्त्वाचा आहे. या विमान कंपनीच्या प्रमुखांनी या साऱ्याचं श्रेय दिलं प्रवाशांना. यातल्या एकानंही घाबरं-घुबरं होऊन काही वेडपटपणा केला नाही की रडारड सुरू केली नाही. सगळेच्या सगळे विमानातल्या कर्मचाऱ्यांच्या सूचना ऐकत होते. कोणी मोबाइलवर शूटिंग वगैरेही करायला घेतलं नाही. आणि सगळय़ात महत्त्वाचं.

यातल्या एकानंही उतरताना सामान कक्षातली आपली बॅग काढून बरोबर घेण्याचा प्रयत्नही केला नाही. सगळं काही इतकं शिस्तबद्ध झालं की ही सुखदकथा विमान क्षेत्रात अगदी चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय झालीये.

सकल राष्ट्रीय उत्पन्नात आपण लवकरच जपानला मागे टाकणार असल्याचं शुभ वर्तमान आपल्याला सारखं दिलं जातंय. सकल राष्ट्रीय उत्पन्नात काय काय मोजता येतं हे एकदा कोणाला तरी विचारायला हवं.

(जपानमधील टोकियो येथील हनादा विमानतळावर भूकंपग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या विमानाशी टक्कर झाल्यानंतर जपान एअरलाइन्सच्या ए ३५० या विमानाला आग लागली.)

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

Story img Loader