गिरीश कुबेर
लिटफेस्ट आणि साहित्य संमेलन या संकल्पनांतच मूलभूत फरक आहे. आणि त्यात परत जयपूर लिटफेस्ट आणि अन्य लिटफेस्ट यातही भेद आहे. तो काय याची फोड करत बसण्यात काही अर्थ नाही. उगाच वर्गविग्रहाचा आरोप नको. जयपूर लिटफेस्टचा माहोल आधी चढतो. आणि मग लिटफेस्टची घटका-पळं आपल्याला आणखी चढवतात.
इथलं सगळ्यात कोणतं वैशिष्ट्य असेल तर ते म्हणजे इथे फक्त कावलेले प्रकाशक, बुभुक्षित लेखक, सततोत्सुक कवी इत्यादीच भेटतात असं नाही. एखादा डॉक्टर भेटतो. राजकारणी तर अनेक असतात. कार्यक्रमासाठी आलेले. उगाच ‘‘साहित्याच्या मंचावर राजकारणी असावेत का…’’ वगैरे निरर्थक चर्चा नाही. राजकारणी आलेला असतो तोही साहित्यप्रेमी म्हणूनच. आता साहित्यप्रेमी राजकारणी म्हणजे काय हा प्रश्न मराठी सारस्वतांना पडेल कदाचित. पण इंग्रजी आणि हिंदी साहित्य विश्व तसं राजकारण-श्रीमंत. पण राजकारणी आलेत म्हणून त्यांना कवीपेक्षा जास्त वेळ वगैरे असा प्रकार नाही. सगळ्यांचेच कार्यक्रम फार फार तर तासभराचे. सुरू झाल्यावर व्यासपीठावरच्यांनाच दिसेल असं भलंमोठं डिजिटल घड्याळ असतं. त्यावर उलटगणती सुरू असते. त्यामुळे आपल्याला किती वेळ ताणायचंय हे सहभागींना बरोबर समजत राहतं. आणि वेळ संपली की मंचाच्या उजवीकडून निवेदक उगवतोच उगवतो…! त्यामुळे कोणताही कार्यक्रम प्राध्यापकी परिसंवादी रटाळपणा वागवत नाही. सगळं कसं आटोपशीर. सुबक आणि छान.
त्यात लेखक म्हणून सहभागींचं निमंत्रण असेल तर सोन्याला सुगंधच म्हणायचा. तो यावेळी अनुभवता आला. मुख्य मंचाच्या मागच्या बाजूला लेखक/सहभागींसाठीचा विशेष कक्ष होता. प्रवेशालाच दांडगे बाउन्सर. आत जाताना गळ्यातल्या पासकडे रोखून पहायचे. त्यांना तसं काही घेणंदेणं नव्हतं आत जाणारी व्यक्ती रघुराम राजन आहे की शिवशंकर मेनन की रघुनाथ माशेलकर की आणखी कोणी. पहिल्याच दिवशी आत गेलो तर समोर कलापिनी. सकाळी त्यांच्या गाण्यानं उद्घाटन झालेलं. त्यांच्याशी बोलतोय न बोलतोय तोच रघुराम राजन आले. अलीकडेच त्यांची मुंबईत भेट झालेली आणि जयपूरला यायच्या आदल्या दिवशी ते मुंबईत होते. राज्यसभा हा मुद्दा आलाच गप्पांत. शिवशंकर मेनन, सचिन पायलट, उद्याोगपती नौशाद फोर्ब्स, कोणी हिंदी भाषक कवी होते, काही लेखक न्यूयॉर्क-लंडनमधनं आलेले. सगळे जण आपली पदं, सामाजिक स्थान वगैरे विसरून एकमेकांशी गप्पा मारत होते. आतल्या खान‘पान’ सेवेची जबाबदारी ‘लीला’ हॉटेलची. साहित्य संमेलनात ताज, लीला वगैरे असणं म्हणजे… जाऊ दे !
तर या अशा रेंगाळत्या वातावरणात उभं राहून कंटाळा आल्यावर म्हटलं जरा बसूया. कोपऱ्यात एक खुर्ची रिकामी होती. हातातला पुस्तकांचा गठ्ठा टेबलावर ठेवला आणि जरा टेकलो. समोरच्या खुर्चीवर क्रोसां खात एक बाई बसलेल्या. वयानं साधारण सत्तरी-पंचाहत्तरीच्या असतील. युरोपियन. चेहऱ्यावर अशा वयात येतं तसं एक प्रसन्न शहाणपण सुरकुत्यातनं दाटलेलं. गुड-मॉर्निंग, हाय-हॅलो झालं… आणि बाईंच्या गप्पा एकदम ऐकाव्याशा वाटू लागल्या.
त्यांचं नाव डॉ. इल्स कोलर रोलेफ्सन (Dr Ise Kohler Rollefson). मूळच्या जर्मन. सध्याचा पत्ता बुटी बाग, मामाजी की धुनीजवळ, राजपुरा, राजस्थान. त्यांना विचारलं ही जागा कुठे आहे तर म्हणाल्या जोधपूरच्या जवळ. पण तशा त्या राजस्थानभर फिरत असतात. जवळपास संपूर्ण राजस्थान त्यांनी पायाखालनं घातलाय. महाराष्ट्रातही येऊन गेल्यात. गेली १३ वर्षं त्या मामाजी की धुनीजवळच्या या गावात राहतायत.
करतात काय?
उंट या प्राण्याचं संरक्षण आणि संवर्धन. वडिलांबरोबर एकदा त्या तरुणपणी राजस्थानात येऊन गेल्या होत्या. पर्यटक म्हणून. तेव्हाच त्या या राज्याच्या प्रेमात पडल्या. या दौऱ्यात अनेक उंट त्यांनी पाहिले असणार. त्यांची कणव आली त्यांना. खरं तर त्या काही प्राणिशास्त्राच्या डॉक्टर नाहीत. पुरातत्त्व शास्त्र, त्यातलं शिकवणं वगैरे असं बरंच काही केलं त्यांनी. पण भारतात आल्या की हा उंट नामक प्राणी त्यांना छळायचा. त्याच्याकडे कसं दुर्लक्ष होतंय, त्याच्या संवर्धनासाठी काही शास्त्रीय उपाययोजना नाहीयेत असं लक्षात आलं आणि कोणी करत नाहीये तर काय झालंङ्घआपणच ते करूया म्हणून त्या कायमच्या येऊन राहिल्या. थेट जर्मनीतूनच मामाजीकी धुनीजवळ.
प्राणिप्रेमींना कधीही प्राण्यांविषयी विचारण्याची चूक करायची नसते असा इशारा माझे मित्र माझ्या नव्या परिचितांना नेहमी देत असतात. तो खराही असतो हे मी स्वत: इतरांना काय काय ऐकवतो यावरून ठाऊक होतं. पण तरीही एक प्राणिप्रेमी दुसऱ्या प्राणिप्रेम्याला हा इशारा धुडकावून हवं ते विचारतोच विचारतो. मीही तेच केलं. त्यातून सुरू झालं त्याचं अत्यंत लोभस उंटपुराण…
इतका सभ्य आणि सोज्वळ असतो उंट की त्याच्याइतका सोशीक प्राणी शोधूनही मिळणार नाही. खूप जीव लावतो. उंट हा राजस्थानचा राज्यप्राणी आहे. पण कोणत्याही राज्यात आपल्याकडे ज्या सरकारी उत्साहानं प्राण्यांकडे दुर्लक्ष होतं त्याचप्रमाणे राजस्थानातही उटांची खूपच हेळसांड होते. म्हातारे झाले की बिचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं. आता सरकारी पांजळपोळ आहे उंटांसाठी… तिथे नेले जातात हे उंट कोणी मोकाट उंटांची तक्रार दिली की… पण तिथे उंटांना नेणं म्हणजे मरायला नेणं. काही सोयीसुविधा नाहीत. उपचारांची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शांतपणे हळूहळू मरू लागतात तिथले उंट. साधारण १८-२० वर्षं आयुष्य असतं त्यांचं. माणसांना वाटतं काहीही, कसलाही हिरवा पाला खातो हा प्राणी. पण तो तरी काय करणार? हवं ते मिळालं नाही की मिळेल ते खाणारच ना ! खरं तर राजस्थानातनं उंट बाहेर न्यायला मनाई आहे. तरी ते नेले जातात. स्मगलिंग होतं त्यांचं. महाराष्ट्रात नागपूरच्या भागात हे चोरून नेलेले उंट नेले जातात. पुढे त्यातल्या काहींचं काय होतं हे सांगवत नाही…
उंट अगदी घोड्या-कुत्र्याइतकाच आपल्या हाताळणाऱ्यांना ओळखतो. चांगला प्रतिसाद देतो. त्यांच्याजवळच्या एका उंटिणीनं एका मुलाला जणू दत्तकच घेतलं होतं. घरातला तो पोरगा त्या उंटिणीचं काही दिवस हवं-नको बघत होता. तेव्हापासून ती उंटीण त्याला जरा डोळ्याआड होऊ द्यायची नाही. इकडे-तिकडे धावत गेला तर त्याच्या मागे जायची पहायला…
तुमच्या संशोधनांचा, निरीक्षणांचा फायदा काय विचारलं त्यांना. विचारात पडल्या. कदाचित सांगावं-न सांगावं असंही वाटलं असेल. पण म्हणाल्या खरा आहे तुमचा प्रश्न. फायदा काय? आम्ही करतो सरकारला शिफारशी उंटांसाठी असं करा… तसं करा… वगैरे. आता सरकारच ते. त्यांना त्यांचे प्राधान्यक्रम असतात. त्यात कुठे उंट बसायला…!
हे हताश उद्गार, त्याआधीचा पॉज बरंच काही सांगून जात होता. मग अधिक कटू काही चर्चा नको म्हणून त्यांना विचारलं तुम्ही इकडे कशा? एकदम लिटफेस्टमध्ये?
त्या दरवर्षी न चुकता येतात जयपूर लिटफेस्टला. काही चर्चांतही सहभागी होतात. मुख्य म्हणजे त्यांचं पुस्तक आहे. अर्थातच उंट या विषयावर. कॅमल कर्मा असं त्याचं नाव. मुखपृष्ठावर एक उंट लहान बाळानं घ्यावी तशी बाईंच्या गालावर ‘पापी’ घेत असल्याचा फोटो आहे. इतक्या वर्षांत उंट या विषयावर बोलणारं पहिल्यांदाच कोणी भेटलं…
मग ‘लंगुर्स ऑफ अबु’ लिहून भारतीय माकडांवर अनंत उपकार करणाऱ्या सारा हर्डी, जेन गुडाल आठवल्या, जिम कॉर्बेट, भारतीय जंगलावर लिहिणारा केनेथ अँडरसन आठवला… या सगळ्यांचं या मातीशी/ प्राण्यांशी काहीही देणंघेणं नव्हतं. तरीही त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या अभ्यासावर घालवलं. आणि आता ही उंटावरची ‘शहाणी’…