सेगोव्हिया काय आणि टोलेडो काय… टेकडीवर वसलेल्या या नितांतसुंदर गावांचं रोजचं जगणंच सुंदरतेत बुडून गेलं आहे…
एखाद्या बैठकीत एखाद्या नवख्या, फारशी अपेक्षा नसलेल्या गायकाच्या गाण्यानं सुखद धक्का द्यावा आणि त्यानं आणखी जरा गायला हवं असं वाटू लागावं तसं स्पेननं केलं. अगदी ‘…किती घेशील दो कराने’ अशी अवस्था त्या देशात होते. आणि मग वाटतं जरा जास्त काळ इथं थांबायला हवं. पण यात काही अर्थ नसतो. कारण जास्त म्हणजे नक्की किती याचं काही उत्तर मिळत नाही. प्रवासानंदासाठी अत्यावश्यक सर्व चौकोनांवर स्पेन टिकमार्क करतो. या एका इतक्याशा देशात जागतिक वारसा दर्जाची तब्बल ४७ स्थळं/ गावं आहेत. स्पेनच्या तुलनेत मोजूही नये इतक्या महाप्रचंड भारतात अशा स्थळांची संख्या आहे ४२ इतकी. या एका मुद्द्यावरनं स्पेनमध्ये पर्यटनाचा दारूगोळा किती ठासून भरलाय ते लक्षात येईल.
या दारूगोळ्यांच्या तोफखान्याला ठिणगी लावणारं सेगोव्हिया हे असंच एक रम्य गाव. आम्ही पोहोचलो तेव्हा ते जागं व्हायचं होतं. जरा जास्त वेळ मिळावा म्हणून लवकर निघालो माद्रिदहून. गाव जागं व्हायच्या आधीच आपण असे ताजे तरतरीत तिथे गेलो की जो अनुभव येतो तो वेगळाच असतो. खरं तर कोणालाही असं जागं होत, समोर उलगडणाऱ्या दिवसाला सामोरं जाण्यासाठी ‘तयार होताना’ बघणं तसं नेहमीच आनंददायक. आणि इथं तर काय युरोपमधलं एक रम्य गाव हे असं डोळ्यासमोर ‘तयार होत’ होतं. ते समोर येण्याआधी एखाद्याच्या कंबरेभोवती सहचराचा प्रेमळ हात असावा अशी नदीची एक वेलांटी दिसते आणि मग गाव.
सेगोव्हियाच्या प्रवेशालाच एक भली मोठी दगडी उभारणी. तो पूल नाही, भिंत नाही. नुसत्या कमानी. एकमेकांना खेटून उभ्या केलेल्या आणि त्यांची अशी लांबलचक रांग. जवळ गेल्यावर कळतं ही रचना ‘बांधीव’ नाही. म्हणजे सिमेंट, माती वगैरेंनी या दगडी रचनेला उभं केलंय असं नाही. नुसतीच दगडं एकावर एक रचून ही सुबक उभारणी. तिथं त्याबाबत विचारलं तर कळतं ही जलवाहिनी आहे. उजवीकडच्या डोंगरावरून डावीकडच्या गावापर्यंत पाणी गुरुत्वाकर्षणानं वाहून नेता यावं यासाठी ही रचना. रोमन साम्राज्याच्या काळात ती उभारली गेली. तिथला एक जण म्हणाला, यातला एक दगड जरी काढलात तरी सगळा डोलारा कोसळेल. पण काही शे वर्षं तरी कोणी असा उपद्व्याप केलेला नसणार. कारण रोमन साम्राज्याच्या काळातली ही रचना अजूनही तशीच्या तशी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दगडी असूनही तिथं त्यावर खिळे, कर्कटकाच्या लेखणीनं हृदय-बाण काढून त्यावर आपलं नाव कोरणारे पप्पू आणि पिंकी नाहीत. इतकं रम्य गाव आणि तरीही हे असलं लिहिणारे नाहीत हेही तसं आश्चर्यच. अगदी युनेस्कोचा दर्जा मिळावा असं. असो.
हे गाव म्हणजे एक टेकडी आहे. वळणावळणाचा रस्ता. रुंदी जेमतेम दहा-बारा फुटांची असेल. दोन्ही बाजूला दुकानं. त्यांची मांडामांड सुरू होती. ते बघत बघत निवांतपणे वर गेलं की समोर एक कॅसल. भव्य पण नाजूक. पाहिल्यासारखा वाटतं याला कुठे तरी. खरं तर असे कॅसल ही जर्मनीतल्या बव्हेरियाची मक्तेदारी. ऱ्हाईनच्या जंगलात झाडांच्या मधनं हात वर करणारी या कॅसल्सची टोकं विलोभनीय वाटतात. पण इथं हा कॅसल कसा? मग माहिती मिळते डिस्नेमधल्या गोंडस सिंड्रेलाचा कॅसल या इथल्या रचनेवर बेतलाय. अल्काझार असं याचं इथलं नाव. म्हणजे राजवाडा. त्याच्या चार बाजूनं चार सज्जे. इकडून तिकडे जाताना त्यावरनं खालचं गाव वेगवेगळ्या कोनातनं दिसतं. सारा आसमंत इतका सुंदर की तो पाहिल्यावर एकच एक प्रश्न मनात येतो : रोजचं जगणंच इतक्या सुंदरतेत बुडून गेलेलं असताना कशाला उठून ही मंडळी युद्धबिद्ध करायला गेली? या कॅसलभोवती हे गाव वसलंय. या इतक्याशा गावात विद्यापीठ आहे. ते पाहून विद्यार्थ्यांविषयी कणव दाटून आली. इतक्या ‘रमणी’य परिसरात अभ्यास करावा लागण्याइतकं पाप दुसरं नसेल! इथं काही वस्तुसंग्रहालयं आहेत. त्यातलं एक चक्क खाद्यापदार्थांचा इतिहास ‘चवीचवी’नं मांडणारं आहे.
या गावाच्या नशेतनं बाहेर येतोय न येतोय तो आम्ही दुसऱ्या अशाच सुंदर गावात शिरलो. तुलनादर्शक ‘असंच’, ‘यापेक्षा’ असे कोणतेही शब्दप्रयोग या गावांबद्दल करू नयेत, हा धडा युरोपनं केव्हाच शिकवलेला. त्यामुळे हे सुंदर की ते अधिक सुंदर वगैरे जमाखर्च मांडण्याच्या फंदात न पडता ‘टोलेडो’ला असंच भिनू दिलं. हे गावही एका टेकडीवरच. युनेस्कोचा वारसा वगैरे आहेच यालाही. गावाच्या प्रवेशद्वारातच एक प्रचंड मोठा चौक. तिथलं वातावरण पाहून टेकायला हवं असं वाटतं. तशीही ही टेकडी चढून आल्यानं पायांना विश्रांतीची गरज असते. इतकं लहानसं गाव हे; पण ते चढून येण्याचे कष्ट ज्यांना नको असतील त्यांच्यासाठी अद्यायावत एस्केलेटर्स आहेत. सरळसोट वर जाणारे. अशा चार चार एस्केलेटर्सवरनं चढाई करावी लागते मुख्य गावात येण्यासाठी.
सांस्कृतिकदृष्ट्या हे गाव एकदम इस्तंबूलचीच आठवण करून देतं. टर्कीप्रमाणे या गावालाही त्रिधर्मी इतिहास आहे. रोमन कॅथलिक्स, यहुदी आणि इस्लाम. संपूर्ण डोंगरभर इमारतींचा रंग एकच. उंचीही एकसारखीच. पण वास्तुकला मात्र जनुकांतला धर्म दाखवून देणारी. तिकडे या संस्कृतीचा उगम असलेल्या जेरुसलेममध्ये भले इस्लामी आणि यहुदींत किंवा यहुदी आणि ख्रिाश्चन यांच्यात मतभेद असतील. इथं हे तिघेही गुण्यागोविंदाने शेजारी शेजारी राहताना दिसतात. टोलेडो हे आयबेरिया प्रांतात येतं. हा प्रांत म्हणजे युरेशियाचं एक टोकच. त्याची म्हणून एक भौगोलिक श्रीमंती आहे. टोलेडोच्या अंगापिंडावरनं आणि इथल्या नागरिकांच्या रसरशीतपणातनं ती अगदी सहज दिसून येते. मुळात स्पॅनिश तसे रुंद हाडापेरांचे. टोलेडोत ही वैशिष्ट्यं अगदी ठसठशीतपणे दिसतात. सेगोव्हियाप्रमाणे या गावाभोवतीही एका गोंडस- मुख्य म्हणजे वाहत्या- नदीचा वळसा आहे. तिच्या काठावरनं वर बघितलं की एखाद्या चित्रकाराच्या स्वप्निल चित्रातलंच गाव वाटतं ते. आणि वरून खाली बघितलं की ती नदी तळहातावरच्या रेषेप्रमाणे वळलेली दिसते.
हे काय किंवा सेगोव्हिया काय, ही गावं पायी फिरत पाहायची. इतकी लहानशी आहेत की गाड्यांना बंदीच आहे. स्थानिक महापालिकेची छोटी वाहनं तेवढी फिरू देतात तिथं. पण या दोनपैकी टोलेडोचं वैशिष्ट्य आहेत ते इथले सर्पिलाकार रस्ते. जगातलं सगळ्यात गोंधळवून टाकणारे रस्ते असं त्यांचं वर्णन केलं जातं. गल्ल्यागल्ल्या अगदी एकसारख्या. आपण आता ही पाहिली की ती असा गोंधळ हमखास उडतो. त्यामुळे प्रयत्नपूर्वक काही खाणाखुणा लक्षात ठेवूनच हिंडावं लागतं इथं. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिकडेतिकडे तलवारींची दुकानं दिसतात. या गावचं पोलाद म्हणे विशेष चांगलं असतं. त्यामुळे इथल्या तलवारी हजारो वर्षांपासनं त्यांच्या दर्जासाठी ओळखल्या जातात. आणि गंमत अशी की पर्यटकही त्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. वाटलं आपणही एखादी घेऊन यावी… इथं कोणाला तरी उपयोगी पडेल… हल्ली मध्यरात्री भर चौकात वाढदिवसाचे केकबिक कापायला लागतात तलवारी अनेकांना. पण त्या तलवारीचं शारीरिक आणि आर्थिक वजन लक्षात घेता तो विचार बारगळला. टोलेडो ही एके काळी स्पेनची राजधानी होती. त्यामुळेही तलवारीचं स्थानमाहात्म्य!
या दोन गावांच्या नितांतसुंदर आठवणी घेऊन परतताना स्थानिक मार्गदर्शक म्हणाला, माद्रिद हे नावही मुळात इस्लामीच! त्याचा अरेबिक-शैलीतला उच्चार त्यानं करून दाखवला. तो म्हणाला, आमची वास्तुकला, खाद्यान्न, रंगरंगोटी अशा सगळ्यावर इस्लामचा मोठा प्रभाव आहे. शेकडो वर्षं स्पेन इस्लामी आधिपत्याखाली होता, त्याचा प्रभाव अजूनही आहे. त्या मार्गदर्शकाला नाव विचारलं. तो ख्रिाश्चन निघाला. ते ऐकल्यावर म्हटलं, मग माद्रिद वगैरे नावं बदलण्याची मागणी अजून नाही केली तुमच्याकडे कोणी?
त्याला तो प्रश्नच कळला नाही. त्याच्या गप्पा ऐकत ऐकत माद्रिदला परतलो. संध्याकाळचे साडेआठ-नऊ झाले असतील. उन्हं कलली होती. त्या उतरत्या उन्हाच्या गारव्यात माद्रिदभर फुललेला ब्ल्यू जॅकारांडा- निळा गुलमोहर- अधिकच सुशांत आणि समजूतदार वाटू लागला.