एक वर्ष ते सेकंदाचा शतांश, इथपर्यंत आपले कालमापन पोहोचले होते. ते भौगोलिक ज्ञानावर आधारित होते. पण त्यातील शुद्ध ज्ञानाचा वारसा जाऊन कर्मकांडांना महत्त्व आले. मूळ भूगोल, त्याचे संशोधन व संशोधक विस्मृतीत गेले.

येन मूर्ती नामुपचयाश्चापयाश्च लक्ष्यंते तं कालमाहू ।

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला

तस्येव कयाचितक्रियया युक्तस्याहरिती भवति रात्रिरितिच ।

  • पतंजली महाभाष्य

(ज्याच्यामुळे पदार्थाची क्षय व वृद्धी प्रत्ययाला येते, तो काल होय. सूर्याच्या गतीशी संयुक्त झाल्यामुळे त्याचे दिवस व रात्र असे विभाग कल्पिले जातात.)

भारतात ‘काल’ ही तत्त्वज्ञानात्मक संकल्पना असली तरी कालमापन मात्र भौगोलिक घटितांवर (पृथ्वी चंद्र, सूर्य यांच्या गतीवर) आधारित होते. पतंजलींच्या काळी, म्हणजे इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात, सूर्य पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे दिवस-रात्र होतात, असे मानले जाई. इ. स. च्या पाचव्या शतकात आर्यभट हे महान संशोधक होऊन गेले. पृथ्वी स्वत:भोवती फिरते व त्यामुळे दिवस-रात्र होतात आणि त्यामुळेच सूर्य, चंद्र व तारे पश्चिमेकडे गेल्याचा भास होतो, हे त्यांनी ओळखले होते. नावेतून पुढे जाणाऱ्याला किनारा मागे जाताना दिसतो, हे उदाहरण त्यांनी दिले. मात्र भावी काळात वराहमिहीर, ब्रह्मगुप्त इ.नी आर्यभटांच्या पृथ्वीच्या परिवलनाच्या कल्पनेस विरोध केला व ती मागे पडली.

हेही वाचा : बुकबातमी : टंगळ्या-मंगळ्यांचा महोत्सव, तरी…

‘नक्षत्रे’ ही भारतीय कालगणनेतील मूलभूत संकल्पना आहे. चंद्र व सूर्याच्या आकाशातील भ्रमणमार्गास आयनिक वृत्त म्हणतात. त्याचे २७ भाग कल्पिण्यात आले, त्यांना नक्षत्र म्हणतात. नक्षत्रे २७ च मानली याचे कारण हे की चंद्राला नक्षत्र चक्राची एक फेरी पूर्ण करण्यास सुमारे २७ दिवस (अचूक २७ दिवस ८ तास) लागतात. तात्पर्य चंद्राने एक दिवसात आभाळात काटलेले अंतर म्हणजे एक नक्षत्र होय. हे क्षेत्र सुमारे १३ अंश (३६० भागिले २७) विस्ताराचे असते. त्यांनाच अश्विनी, भरणी, कृत्तिका ते रेवती अशी नावे देण्यात आली आहेत. पण आकाशाच्या पटलावर नक्षत्रांचे क्षेत्र ओळखणार कसे ? त्यामुळे खुणेसाठी त्या त्या भागातील तारे निश्चित करण्यात आले. पुढे ते तारेच नक्षत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. सूर्य एका नक्षत्रात सुमारे १५ दिवस असतो. एका नक्षत्राचे चार भाग मानण्यात आले आहेत. त्यांना चरण म्हणतात. चंद्र एका चरणात सुमारे सहा तास असतो.

आपले वर्ष सूर्यावरून ठरते, तर महिना हा चंद्रावरून. याची सांगड भारतात प्राचीन काळीच घातली गेली. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळे आपल्याला वर्षभरात सूर्याच्या आजूबाजूस असणारे तारे बदलत गेलेले दिसतात. हेच सूर्याचे भासमान भ्रमण होय. एका नक्षत्रापासून सुरुवात करून पुन्हा त्याच नक्षत्रात येण्यास सूर्याला सुमारे ३६५.२५ दिवस लागतात. पाचव्या शतकातील आर्यभटांच्या गणितानुसार एक वर्षाचा कालावधी जवळपास अचूक म्हणजे ३६६.२ दिवस येतो.

या एक वर्षाची विभागणी आपण १२ महिन्यांत केली. कारण एका वर्षात चंद्राच्या पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणा होतात. अमावास्या ते अमावास्या (किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा) हा कालावधी सुमारे ३० दिवसांचा मानला जातो. पण खरे तर चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास सुमारे २९.५ दिवस लागतात. म्हणजे एक वर्षाच्या काळात आपण प्रत्यक्षात ३६५.२५ नव्हे तर (२९.५ गुणिले १२ असे) ३५४ दिवसच मोजतो. ते दरवर्षी सुटणारे ११ दिवस भरून काढण्यासाठी तीन वर्षांनंतर एकदा अधिक मास मानला जातो. त्यामुळे भारतीय सण व उत्सवांचे महिने हजारो वर्षांतही स्थूल मानाने कायम राहतात. इतर कॅलेंडरमध्ये (उदा. मुस्लीम हिजरी कॅलेंडरनुसार) कालगणना फक्त चंद्रावर आधारित असून त्यांची सांगड सूर्यवर्षाशी घातलेली नाही. यामुळे त्यांचे वर्षाचे दिवस तसेच सण, रमजान इ. चे दिवस दरवर्षी मागे मागे पडून त्यांचे महिने बदलत जातात.

हेही वाचा : अन्वयार्थ : मूल्यमापनाची ‘परीक्षा’

भारतीय महिन्यांच्या नावांमागेही एक विशिष्ट सूत्र आहे. सामान्यत: जे नक्षत्र ज्या महिन्यात पौर्णिमेच्या चंद्रासोबत उगवते व त्याच्यासोबत मावळते, त्या नक्षत्रावरून त्या महिन्यास नाव दिले गेले. म्हणजे ते नक्षत्र त्या पौर्णिमेच्या रात्री रात्रभर आकाशात दिसते. उदा. चैत्र हे नाव चित्रा नक्षत्रावरून दिले गेले. याचा अर्थ असा की चैत्र पौर्णिमेला चित्रा नक्षत्र संध्याकाळी चंद्रासोबत उगवते व पहाटे चंद्रासोबत मावळते. अशाच प्रकारे ‘विशाखा’वरून वैशाख, ‘ज्येष्ठा’वरून ज्येष्ठ, ‘आषाढा’वरून आषाढ, ‘श्रवणा’वरून श्रावण ते ‘फल्गुनी’ वरून फाल्गुन ही नावे महिन्यास देण्यात आलेली आहेत.

आठवडे व राशी ही मूळ भारतीय संकल्पना नाही. आपले कालमापन नक्षत्रांवर तर पाश्चात्त्यांचे राशी व आठवडे यावर आधारित आहे. आपण सूर्य-चंद्राच्या भ्रमण मार्गाचे २७ भाग पाडले व त्यांना नक्षत्र मानले. पाश्चात्त्यांनी त्याचे १२ भाग पाडले व त्यांना झोडिअॅक साइन्स (zodiac signs) असे नाव दिले. त्या त्या भागातील ताऱ्यांच्या आकृतीत त्यांनी सिंह, वृश्चिक इ. प्राण्यांची कल्पना केली. म्हणून त्यास ‘प्राणीचक्र’ असेही म्हणतात. त्याच राशी होत. पुढे अलेक्झांडरच्या काळापासून किंवा त्याच्या मागे-पुढे भारतीय व पाश्चात्त्य संकल्पनांची देवाण-घेवाण होऊ लागली. आपल्या २७ नक्षत्रांत आपण त्यांच्या १२ राशी सामावून घेतल्या. त्यामुळे एका राशीत सुमारे सव्वादोन नक्षत्रांचा समावेश करण्यात आला. उदा. मेष राशीत आपल्या अश्विनी, भरणी व कृत्तिकेचे एक चरण अशी सव्वादोन नक्षत्रे मानली गेली. याच क्रमाने पुढील राशीत प्रत्येकी सव्वादोन नक्षत्रे विभागली गेली. त्या राशींच्या पाश्चात्त्य नावांचेही रूपांतर भारतीय भाषेत करण्यात आले. उदा. ‘लिओ’चे सिंह, ‘स्कॉर्पिओ’चे वृश्चिक असे नामांतर करण्यात आले.

आपण एक महिन्याची विभागणी दोन भागांत केली आहे. अमावास्या ते पौर्णिमा शुद्ध किंवा शुक्ल पक्ष व पौर्णिमा ते अमावास्या कृष्ण किंवा वद्या पक्ष. या एकेक पक्षात प्रतिपदा ते पौर्णिमा (किंवा अमावास्या) असे १५ दिवस मानले आहेत. त्यांना तिथी म्हणतात. पाश्चात्त्यांनी मात्र एक महिन्याची विभागणी सात दिवसांच्या चार आठवड्यांत केली. संस्कृती संगमात तीही संकल्पना आपण स्वीकारली. त्यांच्या संडेचे रविवार, मंडेचे सोमवार, सॅटर्डेचे शनिवार असे रूपांतर आपण करून घेतले. त्यामुळे सध्याच्या आपल्या कालगणनेत पक्ष पंधरवडा व आठवडे या दोन्हींचा संगम आढळतो.

हेही वाचा : लोकमानस : दिल्लीवरील भाराच्या विकेंद्रीकरणाची गरज

एक दिवस म्हणजे पृथ्वीची स्वत:भोवतीची एक प्रदक्षिणा. प्राचीन काळापासून भारतात एका दिवसाचीही विभागणी तास व मिनिटांत नव्हे तर घटिका व मुहूर्त व त्याहून अधिक सूक्ष्म स्तरापर्यंत करण्यात आलेली होती. उदा. एका दिवसाचे किंवा रात्रीचे (१२ तासांचे) चार याम किंवा मुहूर्त, एका मुहूर्ताच्या २ नाडिका, एका नाडिकेचे १५ लघु, एका लघुच्या १५ काष्ठा, एका काष्ठेचे पाच क्षण, एका क्षणाचे तीन निमेष, एका निमिषाचे तीन लव, एक लवचे तीन वेधस आणि एका वेधसच्या १५ त्रुटी. या कोष्टकावरून एक त्रुटी म्हणजे एक सेकंदाच्या शतांशाहून लहान काळ. त्याहूनही सूक्ष्म मापे दिलेली आहेत. वरील कोष्टक ब्रह्मांड, विष्णू व वायू पुराणानुसार आहे. इतरत्र वेगळी कोष्टके आढळतात.

तात्पर्य एक वर्ष ते सेकंदाचा शतांश, इथपर्यंत आपले कालमापन पोहोचले होते. ते मुख्यत: पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्या गतीवर म्हणजे भौगोलिक ज्ञानावर आधारित होते. पण त्याऐवजी त्याचे उपयोजन, मुहूर्त व क्रियाकर्मांना महत्त्व मिळून फक्त त्यांनाच ज्ञान मानले जाऊ लागले. मूळ भूगोल, त्याचे संशोधन व संशोधक हे विस्मृतीत गेले. विशुद्ध ज्ञानाचा, अभ्यासाचा वारसा विसरून केवळ शुभाशुभ कर्मकांड, भविष्यकथन व पारमार्थिक हानी-लाभाला आपण कवटाळून बसलो.

हे कुणाचे दुर्दैव? त्या प्राचीन अभ्यास परंपरेचे? त्या थोर संशोधकांचे? की आपले?

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.

Story img Loader