काही कलाकार या जगातून जातात, तेव्हा स्मृतिशलाकांचा एक ‘नॉस्टॅल्जिया’ होतो. मुकुंद फणसळकर यांचं जाणं असं काही तरी आहे. ते गेले, त्या वेळी त्यांचं वय साठीपलीकडचं असलं, तरी मुकुंद असा एकेरी उल्लेख हा त्यांचा रसिकप्रियतेचा दाखला म्हणून अधिक औचित्यपूर्ण ठरतो. १९८६ मध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात हा मुकुंदस्वर ऐकू आला आणि त्यानं पुढची दोन दशकं गानरसिकांवर अक्षरश: मोहिनी घातली. जुन्या गाण्यांच्या रंगमंचीय मैफली सादर होण्याच्या आणि त्या हाऊसफुल प्रतिसादात ऐकल्या जाण्याच्या काळात मुकुंद गात होता आणि त्यामुळे तो आणि त्याचं गाणं रसिकांच्या ‘सजीव’ लक्षात आहे. तो रूपानं देखणा होताच, पण त्याच्या गाण्याचं व्यक्तिमत्त्वही लोभस होतं. ‘स्मरणयात्रा’ या मराठी भावसंगीताच्या प्रवासाची गोष्ट सांगणाऱ्या कार्यक्रमातलं त्याचं गाणं ही केवळ जुन्याची आरती नव्हती. त्यानं स्मरणाला समृद्ध केलं. जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या त्याच्या कार्यक्रमाचं नाव ‘नॉस्टॅल्जिया’ असणं, हे म्हणूनच सार्थ. हा कार्यक्रम जवळपास नेहमीच हाउसफुल होत असे. गाणं अर्थासह उलगडून दाखवणं आणि चालीतील बारकावे सांगत गाऊन दाखवणं यातून त्यानं रसिकांची उमज घडवली. गाणं हृदयाला का भिडतं, याचं सुगम्य उत्तर मुकुंदच्या ‘नॉस्टॅल्जिया’नं दिलं, म्हणून तो वेगळा ठरला.
त्यानं केलेल्या कार्यक्रमांची, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतील स्पर्धक ते सूत्रसंचालक या भूमिकांची यादी, उजळणी करता येईलच, पण त्याहीपेक्षा त्याच्यातील मर्मज्ञ कलाकाराची विलक्षण संगत रसिकप्रिय असूनही पोरकी राहिली, याचं दु:ख अधिक. मनस्वी कलाकार अनेकदा व्यवहारात उणा आणि गोतावळ्यात फटकळ असू शकतो, तसा तोही होता. पण, त्यामुळे प्रगल्भतेची चमक कमी होत नाही. पं. हृदयनाथ मंगेशकराचं मार्गदर्शन, सहवास लाभलेला मुकुंद गाण्याबद्दल कायम हळवा आणि ‘अभ्यासोनि प्रकटावे’, अशाच वृत्तीचा राहिला. गळ्यातील सुरांबरोबरच बोटातील रेषांनाही वश करण्याची कला त्याला अवगत.
हेही वाचा : व्यक्तिवेध : प्रतिभा राय
दुसऱ्याचं गाणं सुरू असताना, रेषांतून ते गाणं आविष्कृत करणारा चित्रकार मुकुंदही त्याच्या सहगायकांनी एके काळी प्रत्यही अनुभवला. अखेरच्या काळातील व्याधीग्रस्तता आणि काही प्रमाणात विपन्नावस्थेनं त्याच्यातील कलाकाराचं तेज मात्र झाकोळू दिलं नाही. सुहृदांची मदत आणि प्रेम मिळत राहिलं. पण, त्यामुळे कलाकारानं आपल्या आयुष्याचं सर्वार्थानं नियोजन करण्याची निकड कमी होत नाही, हेही खरंच. एकटेपणा ही निवड असते आणि एकाकीपण हे भागधेय, याची समज आपल्या समाजात तेव्हाही रुजली नव्हती, आताही नाहीच. मुकुंदच्या जाण्यानं ते पुन्हा सिद्ध होतंय, इतकंच.