हिवाळा सुरू होण्याच्या आसपास दिल्लीच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेची ‘नेमेचि’ होणारी चर्चा आता मुंबईसंदर्भातही सुरू झाल्यामुळे ‘दिल्ली अब दूर नही’चा प्रत्यय मुंबईकरांना येतो आहे. हवेच्या प्रदूषणाबाबत मुंबईकर जात्यात असतील तर बाकीची शहरे, निमशहरे सुपात आहेत, त्यामुळे ‘मुंबईचे काय चाललेय ते चालू द्या, आपल्याला काय त्याचे’ असे म्हणत अंग झटकायची मुभा त्यांना राहिलेली नाही, हे वास्तव अधिक गंभीर आहे. या चर्चेला निमित्त ठरले आहे ते हवेचे प्रदूषण वाढून हवेचा दर्जा खालावल्यामुळे मुंबईत भायखळा तसेच बोरिवली परिसरात सुरू असलेली बांधकामे बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाचे. मुंबईतील काही परिसरातील हवेचा निर्देशांक २०० च्या आसपास पोहोचल्यामुळे पालिकेला हे पाऊल उचलावे लागले आहे. खरे तर सकाळी पसरणारे गुदमरून टाकणारे धुरके (धूर अधिक धुके) आणि श्वसनाच्या आजारांनी बेजार झालेल्यांच्या डॉक्टरांकडे लागणाऱ्या रांगा पाहता मुंबईतील हवा पार बिघडली आहे हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची गरजच भासू नये. पण मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, त्यातून उडणारे तसेच वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारे धूलिकण हिवाळ्यातील थंड हवेत उशिरापर्यंत हवेत तरंगत राहतात आणि त्याचा मुंबईच्या हवेच्या दर्जावर परिणाम होतो हे तज्ज्ञांनीही स्पष्ट केले आहे. प्रति घनमीटर क्षेत्रात किती धूलिकण आहेत, यावरून त्यांचे प्रमाण मोजले जाते. ‘पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) २.५’ हे २.५ मायक्रॉन जाडीचे वा त्यापेक्षाही सूक्ष्म धूलिकण जास्त धोकादायक समजले जातात. हवेमध्ये पीएम २.५ चे प्रमाण जास्त असते, तेव्हा धुरक्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेच सध्या सकाळी मुंबई महानगर परिसरावर असलेले धुरके वाढत्या प्रदूषणाचे द्याोतक आहे. त्याबरोबरच चांगल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ० ते ५० असतो, ५१ ते १०० एवढा निर्देशांक असतो तेव्हा ती हवा ठीकठाक मानली जाते. १०१ ते १५० एवढा गुणवत्ता निर्देशांक असलेली हवा श्वसनाच्या विकारांच्या बाबतीत नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीसाठी आजारांना कारणीभूत ठरते. हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५१ ते २०० असल्यास निरोगी व्यक्तीलाही श्वसनाचे आजार होऊ शकतात. २०१ ते ३०० एवढ्या निर्देशांकाची प्रदूषित हवा सगळ्यांसाठीच घातक असते तर ३०१ ते ५०० पर्यंत निर्देशांक जाणे हे सगळ्याच निकषांपलीकडे जाऊन बसते. गेली साताठ वर्षे हिवाळ्याच्या काळात दिल्लीची हवा ३०० ते ९०० या निर्देशांकादरम्यान असते. त्यामुळे तिथे अनेकदा शिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करावी लागते. श्वसनविकाराने त्रस्त झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणे हे तर तिथे नेहमीचेच.

हेही वाचा : पहिली बाजू : नेतृत्वमर्यादांमुळे ‘आघाडी’ विघटनाकडे…

bjp limitation of work leadership loksatta news
कर्तृत्वमर्यादांमुळे भाजपचे पतन निश्चित!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Indian Maldives loksatta editorial
अग्रलेख : शेजारसौख्याची शालीनता
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
technology loksatta article
तंत्रकारण : तंत्रज्ञाना… तुझा रंग कसा?
Maharashtra assembly election 2024
उलटा चष्मा : सेम टू सेम
credibility of election commission on india
संविधानभान: निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची कसोटी
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत

आता मुंबई महापालिकेनेही ज्या विभागात हवेचा निर्देशांक २०० च्या वर जाईल तेथील बांधकामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बोरिवली आणि भायखळा परिसरातील बांधकामे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तशी नोटीस देऊनही काम थांबवले नसेल, तर त्या प्रकल्पांची गंभीर दखल घेतली जाणार आह, असे सरकारचे म्हणणे आहे. हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत रस्त्यांसाठीची खोदकामेही यापुढच्या काळात स्थगित जाणार आहेत, असे पालिका सांगते. शिवाय बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या आरएमसी म्हणजे रेडी मिक्स काँक्रीटच्या नव्या प्रकल्पांना यापुढच्या काळात मुंबईत परवानगी दिली जाणार नाही. पण याचाच दुसरा अर्थ हे प्रकल्प मुंबईबाहेर कुठे तरी प्रदूषण करत राहतील अशी शक्यता आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी अर्थ’चा अहवालही मोठ्या शहरांच्या पलीकडचे वास्तव सांगतो. त्यानुसार दिल्ली, मुंबई, लखनौ, चेन्नई, कोलकाता अशा मोठ्या शहरांना प्रदूषणाचा विळखा पडलेला आहेच, पण त्याचबरोबर भारतातील एकूण ७८७ जिल्ह्यांपैकी ६५५ जिल्ह्यांमधल्या प्रदूषित हवेमधल्या सूक्ष्मकणांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जागांचे वाढते मोल, त्यामुळे सतत वाढती बांधकामे, सार्वजनिक वाहतुकीच्या बोजवाऱ्यामुळे प्रचंड वाहनसंख्या, त्यातून होणारे प्रदूषण, ‘इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण करत नाहीत’ हा गैरसमज, बेफाम वृक्षतोड या सगळ्यामुळे राज्यातील शहरे, तसेच चंद्रपूरसारखी निमशहरे वेगाने या पातळीकडे वाटचाल करत आहेत. अशा प्रदूषणामुळे नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, मोनोक्सॉइड, कार्बन डायऑक्साइड यासारखे घातक घटक शरीरात जाऊन श्वसनसंस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे आज दिल्लीकर, मुंबईकर ज्या गोष्टींना तोंड देत आहेत, तेच उद्या सातारा, सांगली, रत्नागिरी, चंद्रपूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेडवासीयांच्या वाट्याला येऊ शकते. पाण्याची फवारणी वगैरे मार्गांनी ‘जात्यात’ असलेल्या मुंबईत आज या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असला तरी ‘सुपा’त असलेल्यांनी वेळेवर जागे होण्याची गरज आहे.

Story img Loader