हिवाळा सुरू होण्याच्या आसपास दिल्लीच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेची ‘नेमेचि’ होणारी चर्चा आता मुंबईसंदर्भातही सुरू झाल्यामुळे ‘दिल्ली अब दूर नही’चा प्रत्यय मुंबईकरांना येतो आहे. हवेच्या प्रदूषणाबाबत मुंबईकर जात्यात असतील तर बाकीची शहरे, निमशहरे सुपात आहेत, त्यामुळे ‘मुंबईचे काय चाललेय ते चालू द्या, आपल्याला काय त्याचे’ असे म्हणत अंग झटकायची मुभा त्यांना राहिलेली नाही, हे वास्तव अधिक गंभीर आहे. या चर्चेला निमित्त ठरले आहे ते हवेचे प्रदूषण वाढून हवेचा दर्जा खालावल्यामुळे मुंबईत भायखळा तसेच बोरिवली परिसरात सुरू असलेली बांधकामे बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाचे. मुंबईतील काही परिसरातील हवेचा निर्देशांक २०० च्या आसपास पोहोचल्यामुळे पालिकेला हे पाऊल उचलावे लागले आहे. खरे तर सकाळी पसरणारे गुदमरून टाकणारे धुरके (धूर अधिक धुके) आणि श्वसनाच्या आजारांनी बेजार झालेल्यांच्या डॉक्टरांकडे लागणाऱ्या रांगा पाहता मुंबईतील हवा पार बिघडली आहे हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची गरजच भासू नये. पण मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, त्यातून उडणारे तसेच वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारे धूलिकण हिवाळ्यातील थंड हवेत उशिरापर्यंत हवेत तरंगत राहतात आणि त्याचा मुंबईच्या हवेच्या दर्जावर परिणाम होतो हे तज्ज्ञांनीही स्पष्ट केले आहे. प्रति घनमीटर क्षेत्रात किती धूलिकण आहेत, यावरून त्यांचे प्रमाण मोजले जाते. ‘पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) २.५’ हे २.५ मायक्रॉन जाडीचे वा त्यापेक्षाही सूक्ष्म धूलिकण जास्त धोकादायक समजले जातात. हवेमध्ये पीएम २.५ चे प्रमाण जास्त असते, तेव्हा धुरक्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेच सध्या सकाळी मुंबई महानगर परिसरावर असलेले धुरके वाढत्या प्रदूषणाचे द्याोतक आहे. त्याबरोबरच चांगल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ० ते ५० असतो, ५१ ते १०० एवढा निर्देशांक असतो तेव्हा ती हवा ठीकठाक मानली जाते. १०१ ते १५० एवढा गुणवत्ता निर्देशांक असलेली हवा श्वसनाच्या विकारांच्या बाबतीत नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीसाठी आजारांना कारणीभूत ठरते. हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५१ ते २०० असल्यास निरोगी व्यक्तीलाही श्वसनाचे आजार होऊ शकतात. २०१ ते ३०० एवढ्या निर्देशांकाची प्रदूषित हवा सगळ्यांसाठीच घातक असते तर ३०१ ते ५०० पर्यंत निर्देशांक जाणे हे सगळ्याच निकषांपलीकडे जाऊन बसते. गेली साताठ वर्षे हिवाळ्याच्या काळात दिल्लीची हवा ३०० ते ९०० या निर्देशांकादरम्यान असते. त्यामुळे तिथे अनेकदा शिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करावी लागते. श्वसनविकाराने त्रस्त झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागणे हे तर तिथे नेहमीचेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा