एखादा कवी-लेखक जातो तेव्हा एखादी व्यक्ती जात नाही, तर विशिष्ट कालावधीच्या संवेदनांचा एक तुकडाच हरपलेला असतो. निक्की जियोव्हानी या कृष्णवर्णीय आफ्रो- अमेरिकी कवयित्रीच्या निधनानंतर तेथील वाचकांच्या मनातही हीच भावना असू शकते. कारण निक्की जियोव्हानी ऊर्फ योलांडा कॉर्नेलिया निक्की जियोव्हानी ज्युनियर ही ७ जून १९४३ रोजी नॉक्सविले, टेनेसी येथे जन्मलेली व्यक्ती होतीच काळावर छाप उमटवणारी. निक्की फक्त कवयित्रीच नव्हत्या, तर अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या प्राध्यापक होत्या. लिंगभेद तसेच वंशभेदाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या कविता एवढ्या कालातीत आहेत की आजही त्या तेथील अभ्यासक्रमात आवर्जून लावल्या जातात.
जियोव्हानी यांचा मूळ स्वभावच बंडखोर होता. महाविद्यालयात असताना तेथील नियमांविरोधात बंड केले म्हणून त्यांना काढून टाकण्यात आले होते. पुढे तेथील व्यवस्थापन बदलल्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश मिळाला. त्यांनी फिस्क विद्यापीठात इतिहास या विषयात पदवी घेतली आणि विविध शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन केले. पण त्यापेक्षाही त्यांची खरी ओळख ठरली ती १९६०च्या दशकापासून सुरू झालेला त्यांचा ब्लॅक आर्ट्स चळवळीतील सहभाग. तो इतका वैशिष्ट्यपूर्ण होता की त्यांना ‘पोएट ऑफ ब्लॅक रिव्होल्यूशन’ असे म्हटले जात असे. ‘ब्लॅक फीलिंग’, ‘ब्लॅक टॉक’/‘ब्लॅक जजमेंट’ (१९६८), न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर ‘बायसिकल: लव्ह पोएम्स’ (२००९) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. आफ्रिकी-अमेरिकी लेखिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्यांनी NikTom Ltd. ची स्थापना केली होती. ‘नाइट कम्स सॉफ्टली’ हा कृष्णवर्णीय कवयित्रींचा काव्यसंग्रहही त्यांनी संपादित केला होता. त्या त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली आफ्रिकी-अमेरिकी कवयित्री ठरल्या. २००७ मध्ये, व्हर्जिनिया टेक येथील शिक्षण संस्थेत एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात ३० जणांच्या मृत्यूनंतर, त्यांनी श्रद्धांजली वाहताना सादर केलेली कविता सर्व संबंधितांचे मन हेलावणारी ठरली होती. ईशान्य अमेरिकेच्या अॅपलाचियन डोंगररांगांमधल्या आफ्रिकी-अमेरिकी समुदायांबद्दलच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्यांनी केले.
हेही वाचा : व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
जियोव्हानी यांना ‘गोइंग टू मार्स: द निक्की जियोव्हानी प्रोजेक्ट’ या डॉक्युमेंटरीसाठी २०२४ चा एमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘द निक्की जियोव्हानी पोएट्री कलेक्शन’साठी त्यांना ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. पहिला कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी लोकांकडून पैसे उधार घ्यावे लागले होते असे त्या सांगत. आता ‘द लास्ट बुक’ हा त्यांचा नवा आणि शेवटचा म्हणता येईल असा काव्यसंग्रह २०२५ मध्ये प्रकाशित होणार आहे. गेल्या ६० वर्षांतील महत्त्वाची कवयित्री ही नोंद मागे ठेवून त्यांनी जगाचा निरोप घेतला एवढ्या एका ओळीतच त्यांचे मोठेपण सामावले आहे.