ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना यंदाच्या मुंबई ‘लिट लाइव्ह’या साहित्य सोहळ्यात कारकीर्द गौरव पुरस्कार मिळाला. यापूर्वीच ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा उचित गौरव करण्यात आला आहे. स्त्रियांवरील अत्याचार, सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, धार्मिक भेदभाव याविरुद्ध ठाम भूमिका घेणाऱ्या साहित्यिकांमध्ये राय यांची गणना होते. ओदिशाची प्राचीन संस्कृती आणि आधुनिक जग यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखनातून दिसतो. राय यांनी १९७४मध्ये लिहिलेल्या बर्षा बसंत बैसाख या पहिल्याच कादंबरीने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. महाभारतातील अनेक पात्रे लेखकांच्या कौशल्याला आवाहन करत असतात. राय यांनी १९८४साली द्रौपदीवर बेतलेल्या याज्ञसेनी या महाकाव्याने देशभरच्या साहित्यविश्वात स्वत:चे स्थान निर्माण केले. याज्ञसेनीमध्ये द्रौपदीचा जीवनप्रवास आणि आधुनिक काळातील भारतीय स्त्रीची चौकट यांची सांगड घालत, स्त्रीची वैयक्तिक ओळख काय या सनातन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आपली भूमिका निडरपणे मांडणाऱ्यांना धमक्या मिळणे हे भारतात नवे नाही. तीनएक दशकांपूर्वी राजस्थानातील रूपकुँवर सती प्रकरणामुळे देश हादरून गेला असतानाच, त्याचे हिरिरीने समर्थन करणारे काही घटकही होते. पुरीच्या तत्कालीन शंकराचार्यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या राय यांनी ‘सतीची व्याख्या काय?’ हा लेख लिहिला. त्या लेखाचे जसे स्वागत झाले तसाच त्याला विरोधही झाला. विशेषत: हा लेख जणू काही शंकराचार्यांना दिले गेलेले आव्हान आहे अशी समजूत करून घेऊन त्यांना धमक्या देण्यात आल्या. त्याला त्या बधल्या नाहीत हा जसा त्यांचा खंबीरपणा होता तसाच स्वत:च्या मूल्यांवरील ठाम विश्वासही होता. त्यांनी धार्मिक कुप्रथांना विरोध केला तसाच समाजातील, विशेषत: उच्चस्तरीय भ्रष्टाचाराविरोधात आवाजही उठवला.
हेही वाचा:बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
राय यांची ही सामाजिक बाजू जितकी भक्कम राहिली आहे तितकेच त्यांचे लेखनमूल्यही बावनकशी असल्याची वाखाणणी झाली आहे. कदाचित ही गुणवैशिष्ट्ये परस्परसंबंधित असावीत. याज्ञसेनी, शिलापद्मा, अरण्य, अपरिचिता, देहातीत, आदिभूमी, महामोह, पुण्यतोया इत्यादी कादंबऱ्या, अनाबना, अब्यक्त, भगबानर देश अशा कथा, प्रवासवर्णने, समाज व संस्कृतीविषयक लेखन आणि वयाच्या पंचाहत्तरीत क्रमश: प्रसिद्ध झालेले ‘अमृत-अन्वेष’ हे आत्मचरित्र, असे विपुल लेखन त्यांनी केले. देशा-परदेशातील वाङ्मयीन चर्चासत्रे, परिषदा, वाङ्मयीन संमेलने यांना हजेरी आणि देशाचे प्रतिनिधित्व या बाबीही अनुषंगाने येत गेल्या. ओदिशातील मंदिर शिल्पकलेवरही त्यांनी भरपूर लिहिले आणि ते वाचकांच्या पसंतीलाही उतरले.
हेही वाचा:दखल : मानवी भविष्यासाठी…
जवळपास ३० वर्षे अध्यापन केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पण लेखनकार्य सुरूच ठेवले. ‘ज्ञानपीठ’नंतर मुंबइतही त्यांना मानसन्मान मिळणे ही या नगरीच्या बहुसांस्कृतिकतेची खूण आहे!