२४ जानेवारी १९५०. सकाळचे ११ वाजलेले. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहाकडे संविधानसभेचे सदस्य निघाले होते. इतक्यात पाऊस सुरू झाला. हा शुभशकुन असल्याची चर्चा सुरू झाली कारण संविधानाच्या हस्तलिखित प्रतीवर स्वाक्षरी करण्याचा हा दिवस होता. सारे सदस्य सभागृहात पोहोचले. राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती पदावर एकमताने निवड झाली. संविधानाच्या तीन प्रती समोर ठेवल्या होत्या. शांतिनिकेतनचे कलाकार, नंदलाल बोस यांच्या चित्रांनी सजलेल्या, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या सुलेखनाने सुशोभित अशा संविधानाच्या प्रतीवर पहिली स्वाक्षरी केली पं. जवाहरलाल नेहरूंनी. त्यांच्या पाठोपाठ २८४ सदस्यांनी संविधानाच्या प्रतींवर स्वाक्षरी केली. कुणी देवनागरीत, कुणी उर्दूत, कुणी पंजाबीमध्ये. तब्बल ३ वर्षांच्या खटाटोपावर विलक्षण सुंदर मोहोर उमटली. ‘जन गण मन’ निनादले. ‘वंदे मातरम’ मधील सुजलाम भारताची नांदी दिली गेली. अवघ्या दोनच दिवसांनी भारताने २६ जानेवारी रोजी ‘प्रजासत्ताक दिवस’ साजरा केला. युनियन जॅक केव्हाच उतरवला होता. लहरणाऱ्या तिरंग्याला आता अधिक अर्थ प्राप्त झाला होता. रावी नदीच्या काठावर पं. नेहरूंनी लाहोरच्या अधिवेशनात (१९२९) ‘पूर्ण स्वराज्या’ची मागणी करताना तिरंगा फडकावला तेव्हाच २६ जानेवारी हा स्वातंत्र्य दिन असल्याची घोषणा केली होती. त्यामुळेच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला होता. स्वातंत्र्यपूर्व भारतातला ‘स्वातंत्र्य दिवस’ हा स्वातंत्र्योत्तर भारताचा ‘प्रजासत्ताक दिवस’ झाला.
संविधानाच्या हस्तलिखिताच्या प्रती शाबूत राहाव्यात, त्या खराब होऊ नयेत यासाठी १९८०च्या दशकात भारत सरकारने प्रयत्न सुरू केले. इंग्रजी हस्तलिखित सुमारे २२१ पानांचे आणि १३ किलो वजनाचे होते. त्याची बांधणी होती मोरोक्को लेदरची आणि वर्ख होता सोनेरी. देशाचा हा अमूल्य वारसा जपण्यासाठी राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेने अमेरिकेतील गेट्टी कॉन्झर्वेशन इन्स्टिट्यूटशी संपर्क केला. त्यांच्या मदतीने २० डिग्री तापमान राखणाऱ्या, ३० टक्के आर्द्रता असलेल्या दोन काचेच्या पेट्या तयार केल्या. बाहेरच्या वातावरणातील प्रदूषित हवेची बाधा संविधानाच्या प्रतींना होणार नाही, याची दक्षता राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेने घेतली आणि आजही या प्रती जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत.
हेही वाचा : लालकिल्ला : भाजपने गमावलेल्या संधीचे ‘स्मारक’!
संविधानाच्या हस्तलिखित प्रतींच्या जतनाची जबाबदारी राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा घेते आहे; पण संविधानाचा आत्मा वाचवण्याचे काय? त्यासाठी हा दस्तावेज समजून घ्यावा लागेल. निर्भीड न्यायाधीश एच. आर. खन्ना म्हणाले होते की, संविधान हा केवळ कागदाचा गठ्ठा नाही. हा भविष्याचा, जगण्याचा रस्ता आहे. यासाठीच संविधानकर्त्यांनी स्वाक्षरी केली होती. एक प्रकारे तेव्हाच्या भारताच्या वतीने संविधानकर्त्यांनी घेतलेले ते शपथपत्र होते. केवळ तत्कालीन भारतच नव्हे तर भावी पिढ्यांच्या वतीने शपथपत्र घेतले होते. हे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरूंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ म्हणणाऱ्या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतीशून्य समाजासाठी. साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणाऱ्या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या ‘उलगुलान’साठी. मौलाना आझादांच्या ‘गंगा जमनी तहजीब’ सांगत शिक्षणाची कास धरणाऱ्या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणाऱ्या गुरु नानकांसाठी. बाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या कबीरासाठी. संत रवीदासांच्या बेगमपुऱ्यासाठी. तुकोबाची गाथा तारणाऱ्या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणाऱ्या ज्ञानोबासाठी. थोडक्यात, संविधानकर्त्यांनी घेतलेली ही शपथ जात, धर्म, प्रांत, लिंग, वंश या साऱ्या भिंती ओलांडत साकल्याचा स्वप्नलोक दाखवण्यासाठीची होती. आपल्या सर्वांच्या वतीने घेतलेल्या या शपथपत्राची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न. अर्थात, अ जेंटल रिमाइंडर.
poetshriranjan@gmail.com