दोन घडामोडी गेल्या आठवड्यातल्या. त्यांच्या बातम्याही अनेकांनी दिल्या. पण महाराष्ट्रानं कदाचित नसतील पाहिल्या. ‘फक्त राजकारण’ हाच प्राधान्यक्रम असेल तर कलाकारण कसं सांदीकोपऱ्यात फेकलं जातं याचा नमुनाच हा. पहिली चेन्नई इथल्या ‘मद्रास उच्च न्यायालया’तून आलेली बातमी. दुसरी न्यू यॉर्कहून. ही दोन्ही शहरं समुद्रालगत, पूर्व किनाऱ्यावर आहेत याखेरीज दोन्ही बातम्यांमध्ये काहीही साम्य नाही. संबंध मात्र आहे… जाणला तर!

चेन्नईची बातमी टी. एम. कृष्णा यांना जाहीर झालेल्या ‘संगीत कलानिधी’ पुरस्कारावर तथाकथित संस्कृती रक्षकांनी केलेल्या कोर्टबाजीचीच खरी, पण त्यात आणखी एक उपकथानक होतं. मुळात हे संस्कृतीरक्षण कृष्णा यांना संगीत कलानिधी पुरस्कार मिळूच नये म्हणून न्यायालयाकडे दाद मागत होते. ती मागणी संपूर्णपणे फेटाळून लावतानाच उच्च न्यायालयानं उपकथानकाचाही समाचार घेतला. हे उप-प्रकरण, कर्नाटक संगीताच्या दिवंगत सम्राज्ञी एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे नातू म्हणवणाऱ्या कुणी न्यायालयात नेलं होतं. ‘द हिंदू’ या प्रख्यात दाक्षिणात्य इंग्रजी दैनिकानं ‘संगीत कलानिधी’या अतिप्रतिष्ठित किताबाला जोडूनच, त्याच विजेत्याला एक लाख रुपयांचा ‘एम. एस. सुब्बलक्ष्मी पुरस्कार’ देण्याचं ठरवलं होतं, त्यावर या नातवाचा आक्षेप. आक्षेपाचे मुद्दे बरेच. सुब्बलक्ष्मी यांच्याबद्दल कृष्णा यांना आदर नाही, असाही एक मुद्दा- तो न्यायालयानं पार कोलून टाकला. पण एक मुद्दा मात्र न्यायालयानंही तात्पुरता मान्य केलाय. ‘सुब्बलक्ष्मी यांनीच, ३० ऑक्टोबर १९९७ रोजी केलेल्या मृत्युपत्रात, ‘माझ्या नावाने कोणतीही संस्था, न्यास उभारू नये, माझ्या नावाने कधीही निधी जमवू नये’ असं म्हटलं होतं. पैसा जमवू नये मग खर्चूही नये… रोकड स्वरूपातल्या पुरस्काराला कशाला हवं सुब्बलक्ष्मींचं नाव, असं नातवाचं म्हणणं. ते तूर्तास मान्य झालंय. ‘द हिंदू’नं रोख पुरस्कार खुशाल द्यावा, पण पुरस्काराला नाव सुब्बलक्ष्मींचं नसावं, असा हंगामी आदेश दिलाय न्यायालयानं. ते मृत्युपत्र जर खरं असेल तर, सुब्बलक्ष्मींचं कौतुकच… कलाक्षेत्रातला मोठं नाव- मोठा पैसा हा खेळ थांबवण्याच्या त्यांच्या इच्छेचं…

हेही वाचा : बुकबातमी : टंगळ्या-मंगळ्यांचा महोत्सव, तरी…

न्यू यॉर्कची बातमी भलतीच निराळी. एक केळं – जे ‘कलाकृती’ होतं- जे ‘सदबीज’ या प्रख्यात लिलावसंस्थेनं गेल्या बुधवारी पुकारलेल्या ‘आताच्या आणि समकालीन कलाकृतीं’च्या लिलावात ६५ लाख २० हजार अमेरिकी डॉलरना विकलं गेलं! एवढ्या डॉलरांचे होतात ५५ कोटी सहा लाख ५५ हजार रुपये. ते ‘कलाकृती’ केळं काहीजणांना आठवतही असेल… ही मॉरिझिओ कॅटलान या इटालियन चित्रकारानं ‘संकल्पनात्मक कला’ (कन्सेप्च्युअल आर्ट) या प्रकारात केलेली कलाकृती आहे, म्हणून २०१९ मध्ये असंच एक केळं- हार्डवेअरच्या दुकानांत मिळणाऱ्या ‘डक्ट टेप’नं भिंतीला चिकटवलेलं- एका कलाव्यापार मेळ्यात प्रदर्शित झालं होतं. ‘पेरॉटिन गॅलरी’ हे त्रिखंडात (आशिया (शांघाय), युरोप (पॅरिस ), अमेरिका (न्यू यॉर्क) ) धंदा करणारी गॅलरी! तिनं ही कलाकृती त्या कलाव्यापार-मेळ्यात मांडली होती. त्यानिमित्तानं, ‘कॅटलानसारखा प्रख्यात दृश्यकलाकार- जो हल्ली फक्त विख्यात म्युझियम्समध्येच प्रदर्शनं भरवतो- त्याची कलाकृती १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच कलाव्यापार मेळ्यात दिसणार’ अशी प्रसिद्धीही करण्यात आलेली होती. ‘आर्ट बासल- मायामी बीच’ हा तो कलाव्यापार मेळा. तो भरतो अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातल्या मायामी शहरात, पण त्याच्या नावातलं ‘बासल’ हे शहर मात्र स्वित्झर्लंडमधलं… कारण काय, तर या स्विस शहरातला कलाव्यापार मेळा हा अति-अति पैसेवाल्यांचा आणि अतिप्रतिष्ठित- त्यांचाच ‘ब्रॅण्ड’ इकडे अमेरिकेत येऊन तस्साच कलाव्यापार मेळा भरवतो. एकंदर ते कलादालन काय, तो मेळा काय, सगळेच ब्रॅण्डखोर.

अशा या ब्रॅण्डखोरीच्या वातावरणात कॅटलाननं भिंतीला टेपवलेलं ते केळं अवतरलं… मग त्यानं- प्रसिद्धीलोलुपांचीच शब्दकळा वापरायची तर- ‘धूम मचवली!!!’ … २०१९ मध्येच समाजमाध्यमांवर त्या केळ्याच्या ‘मीम्स’ काय दिसू लागल्या, जरा गांभीर्यानं विचार करणाऱ्यांच्यात चर्चा काय होऊ लागल्या… अगदी भारतातसुद्धा कुणा चटपटीत तरुण शिल्पकारानं स्टेनलेस स्टीलमधून मेहनतपूर्वक घडवलेलं माकडाचं शिल्प आणि त्याच्या बाजूला ‘तस्संच्या तस्संच’ केळं, अशी मांडणी दिल्लीच्या ‘इंडिया आर्ट फेअर’मध्ये करायचं ठरवलं आणि त्या शिल्पकाराचं काम प्रदर्शित करणाऱ्या मुंबईस्थित कलादालनानं तसं केलंसुद्धा. हे त्या कलादालनानं केलं, म्हणून मूळच्या मायामीतल्या केळ्यासारखं केळं दिल्लीतल्या कलाव्यापार मेळ्यात दिसलं. बरं मध्यंतरीच्या काळात मूळचं केळं पहिल्याप्रथम मांडणाऱ्या ‘पेरॉटिन गॅलरी’वर टीका होऊ लागली… कसकसला धंदा करतात हे लोक, अशा सुरातली. मग ‘पेरॉटिन गॅलरी’नं त्या केळ्याच्या कलाकृतीचं चित्र छापलेले टी-शर्ट विकायला काढले… आणि जाहीर केलं की, ‘‘या टीशर्टांच्या विक्रीतनं उभारला जाणारा पैसा आम्ही अविकसित देशांत भुकेलेल्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देणार आहोत!’’- तेवढंच प्रायश्चित्त वगैरे.

हेही वाचा : अन्वयार्थ : मूल्यमापनाची ‘परीक्षा’

या सगळ्याला मुळात कलावंत जबाबदार आहे का? कॅटलानच्या या कलाकृतीचं नाव ‘कॉमेडियन ’ असं आहे. हसऱ्या जिवणीचा आकार केळ्यातून दिसत असेल, तर ती चिकटपट्टी ही जणू स्मितहास्यावरची ‘बंदी’ची खूण ठरते, असंही चित्रवाचन करता येईल. पण कॅटलानच्या मते चित्रकार/ दृश्यकलावंत हेच जणू धनिकवणिक चित्रखरेदीदारांच्या बाजारी दरबारातले विदूषक- कॉमेडियन असावेत… कलेबद्दलचा तितपत उपरोध कॅटलाननं त्याच्या आधीच्या कलाकृतींमधून दाखवलेला आहे. असो. त्यानं त्याची दृश्यकल्पना मांडली, एकप्रकारे जगाला खिजवून दाखवलं. हे असं खिजवणं १०० वर्षांपूर्वी मार्सेल द्याुशाँ यांनीही ‘द फाउंटन’ या १९१७ सालच्या कलाकृतीतनं उत्तमपैकी साधलं होतं. ते ‘फाउंटन’ म्हणजे पुरुषांच्या मुतारीचं भांडंच उलटं ठेवलेलं होतं, हे कलेतिहासात रस असलेल्यांना माहीतच असतं. पण त्या फाउंटनवरची सहीसुद्धा ‘आर. मट’ अशी होती… म्हणजे कलाकृतीविषयीच्या कल्पनांइतकाच, कलाकाराच्या नामवंतपणाबद्दलच्या कल्पनांनाही द्याुशाँनं फाटा दिला होता. अर्थात, तरीही हे फाउंटन द्याुशाँचं म्हणूनच ओळखलं जातंय, त्याला इतिहासात अजरामर स्थान मिळतंय, इतकंच काय, १९९१ साली शेरिल लेव्हाइन या संकल्पनात्मक कलाकृतीच करणाऱ्या महिला दृश्यकलावतीनं हे द्याुशाँचं ‘फाउंटन’ चकचकीत ब्राँझमध्ये केलं- कलेची खिल्ली उडवण्याच्या प्रयत्नाचाच फज्जा ‘कलेचा इतिहास’ उडवतो आणि टवाळी, मस्करी म्हणून केलेली कलाकृतीसुद्धा ‘अजरामर’ ठरते, ही टीका तरी लेव्हाइन यांच्या प्रति-कलाकृतीतून सरळच होत होती.

यावर कुणी अँडी वॉरहॉलच्या ‘ब्रिलो बॉक्सेस’ची आठवण काढेल. हे धुलाई-साबणाचे खोके… ते जसेच्या तसेच स्क्रीन प्रिंटिंग करून वॉरहॉलनं मांडले… पण वॉरहॉलचा यामागचा हेतू ‘कलेच्या मूलभूत संकल्पनांना आव्हान देण्याचाच होता की ‘रोजचं जगणं आणि कला यांतलं अंतर मिटवण्या’चा, ही शंका आपण (अन्य अनेक इतिहासकारांप्रमाणेच) घेऊ शकतो. तरी आणखी एका ‘कलाकृती’ची आठवण काढायलाच हवी… पिएरो मॅन्झोनी हा तो कलाकार आणि त्याची १९६१ सालची कलाकृती काय? तिचं नावच ‘आर्टिस्ट्स शिट’ – होय, मॅन्झोनीची ३० ग्रॅम ‘शी’… ती अर्थातच पूर्णत: डबाबंद! बरं, ही कलाकृती मॅन्झोनीनं बुटांच्या दुकानांमध्ये विकली म्हणे. ही बंडखोरी म्हणजे कला, असं म्हटलं तर आपल्याकडचे अनेकजण खरोखर वैतागतील, नाही का? ‘बंडखोरी म्हणजेच कला’ असं समीकरण रूढ झाल्याबद्दल, दिवंगत बोधचित्रकार आणि लेखक रवि परांजपे यांनी पुस्तकांतून केवढा संताप व्यक्त केलेला आहे, हे अनेकांना आठवतही असेल.

हेही वाचा : लोकमानस : दिल्लीवरील भाराच्या विकेंद्रीकरणाची गरज

पण अशा साऱ्यांना एक सांगायलाच हवं की, ‘बंडखोरी म्हणजेच कला’ हे खरं नाही , हे अगदी मान्यच- परंतु ‘कला म्हणजे कलेची संकल्पना’ हे मात्र गेल्या सुमारे १०५ वर्षांत कलावंतमान्य आणि अभ्यासकमान्य झालेलं समीकरण आहे. ते झिडकारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला ‘पाश्चिमात्य’ म्हणून हिणवायचं आणि ‘हे आपलं नाहीच’ म्हणत त्याकडे पाठ फिरवायची.

छानच हे. पण अगदी साधी गोष्ट अशी की, कलेचा इतिहास आणि कलेचा बाजार यांची सांगड अधिकाधिक घट्ट होत असताना आणि भारतातसुद्धा तिचे पडसाद (आठवून पाहा- तो चटपटीत तरुण शिल्पकार, मुंबईचं कलादालन आणि दिल्लीचा कलाव्यापार मेळा) उमटत असताना या प्रकारांकडे दुर्लक्ष करणं अवघड आहे.

साधी नसलेली, जरा किचकट गोष्ट अशी की, कलेचा इतिहास आणि बाजार यांची सांगड कितीही घट्ट होऊद्या… कला म्हणजे काय, काय म्हणजे कला, यासारखे वैचारिक ऊहापोह जोवर चालू आहेत तोवर बाजारनिरपेक्ष कलेतिहासाला मरण नाही.

हेही वाचा : संविधानभान : आणीबाणीचे परिणाम

त्यामुळेच, मॉरिझो कॅटलाननं भिंतीवर टांगलेलं केळं इतकं चर्चेत येतं. एम. एम. सुब्बलक्ष्मी यांची ‘जे काही व्हावं ते पैशांविना’ ही इच्छा कुठे आणि ५५ कोटी रुपयांना ‘बळी’ जाणारं केळं कुठे! पण हा कलाविषयक संकल्पनांमधला फरक आहे. कॅटलानची ‘कलाकृती’ जोवर आपल्याला एवढा विचार करायला लावते, तोवर ती महत्त्वाची… जरी तिला आपण ‘कलाकृती’ म्हणत नसलो (आणि कलाकृती न म्हणणंच योग्य असलं), तरीसुद्धा.