‘पद्मश्री’-विभूषित केकी होरमसजी घरडा यांचे निधन ३० सप्टेंबर रोजी, वयाच्या ९५ व्या वर्षी झाले, पण म्हणून गेल्या आठवड्याभरात लोकांना काही फरक पडला नाही… डोंबिवलीतला ‘घरडा सर्कल’ हा चौक तितकाच गजबजलेला राहिला, ‘बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल’मधली गर्दीही तशीच राहिली, ‘घरडा फाऊंडेशन’ने लोटे परशुराम आणि गुजरातमधल्या अंकलेश्वर परिसरातल्या ३० खेड्यांमध्ये सुरू केलेले कामही थांबले नाही, ‘घरडा केमिकल्स’चे लोटेपासून जम्मूपर्यंतचे पाचही उत्पादन-प्रकल्प सुरू आहेत आणि या प्रकल्पांतून रंगद्रव्यापासून ते कीटकनाशकांपर्यंतची हरतऱ्हेची उत्पादनेही तयार होत आहेत. ‘घरडा केमिकल्स’ ही भांडवली बाजारात न उतरलेली कंपनी असल्याने शेअर चढण्या-उतरण्याचा प्रश्नच नाही… हे सारे असेच सुरू राहणे, हीच तर केकी घरडा यांना खरीखुरी आदरांजली ठरणार आहे पण ते तसेच सुरू राहण्यासाठी केकी घरडा ऊर्फ ‘डॉक्टर घरडा’ यांचे प्रेरक व्यक्तिमत्त्वच उपयोगी पडत होते, याची जाणीव कदाचित कधी ना कधी होणारच आहे.
हेही वाचा : ‘मावळतीचे मोजमाप : ते आहेत का आपला आवाज?
‘मीपण महाराष्ट्रीयन. पण मराठी बोलता येते नाय’ – असे सांगताना डॉ. घरडा जितके हसतमुख असायचे, तितकेच कुणा मुरब्बी वाणिज्य-वार्ताहराने कथित कुटुंब-कलहाबद्दल विचारलेल्या प्रश्नालाही प्रसन्नपणे उत्तर देऊ शकायचे. मुंबईच्या ‘यूडीसीटी’ म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या संस्थेत त्यांनी रसायन-तंत्रज्ञानाची पदवी घेतली आणि शिष्यवृत्तीवर ते अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी गेले. पुढे ओक्लाहोमा विद्यापीठातून पीएच.डी. पदवीसाठी त्यांनी केलेले संशोधन अस्सल असल्यामुळेच, मायदेशात वयाच्या ३६ व्या वर्षी या संशोधनाचा व्यावसायिक वापर करण्याचे पाऊल त्यांनी उचलले. ‘एका पिंपावर फळी- ते माझं टेबल’ असे तपशील पहिल्या कार्यस्थळाबद्दल केकी घरडा पुरवत. पण बरकत लवकरच झाली आणि आजघडीला, शेतीस उपयोगी पडणाऱ्या २८ हून अधिक विविध कीटकनाशकांमध्ये ‘घरडा केमिकल्स’चे घटक पदार्थ असतात. पिकांवरच्या कीडनाशकांसोबतच तणनाशके, पशुपालन व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारी स्वच्छता-रसायने, असा या कंपनीचा पसारा वाढत जाऊन आता तो रंगद्रव्ये आणि पॉलिमरपर्यंत पोहोचला आहे. पहिल्या पिढीचे उद्याोजक, संशोधनावर आधारित भारतीय उद्याोग उभारणारे उद्याोजक म्हणून कुणी कुणाचे कौतुक करण्याचा काळ १९७० च्या दशकात नव्हता. पण म्हणून गुणग्राहकता केकी घरडांच्या वाट्याला कधी आलीच नाही असे नव्हे. ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्स’चा ‘केमिकल पायोनियर’ सन्मान, ‘फिक्की’कडून पुरस्कार आणि २०१६ मध्ये ‘पद्माश्री’ ही सारी मानचिन्हे केकी घरडांच्या निधनानंतरही उरतीलच…… नसेल ते त्यांचे निर्व्याज हसू!