सिद्धार्थ खांडेकर

क्रिकेटला आणखी एक खेळ न मानता भारतावर मात करण्याचे साधन मानणारा देश असुरक्षित मानसिकतेतच राहणार..

Ball tampering by India A players during the match against Australia A test match sports
भारत ‘अ’ संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
IND A vs AUS A Ishan Kishan in Trouble as India A team accused of ball tampering
IND A vs AUS A : धक्कादायक! ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप, पंचांशी वाद घातल्याने इशान किशन अडचणीत
Sai Sudarshan century against Australia A
Sai Sudarshan : आयपीएलमध्ये रिटेन करताच साई सुदर्शनचा शतकी नजराणा, ऑस्ट्रेलियात साकारली दमदार खेळी
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
IND vs NZ 3rd test Washington Sundar Bowled Hattrick against Rachin Ravindra
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामना आज शनिवारी अहमदाबादेत होतोय. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हा या दोन संघांतला आठवा सामना. आधीचे सातही भारताने जिंकले. त्यामुळे प्रत्येक विश्वचषक स्पर्धेची पाकिस्तानमधील लाखो क्रिकेटरसिक चातकासारखे वाट पाहात असतात. कधी एकदा ही स्पर्धा सुरू होते आणि कधी एकदा.. किमान एकदा तरी.. त्यात भारताला हरवायला मिळते. क्रिकेटच्या या मायाजालातून बाहेर पडण्याची पाकिस्तानची इच्छा नाही. क्षमताही नाही. पाकिस्तानचे क्रिकेटप्रेम, नव्हे आसक्ती, अशी वर्षांनुवर्षे गोठलेल्या (‘सस्पेंडेड अ‍ॅनिमेशन’च्या) अवस्थेत आहे. गतशतकात सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत पाकिस्तानचा संघ क्रिकेटमधील महासत्तांशी टक्कर घेऊ शकत होता आणि स्वत:ला महासत्ता म्हणवूनही घेऊ शकत होता. इम्रान खान, माजिद खान, आसिफ इक्बाल, सर्फराझ नवाझ, झहीर अब्बास, मुदस्सर नझर, वसिम बारी, जावेद मियाँदाद, अब्दुल कादिर, रमीझ राजा किंवा त्यानंतरच्या पिढीत वासिम अक्रम, वकार युनुस, सलीम मलिक, राशिद लतीफ, इंझमाम उल हक, आमिर सोहेल, सईद अन्वर, सक्लेन मुश्ताक, शाहिद आफ्रिदी असे उत्तमोत्तम खेळाडू या संघाकडून खेळले. ऐंशीच्या दशकातील दिग्विजयी वेस्ट इंडिज संघासमोर नांगी न टाकता उभा राहणारा पाकिस्तान हा एकमेव संघ होता. त्यांच्याकडील गुणसंपन्नता पाहता, एकापेक्षा अधिक विश्वचषक त्यांनी जिंकायला हवे होते. पण हे घडले नाही. त्याची कारणे म्हणून जी चर्चिली जातात, त्यात अंतर्गत भांडणे आणि भ्रष्ट प्रवृत्तींचा शिरकाव यामुळे पाकिस्तान बऱ्याचदा पूर्ण ताकदीनिशी खेळलेच नाही, असा एकंदरीत सूर असतो. त्यात तथ्य आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेट संघाचा प्राधान्यक्रम बदलला हेही दखलपात्र ठरते. पाकिस्तानचे लक्ष पूर्णपणे भारतावर केंद्रित झाले. क्रिकेटजगतातील जवळपास सगळय़ाच संघांविरुद्ध जिंकण्याची क्षमता पाकिस्तानी संघात त्या काळी असताना, हा संघ केवळ भारताविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात जिंकण्यातच समाधान मानू लागला. पाकिस्तानी संघाची सारी ऊर्जा, उत्कटता भारताविरुद्धच दिसून येत होती. असे का घडले असावे?

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘वाचन-प्रेरणे’ची कप्पेबंदी..

विश्वचषक १९८३ आणि चँपियन ऑफ चँपियन्स १९८५ या अजिंक्यपदांमुळे भारताचा क्रिकेटमधील भाव नक्कीच वधारला. पण एप्रिल १९८६ मध्ये शारजात जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला सामना आणि ती स्पर्धा जिंकून दिली. त्या विजयासमोर पाकिस्तानी मंडळींना चँपियन ऑफ चँपियन्स स्पर्धेतील भारतासमोरचे दोन पराभव किरकोळ वाटतात. त्या षटकारानंतर शारजात प्रत्येक स्पर्धेमध्ये भारताला मात देणे, हा पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा एककलमी कार्यक्रम बनला. ‘क्रिकेटर्स बेनिफिट सीरिज’च्या नावाखाली अब्दुल रहमान बुखातेर नामे कुणी धनवान शारजात क्रिकेटजत्रा भरवू लागला. त्यात इतरही देश येऊन खेळून जायचे. पण मुख्य खेळ भारत विरुद्ध पाकिस्तान यांचाच. काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारतविरोधाचे विष पाकिस्तानी समाजात कालवणारे आणि लष्करी-जिहादी युतीचे विखारी धोरण त्या देशात राबवणारे जनरल झिया उल हक यांची राजवट क्रिकेटच्या मैदानावरील विजयांसाठी प्रेरक ठरू लागली. खलिस्तान फुटीरवादाला आलेले अपयश काश्मीरमधील विभाजनवादी तत्त्वांना पाठिंबा देऊन धुऊन काढण्याचे जनरल झियांचे मनसुबे होते. काश्मीर विभाजनवादाला सशस्त्र आणि सधन मदत करून ‘टू ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कट्स’ हे धोरण झियांच्याच अमदानीत अधिक रेटले गेले. याच काळात कोण्या पाकिस्तानी क्रिकेटपटूने ‘भारताशी क्रिकेटचा सामना म्हणजे आमच्यासाठी धर्मयुद्धच’ असे उद्गार काढले होते. नव्वदच्या दशकात सातत्याने शारजात स्पर्धा होत होत्या आणि भारताचा पराभव करण्यात पाकिस्तानी क्रिकेट व्यवस्था समाधान मानत होती.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना १९९२ मध्ये झाला. ती स्पर्धा इम्रान खानच्या पाकिस्तानने जिंकली, पण भारताविरुद्धचा सामना पाकिस्तान हरले. १९९२, १९९६, १९९९ या तीन स्पर्धामध्ये कागदावर तरी पाकिस्तानचा संघ भारतासमोर वरचढ होता. पण तरी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. हे घडत असताना, शारजामध्ये भारताचे पराभूत आणि अवमानित होणे सुरूच होते. मात्र एका बदलाने ही सारी मालिकाच खंडित झाली.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : आरोग्य व्यवस्था सुधारणार कधी?

त्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि त्या टप्प्यानंतर विस्तारूही लागली. मोठी बाजारपेठ आणि कुशल, सुशिक्षित कामगारांचा मोठा स्रोत, त्याचबरोबर परदेशी शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अवाढव्य संख्या या गुणत्रयीमुळे भारताचे महत्त्व जागतिक परिप्रेक्ष्यात वाढू लागले होते. पाकिस्तान तेव्हाही क्रिकेट आणि काश्मीरच्या वर्तुळाबाहेर येण्यास तयार नव्हता. पण भारताचे परराष्ट्र आणि देशांतर्गत धोरण पाकिस्तानपलीकडचे विश्व धांडोळू लागले होते. तिकडे शारजात दाऊद इब्राहिमसारखे भारतशत्रू सर्रास वावरू लागल्यानंतर त्या दुनियेशी काडीमोड घेण्याविषयी भावना येथे जोर धरू लागली होती. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस शारजात जाणे आपण पूर्णपणे थांबवले. शारजा क्रिकेटजत्रा बंद पडली, ती परत सुरूच होऊ शकली नाही.

क्रिकेटच्या पलीकडे..

उदारीकरणानंतर लगेचच आणखी एक महत्त्वाचा बदल घडला. अटलांटा १९९६ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या लिएंडर पेसने कांस्यपदक जिंकले. यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताने एक किंवा अधिक पदके मिळवण्यास सुरुवात केली. क्रिकेटच्या पलीकडे पाहायला शिकल्याचे ते फळ होते. याउलट पाकिस्तानचे हॉकीतील शेवटचे पदक बार्सिलोना १९९२ मधील होते. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये त्या देशाची पाटी कोरीच राहिली आहे. पण क्रिकेटच्या पलीकडे पाहण्याची सवयच तेथील जनमानसाला कधी लागली नाही. त्यामुळे इतर खेळांचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे पदकविजेत्यांचाही पत्ता नाही. हॉकी या खेळामध्ये खरे तर पाकिस्तानने भारताची ऑलिम्पिकमधील सद्दी मोडून काढली आणि आशियाई स्पर्धामध्येही फार संधी दिली नाही. या खेळाला क्रिकेटच्या तुलनेत किती तरी अधिक जागतिक ओळख होती. तरीदेखील पाकिस्तानी व्यवस्थेच्या टोकाच्या क्रिकेटप्रेमामुळे पाकिस्तानी हॉकीचे वैभव लयाला गेले. उलट ऑलिम्पिक खेळांकडे गांभीर्याने लक्ष पुरवू लागल्यापासून भारतीय हॉकीला पुन्हा सुगीचे दिवस आले. ९/११ मुळे आपण जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचा गैरसमज पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा होता. मात्र पाकिस्तानच्या शेजारी अफगाणिस्तानमध्ये जिहादी लढय़ाचे केंद्रस्थान होते आणि पाकिस्तान त्या विखारापासून स्वच्छ राहू शकत नाही हे अमेरिकेसह अनेक देशांना कळून चुकले होते. त्यामुळे पाकिस्तानचे विलगीकरण सुरू झाले. तशातच लाहोर स्टेडियमजवळ श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर भयंकर हल्ला झाला नि हा देश तिथे जाऊन खेळण्याच्याही योग्यतेचा नाही याचा साक्षात्कार जगभरच्या क्रीडापटूंना झाला. त्यातून पाकिस्तानी क्रिकेटही ओसाड बनले. पुढील जवळपास १०-१२ वर्षे ही स्थिती कायम राहिली. त्यामुळे क्रिकेट आणि काश्मीरशिवाय कोणत्याही विषयावर वेगळा विचार, वेगळी चर्चा तिथे होताना दिसत नाही. कोणत्याही टीव्ही कार्यक्रमात क्रिकेट सोडून दुसरा विषयच नसतो. खरे तर पाकिस्तान गेली काही वर्षे अनेक समस्यांनी ग्रासला आहे. याला कारणीभूत काही अंशी त्यांचे क्रिकेट दैवत इम्रान खान हाही आहेच. तरीदेखील क्रिकेटच्या वर्तुळाबाहेर पडण्याची कोणाची इच्छा नाही.

यंदा भारतात सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे जवळपास अस्तित्वही जाणवत नव्हते. कारण पहिले काही दिवस भारतीय माध्यमविश्व आशियाई स्पर्धेतील उत्तम कामगिरीने व्यापले होते. भारताला जेथे १०७ पदके मिळाली, तेथे पाकिस्तानच्या खात्यावर तीन पदके जमा झाली.. तरी तेथे चर्चा होती, क्रिकेटमधील दोन हक्काची कांस्यपदके हुकल्याची! अहमदाबादमधील सामना समजा पाकिस्तानने जिंकला, तर तिथे काही आठवडे जल्लोष राहील. समजा हा विश्वचषकच पाकिस्तानने जिंकला, तर पुढील काही वर्षे केवळ क्रिकेटच्या जयघोषात जातील. क्रिकेटग्रस्त, भारतग्रस्त संस्कृतीत यापेक्षा वेगळे काय अपेक्षित? आणि हा सामना पाकिस्तान हरले, तर मग आहेच.. पुढील विश्वचषकापर्यंत भारत नि क्रिकेटच्या नावे मातम! कारण पाकिस्तानचे हेच तर आहे प्राक्तन.

sidhharth.khandekar@expressindia.com