‘ The familiar, just because it is familiar, is not cognitively understood.’ – Hegel
आपण अथांग महासागराच्या मधोमध ‘फेकले’ (Geworfenheit) गेलेलो आहोत आणि तरत आहोत की मरत आहोत हेच मुळात न उमगणं. पाण्याशी एकरूप होता न येणं; मात्र निरंतर एकरूप होण्यासाठी संघर्षरत राहणं. कधी अस्तित्वाविरुद्ध बंड पुकारणं तर कधी सपशेल शरणागती पत्करणं. पूर्वप्राप्त मानवी अवस्थेत ‘सापडलेल्या’ मनुष्याच्या द्विधा प्रकृतीचं संक्षिप्त वर्णन असं करता येतं. प्राप्त मानवी अवस्था आणि मनुष्याची द्विधा प्रकृती यांच्यातील (वि)संवादी संबंधामुळे निर्माण होणाऱ्या या भावनेत तत्त्वज्ञानाची मुळं दडलेली दिसून येतात. या भावनेचं जाणिवेत आणि जाणिवेचं आकलनात रूपांतर होताना तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतर असा भेद निर्माण होत असतो. तत्त्वज्ञानाची आधारभूत वैश्विक भावना आणि तत्त्वज्ञ- तत्त्वज्ञेतरांमधील दरी अधोरेखित करताना ‘मानवी अवस्था’ (ह्यूमन कंडिशन) आणि ‘मानवी प्रकृती’ (ह्यूमन नेचर) या दोन संकल्पनाचा उल्लेख करण्यात आला आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या ऐतिहासिक वाटचालीत तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतरांमधील दरीचं स्वरूप नीट समजून घेण्यासाठी या संकल्पनांची सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे.
(अ) पूर्वप्राप्त मानवी अवस्था आणि मनुष्याच्या द्विधा प्रकृती मधील (वि)संवाद : एक नैसर्गिक तपशील म्हणून मनुष्यालादेखील कार्यकारणभावाचे नियम लागू पडतात. पण मनुष्य फक्त कार्यकारणभावाच्या नियमांनी स्पष्ट होणारी नैसर्गिक वस्तू नसून त्याचं निसर्गातीत्वदेखील गृहीत धरलं जातं, त्याशिवाय विश्वातल्या त्याच्या अनन्यसाधारण स्थानाची उकल होत नाही. एका बाजूला मनुष्याला फक्त एक नैसर्गिक तपशील (res extensa) म्हणून स्वत:च्या क्षुल्लकपणाचा प्रत्यय येत असतो तर दुसऱ्या बाजूला त्याच्याठायी असणारं निसर्गातीत्त्व ( res cogitans) त्याला सभोवतालच्या वास्तवापासून वेगळं करतं.
हेही वाचा : लोकमानस : होय- ‘महाराष्ट्र थंड गोळा आहे’!
हे वेगळेपण बौद्धिक, सौंदर्यात्मक आणि नैतिक पातळीवर आविष्कृत होताना दिसतं. प्रत्येक माणूस कळत-नकळत आपल्या द्विधा प्रकृतीच्या दोन ध्रुवांमध्ये हेलकावे घेत असतो. त्याअर्थी कुणीही निखळ नैसर्गिक वस्तू नसतं. आंतोनियो ग्राम्शी म्हणतो त्याप्रमाणे कुणीही तसं तत्त्वज्ञेतर नसतं-‘प्रत्येक माणूस तत्त्वज्ञ असतो’. मनुष्याची द्विधा प्रकृती स्थलकालातीत असल्याने त्यातून निर्माण होणारी भावनादेखील वैश्विक असते. पण ही भावनिक समता पूर्वप्राप्त मानवी अवस्थेच्या अपूर्णतेतून आणि असमाधानातून येणारी- म्हणजेच अभावात्मक- असल्याने ती केवळ प्रारंभबिंदू ठरते.
पूर्वप्राप्त मानवी अवस्था म्हणजे मनुष्याच्या जन्माआधीच अस्तित्वात असलेलं नैसर्गिक आणि मानवनिर्मित वास्तव. मानवी अवस्थेची काहीएक पूर्वप्राप्त रचना असते, नियम असतात. ही रचना किती निसर्गदत्त आहे आणि किती इतिहासदत्त याचा शोध घेणं तत्त्वज्ञानाचं काम आहे. विविध धर्मशास्त्रं पटवू पाहतात त्याप्रमाणे, पूर्वप्राप्त मानवी अवस्था ईश्वरदत्त आहे का याची चिकित्सकपणे पडताळणी करणं तत्त्वज्ञानाचं काम आहे. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे पाश्चात्त्य परंपरेत पूर्वप्राप्त मानवी अवस्थेचा निर्देश गुहाजीवन, पतीत जीवन, परात्म जीवन सारख्या अभावदर्शक संकल्पनांनी करण्यात आला आहे. पण सेंट ऑगस्टिनने वर्णिलेलं ‘पतित जीवन’ आणि मार्क्सने विषद केलेलं ‘परात्म जीवन’ अभावदर्शक असलं तरी त्यांची तत्त्वज्ञानं मात्र एकमेकांना छेद देणारी आहेत. उदाहरणार्थ, चर्चच्या शिकवणीनुसार पूर्वप्राप्त मानवी अवस्थेतील दारिद्र्य स्वर्गप्राप्तीसाठी चांगलंच समजलं जातं तर भौतिक समृद्धी नरकाकडे नेणारा राजमार्ग.‘ It is easier for a camel to go through the eye of a needle than for a rich person to enter the Kingdom of God!’ त्याअर्थी दारिद्र्यात जन्माला येणं म्हणजे चांगलीच बाब ठरते! मात्र मार्क्स विषद करतो की मनुष्याच्या परात्मतेची मुळं प्राप्त मानवी अवस्थेच्या विषम आणि अमानुष रचनेत आहेत जी इतिहासदत्त आहे.
हेही वाचा : व्यक्तिवेध : डेव्हिड लिंच
थोडक्यात पूर्वप्राप्त मानवी अवस्था आणि मनुष्याची द्विधा प्रकृती यांच्यातले (वि)संवादी संबंध हा पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती प्रश्न राहिला आहे. उदाहरणार्थ, ‘मला काय ज्ञात होऊ शकतं?’, ‘मी काय करायला पाहिजे?’,‘मी कशाची आशा करू शकतो?’, ‘मानव म्हणजे नेमकं काय?’ इमॅन्युएल कांटच्या या चार प्रश्नांचं होकारार्थी उत्तर अतीत्वाचं स्वयंभू अस्तित्व मान्य केल्याशिवाय देता येत नाही. मानवी स्वातंत्र्य शक्य आहे का? कांटच्या या मध्यवर्ती प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देण्यासाठीसुद्धा मनुष्याचं अतीत्व गृहीत धरावं लागतं. त्याशिवाय कांटला मानवी स्वातंत्र्याची शक्यता आणि त्यातून येणारं नीतिशास्त्र मांडता आलं नसतं. कारण पूर्णपणे कार्यकारणभावानुसार चालणाऱ्या वस्तूविषयी स्वातंत्र्य ही संकल्पना गैरलागू ठरते. खरंतर स्वातंत्र्य आणि गुलामगिरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि त्या नाण्याला तत्त्वज्ञानात मनुष्याचं अतीत्त्व म्हणतात.
(ब) तत्त्वज्ञानाच्या पूर्वअटी : पाश्चात्त्य परंपरेत सॉक्रटिसपूर्व धर्माधिष्ठित आणि मिथकाधिष्ठित विश्वात मनुष्याच्या द्विधा प्रकृतीचा अर्थ थिऑस म्हणजे ईश्वरी तत्त्वाच्या आधारे आणि मिथॉस म्हणजे पौराणिक कल्पकतेच्या आधारे लावला जात असे. धार्मिक आणि मिथकाधारित जीवनदृष्टी सर्वसामान्यांच्या मनाच्या तळाशी अबोध तत्त्व म्हणून त्यांच्या दैनंदिन जीवनाचं नियमन करत असे. अदृश्यपणे नियमन करणारं अबोध तत्त्व आणि दैनंदिन जीवनातील गतिशील तपशील यांत फारकत असल्यानं सर्वसामान्यांना ‘स्वतंत्रपणे’ अतीत्त्वाचा ठाव घेता येत नसे. त्यामुळे मोजके तत्त्वज्ञ आणि बहुसंख्य तत्त्वज्ञेतर अशी विभागणी होणं साहजिक होतं.
मात्र इसवीसन पूर्व पाचव्या शतकात पाश्चात्त्य परंपरेला ‘सॉक्रेटिक वळण’ मिळतं. थिऑस आणि मिथॉस या (धार्मिक, मिथकाधारित) नियामक आणि मार्गदर्शक तत्त्वांना लोगोस (स्वायत्त मानवी विवेकबुद्धी, विचारशीलता) या नवीन स्पर्धकाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतरांमधील प्रस्थापित दरीला निर्णायक धक्का बसतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील या सॉक्रेटिसप्रणीत क्रांतीमुळे लोगोसचा सार्वजनिक वापर एक पद्धतीशास्त्र म्हणून पुढे येतो. या सॉक्रेटिक पद्धतीशास्त्रातच तत्त्वज्ञानाच्या पूर्वअटी आणि तत्त्वज्ञ- तत्त्वज्ञेतरांमधील भेद मिटवण्याच्या शक्यता दिसून येतात. उदाहरणार्थ, आपल्या दैनंदिन जीवनातील तपशीलांची खासगीरीत्या आपापल्या परीनं व्यवस्था लावताना सगळ्यांना तार्किक असल्याचा भास होतो. ज्या खासगी तपशीलांची आपण व्यवस्था लावत असतो ते अगदी कातडीलगत असल्याने आपल्याला स्वत:चे अंतर्विरोध नजरेस पडत नाहीत. त्यातल्या त्यात नियामक तत्त्व आणि मार्गदर्शक तत्त्व अबोध असतं. प्लेटो ‘फिडो’ या तत्त्वज्ञानात्मक संवादात पूर्वप्राप्त मानवी अवस्थेत सापडलेल्या मनुष्याचं वर्णन ‘पाण्यातील मासा’ असा करतो. चहुबाजूंनी वेढणाऱ्या पाण्याविषयी मासा अनभिज्ञ असतो, कारण पाणी हे माशाच्या अगदी कातडीलगतचं असतं. जे अगदी कातडीलगतचं असतं त्याविषयी मनुष्य देखील अनभिज्ञ असतो. हेगेल लिहितो त्याप्रमाणे, ‘the familiar, just because it is familiar, is not cognitively understood.’ कारण जे अतिपरिचित असतं त्याविषयीच्या संवेदना बोथट झालेल्या असतात. एकूणच वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या शक्यतांच्या बाबतीत हेगेल लिहितो, ‘ The owl of Minerva takes flight only at dusk.’ याचा अर्थ असा की दिवसभर होणाऱ्या घडामोडींचा अर्थ लावण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळीच मिनर्व्हाचं (शहाणिवेच्या देवतेचं) घुबड ज्ञानात्मक झेप घेत असतं.
हेही वाचा : तर्कतीर्थ विचार : कायदेभंग आणि वॉर कौन्सिल
तत्त्वज्ञानाच्या या पूर्वअटीला सर्वसामान्यपणे ‘बेनिफिट ऑफ हाइन्डसाइट’ असं म्हटलं जातं. थोडक्यात स्वत:च्या स्थळ आणि काळापासून अंतर घेतल्याशिवाय आपल्याला वस्तुनिष्ठता आणि वैश्विकता लाभत नसते. आणि माणसाची बौद्धिकदृष्ट्या हे अंतर कापण्याची क्षमता तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतरांमधल्या दरीचं स्वरूप ठरवत असते.
प्लेटो लिहितो की, इतरत्वाचं आणि अतीत्वाचं स्वरूप समजण्यासाठीची पूर्वअट म्हणजे मनुष्याचं ‘उडणारा मासा’ होणं. या रूपकाचा अर्थ असा आहे की असंख्य माशांपैकी एखादा मासा पाण्याच्या सुरक्षित, आरामदायक, सवयीच्या आवरणातून बाहेर पडून इतरत्वात उडी घेण्याची जोखीम आणि कष्ट घेतो, त्याप्रमाणे तत्त्वज्ञ देखील प्रयत्नपूर्वक स्वत:चं परिचित शिवार सोडून इतर वैचारिक परंपरांना त्यांच्या इतरत्वात जाऊन भेटत असतो. अठराव्या शतकातल्या प्रबोधन चळवळीतला प्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ मोंतेस्किअ (१६८९- १७५५) ‘पर्शियन पत्रं’ या कांदबरीत तत्त्वज्ञानाची पूर्वअट विषद करताना लिहितो की ‘आपण’ आणि ‘इतर’ यांमधल्या अंतराचं रूपांतर निषिद्ध सीमारेषेत होत असेल तर ज्ञानाची दारं बंद होतात. स्वत:विषयी आणि इतरांविषयी वस्तुनिष्ठपणे काही जाणून घ्यायचं असेल तर फ्रेंच माणसाला पर्शियन यात्री म्हणून फ्रान्समधल्या समग्र वास्तवाची कठोर चिकित्सा करता आली पाहिजे. थोडक्यात, प्राप्त मानवी अवस्थेच्या विशिष्ट स्थल-कालाच्या सीमारेषांमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने वैश्विक आणि वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी स्वत:च्या स्थल-कालाच्या सीमारेषांचं उल्लंघन निषिद्ध न मानता उलट अपरिहार्यपणे आपलं शिवार सोडणं ही तत्त्वज्ञानाची पूर्वअट आहे.
जेएनयुतील अध्यापक
sharadcrosshuma@gmail.com