जॉर्जिया या कॉकेशन पर्वतराजींमधील सामरिक महत्त्वाच्या देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची चर्चा भलतीकडे सरकू लागली आहे. या निवडणुकीचे विश्लेषण करण्याआधी जॉर्जियाचा अलीकडचा इतिहास जाणून घेणे आवश्यक ठरते. एरवी हा तसा शांतताप्रिय आणि स्वाभिमानी देश. परंतु जन्मापासूनच रशियासारख्या आडदांड शेजाऱ्याशी अस्तित्वाची लढाई लढावी लागत असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिमेकडे आणि युरोपवादाकडे झुकू लागला होता. १९९१मध्ये सोव्हिएत रशियाकडून फारकत घेतलेल्या ज्या देशांविषयी व्लादिमीर पुतिनप्रणीत रशियाच्या मनात आकस नेहमीच राहिला, त्यांमध्ये प्रमुख होते युक्रेन आणि जॉर्जिया. जॉर्जियाच्या नागरिकांनी अनेक शतके पर्शियन, ऑटोमन साम्राज्यांच्या तडाख्यातून आपली संस्कृती, भाषा जपण्याचा प्रयत्न केला. आता गेली तीन दशके मध्ययुगीन साम्राज्यांची जागा रशियाने घेतलेली आहे. नवीन सहस्राकाच्या सुरुवातीस रशियात व्लादिमीर पुतिन अध्यक्ष बनल्यानंतर आणि नंतर लगेचच तिकडे जॉर्जियात मिखाइल साकाश्विली हे अध्यक्ष बनल्यानंतर दोन देशांतील सुप्त शत्रुत्व उघड वैरभावात परिवर्तित होऊ लागले. साकाश्विली यांना जॉर्जियाला वैचारिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या नाटो आणि युरोपीय समुदायाकडे म्हणजेच रशियापासून दूर न्यायचे होते. पुतिन यांना ते मंजूर नव्हते. युक्रेनवर दोन वर्षांपूर्वी आणि दहा वर्षांपूर्वी झालेल्या रशियन आक्रमणांविषयी आज साहजिक बरेच लिहिले-बोलले जाते. पण २००८ मध्ये रशियाने साऊथ ओसेटिया आणि अबखाझिया या जॉर्जियाच्या दोन प्रांतांवर आक्रमण केले. जॉर्जियाने प्रतिकार केला, पण हे दोन्ही प्रांत आज रशिया आणि रशिया-समर्थित बंडखोरांच्या ताब्यात आहेत. ते स्वतंत्र देश असल्याचे रशियाच्या पार्लमेंटने म्हटले आहे. या दोन देशांच्या रक्षणासाठी तेथे रशियाचे सैन्य तैनात आहे. २१व्या शतकात युरोपीय भूमीवरील ते पहिले युद्ध ठरते. त्या कारवाईचे प्रारूप बरेचसे युक्रेनवरील आक्रमणासारखेच आहे. प्रथम अशा देशात रशियनबहुल प्रांतांमध्ये बंडखोरांना मदत करायची, अस्थैर्य निर्माण करायचे, नि अस्थैर्याचे रूपांतर थेट लष्करी कारवाईत करायचे. त्यास प्रादेशिक, सांस्कृतिक अस्मितेची जोड द्यायची. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक विश्लेषकांनी रशियाचा पुढील ‘युक्रेन’ म्हणजे जॉर्जिया असेल असे म्हटले होते, त्याची ही पार्श्वभूमी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा