‘‘ एका प्रथितयश लेखकाची मुलगी म्हणून मोठे होताना तुम्हाला त्यांनी म्हणून दिलेला वारसा आणि तुमचे ‘स्व’त्व असा दुहेरी सांभाळ, विकास करायचा असतो !’’ …ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे तर पेलल्याच, पण त्यावर आपल्या प्रतिभेची मुद्राही उमटवली.

ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांची मुलगी ही वीणा देव यांना जन्माने मिळालेली ओळख. परंतु त्यांचा जीवनपट पाहिला तर भाग्याने मिळालेल्या या ललाटरेषेस त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अजून श्रीमंत केले हेच दिसून येते. गोनीदांची कन्या, मराठीच्या प्राध्यापिका, लेखिका, संपादिका, व्याख्यात्या, मुलाखतकार, निवेदक अशा कितीतरी अंगांनी फुललेले हे व्यक्तिमत्त्व.

हेही वाचा : व्यक्तिवेध : न्या. के. एस. पुट्टस्वामी

मराठी अध्यापनातून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. तब्बल ३२ वर्षे हे कार्य करत असतानाच मराठी भाषेच्या तळमळीतून पुढे लेखन, वाचन, भाषण अशा माध्यमांतून त्या समाजाशीही जोडल्या गेल्या. आशक मस्त फकीर, कधीकधी, वीणाज्जींची पत्रं, परतोनी पाहे, स्त्रीरंग, विभ्रम, स्वान्सीचे दिवस या पुस्तकांमधून त्यांच्यातील लेखक ठसतो. वरवर कडक स्वभावाच्या ‘वीणाताई’मधील संवेदनशील मन या पुस्तकांमधून भावते. कादंबरीकार गो. नी. दांडेकर, स्मरणे गोनीदांची, शब्दसुरांचा सांगाती (यशवंत देव), डॉ. ह. वि. सरदेसाई, गोनीदांच्या दुर्मीळ छायाचित्रांना बोलते करणारे ‘दुर्गचित्रे’ यांची पाने चाळताना त्यांच्यातील संपादक सापडतो. ज्या काळी श्रोत्यांचा संवाद हा केवळ दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून घडत होता, अशा वेळी त्या व्यासपीठावरून विविध विषय आणि मान्यवरांना बोलते करण्याचे काम त्यांनी केले.

गोनीदांनी निर्माण केलेले विपुल साहित्य हे पुढच्या पिढीशी जोडण्याचे मोठे कामदेखील डॉ. देव यांनी केले. यासाठी त्यांनी कुटुंबासोबत सुरू केलेला कादंबरी अभिवाचनाचा प्रयोग हा सांस्कृतिक क्षेत्रातील मानदंड ठरला. याचे देशविदेशात तब्बल साडेसातशेहून अधिक प्रयोग झाले. महाराष्ट्रातील छोट्या-मोठया गावा – शहरांपासून ते युरोप-अमेरिकेपर्यंत या अभिवाचन चळवळीने गोनीदांचे साहित्य पोहोचवले. दुर्ग साहित्य संमेलनही असाच अनोखा उपक्रम. ज्यातील त्यांच्या योगदानामुळे दुर्ग साहित्य दिंडीला आज व्यापक रूप आले.

हेही वाचा : उलटा चष्मा: २४ तासांत ८००!

आई -वडिलांच्या पश्चात त्यांनी सुरू केलेला मृण्मयी आणि नीरा गोपाल पुरस्कार हादेखील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेला धागा होता. यातून गेली २५ वर्षे दर वर्षी एका प्रतिभावान लेखकाचा आणि जोडीनेच एका निरंतर सामाजिक कार्याचा स्वत: शोध घेतला गेला.

केवळ एका आयुष्यात केलेला हा सारा प्रवास. त्यांच्याच शब्दात ‘‘वारसा आणि ‘स्व’त्व’’ जपणारा!