आर्थिक प्रगतीसाठी रोजगार वाढविणे हा एक महत्त्वाचा भाग आणि रोजगारक्षमता वाढविण्यासाठी पदवी शिक्षणाची व्याप्ती वाढविणे हा त्याचाच तार्किक विस्तार. पदवी शिक्षण घेतल्यावर काही ना काही रोजगार मिळतोच, या गृहीतकावर हा तर्क रुजला. त्यामुळेच, देशातील ‘ग्रॉस एन्रोलमेंट रेश्यो’ अर्थात जीईआर, म्हणजे साध्या शब्दांत शालेय शिक्षण संपल्यावर पदवी शिक्षणासाठी किती विद्यार्थी प्रवेश घेतात, त्याचे गुणोत्तर, आर्थिक विकासाच्या चर्चेत महत्त्वाचे ठरत आले आहे. आपल्याकडे ते अजूनही ५० च्या खाली आहे. म्हणजे १०० विद्यार्थी बारावी किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण करत असतील, तर त्यातील ५० हूनही कमी विद्यार्थी पुढे पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतात. विकसित देशांत ते अर्थातच ५० हून अधिक आहे. हे प्रमाण वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे, हे आव्हान इतर सर्व विकसनशील देशांप्रमाणेच भारतापुढेही आहे. आपल्या देशात उच्च शिक्षणातील पटनोंदणी गेल्या दशकापर्यंत २० टक्केदेखील नव्हती. येत्या २०३० पर्यंत ती ५० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पूर्वअध्ययन मान्यता प्रक्रियेच्या अंमलबजावणीबाबतचा तयार केलेला मसुदा आणि त्यावर मागविलेल्या सूचना याकडे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहता येईल. अमुक एक शैक्षणिक पात्रता असेल, तरच पदवीला प्रवेश, हा निकष आता इथून पुढे शिथिल होईल, असे मसुद्यात म्हटले आहे. अर्थात, तसा तो शिथिल करताना इतर काही बाबींची पूर्तता करावी लागेलच. पण, आधीचा निकष शिथिल केल्याने आर्थिक, कौटुंबिक किंवा अन्य कारणांमुळे दहावी-बारावीनंतर शिक्षण सोडून नोकरी वा व्यवसाय करावे लागलेल्या अनेकांना पदवी प्राप्त करण्याची संधी निर्माण होईल, हेही तितकेच खरे.

‘यूजीसी’ने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यात कौशल्यप्राप्त मनुष्यबळासाठी पदवीचे निकष शिथिल करण्याच्या पुष्ट्यर्थ कामगार आणि रोजगार मंत्रालयाची एक आकडेवारी दिली आहे. भारतातील ९० टक्के कार्यरत मनुष्यबळ अनौपचारिक क्षेत्रातील असून, त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पादनातील योगदान निम्मे आहे. यातील अनेकांशी कंपन्यांचे लेखी करार नाहीत, त्यामुळे पगारी रजेसह अन्य लाभ त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे औपचारिक क्षेत्राच्या तुलनेत त्यांची उत्पादनक्षमताही कमी आहे. करिअरचे पुढचे मार्ग उपलब्ध नाहीत आणि आहे तो अनुभव व कौशल्याला पदवीची जोड नसल्याने औपचारिक मान्यता नाही, अशा कात्रीत ते अडकले आहेत. या कात्रीतून सुटण्यासाठी मसुद्याने नवा मार्ग दाखवला आहे. या मार्गात, पदवी प्रवेशाची पात्रता प्रवेशेच्छुकाने प्राप्त केलेले कौशल्य, अनुभव आदींवरून ठरेल. त्यानुसार, आवश्यक पाठ्यक्रम पूर्ण करून वा श्रेयांक घेऊन कामातील तज्ज्ञतेला पदवीचे कोंदण देण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
madhav gadgil loksatta editorial
अग्रलेख : ‘ड्युरेबल ऑप्टिमिस्ट’
donald trump policies
लेख : घोंघावणारी आर्थिक वादळे!
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

हेही वाचा : व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी

या मसुद्याबाबत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा आवश्यक. पहिला म्हणजे, श्रम आणि कौशल्याला मिळणाऱ्या प्रतिष्ठेचा. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने अध्ययन प्रक्रियेत आणलेल्या लवचीकतेमुळे सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणात कोणत्याही टप्प्यावर शिक्षण सोडून, कामाचा अनुभव घेऊन, पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ही लवचीकता केवळ सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता, काही कारणांनी शिक्षणापासून दूर गेलेल्या, पण कौशल्यप्राप्त अशा आधीच्या पिढीलाही एक प्रकारे त्याने लाभ होणार आहे, हे स्वागतार्ह. पदवी न मिळवताही उत्तम व्यवसाय करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाला, त्याने प्राप्त केलेल्या कौशल्यानुरूप पदवी शिक्षण व्यवस्थेनेच देण्याची सोय करणे, हे त्याच्या कौशल्यांची रास्त दखल घेऊन, त्याला प्रतिष्ठा देणे आहे.

हेही वाचा : संविधानभान : पूल, भिंत की बोगदा?

दुसरा मुद्दा आहे, सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी शिक्षण पातळ न करण्याचा. कौशल्ये प्राप्त करणे महत्त्वाचे असले आणि त्यासाठी कार्यानुभवावर आधारित शिक्षण गरजेचे असले, तरी कोणत्याही विषयातील सैद्धान्तिक तत्त्वे समजून घेणे, व्यक्ती म्हणून घडण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची आहेत. आपल्या गरजेचे मनुष्यबळ शोधताना उद्याोग क्षेत्र विषय कौशल्यांबरोबरच संभाषणकला, सांघिक काम करण्याची वृत्ती, सहानुभवाचा भाव आदी बाबीही बघतात. या गुणांचीही जडणघडण शिकण्याच्याच प्रक्रियेत व्हायला हवी. कौशल्यांचा आग्रह धरताना समाजाचा घटक म्हणून जगण्याचे भानही शिक्षणानेच द्यायला हवे. पदवीधरांच्या संख्येतील वाढ केवळ ‘जीईआर’साठी होऊ नये, तर त्यातून सर्वांगीण उन्नत व्यक्तिमत्त्वेही घडायला हवीत. निव्वळ पदवी असून जसे चालत नाही, तसे निव्वळ कौशल्य असूनही चालणार नाही, तर पदवी शिक्षणाच्या प्रक्रियेत होणारा व्यक्तिमत्त्व विकास आणि प्राप्त केली जाणारी व्यावसायिक कौशल्ये यांची योग्य सांगड शिक्षण अर्थपूर्ण बनवेल, याचे भान आवश्यक आहे.

Story img Loader